Monday, 30 September 2024

गावच्या विकासासाठीआगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून माझ्या उमेदवारीला सहकार्य करा-आमदार राजू बाबा आवळे


हेरले /प्रतिनिधी
 
राष्ट्रवादीचे शरद पवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे पक्षाबरोबर त्यांचे चिन्ह काढून दुसऱ्याला हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला पचने पडला नाही त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला यश दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने मला सहकार्य करावे असे आवाहनआमदार राजू बाबा आवळे यांनी केले.                                        
शिरोली हौसिंग सोसायटीच्या वतीने पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल पंकज गिरी यांचे सत्कार प्रसंगी ते बोलत होते. 
    अध्यक्षस्थानी माजी सरपंच शशिकांत खवरे होते.          अध्यक्षपदावरून बोलताना खवरे  म्हणाले मी सरपंच असताना या संस्थेला बंटी पाटील यांच्या माध्यमातून दहा लाखाचा बाबा यांच्या माध्यमातून दहा लाखाचा याशिवाय लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य हॉल साठी शौचालयासाठी निधी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमदार राजू बाबा आवळे यांच्या माध्यमातून ५० लाखाचा निधी देण्याची ग्वाही दिली.                       प्रारंभी आमदार आवळे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक गिरी यांचा तर आमदार आवळे यांचा अध्यक्ष बाबुराव चौगुले तर माजी सरपंच शशिकांत खवरे यांचा माजी तंटामुक्त अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                             

     कार्यक्रमास राष्ट्रसेवा हायस्कूल अध्यक्ष बाजीराव सातपुते, तालुका कॉ.उपाध्यक्ष उत्तमराव पाटील ,ट्विंकल स्कूल अध्यक्ष संतोष बाटे, बजरंग दलाचे अध्यक्ष प्रशांत कागले , जपान कराटे चॅम्पियन मानव उगारे,नितीन दळवी  उपस्थित होते. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बाबुराव चौगुले यांनी आढावा घेतला. स्वागत शिवाजीराव पोवार यांनी केले. आभार पंडितराव सावेकर यांनी मानले. सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले. नियोजन सचिव सचिन पाटील यांनी केले. याप्रसंगी संचालक शिवाजीराव लंबे ,संभाजी सोडगे, कृष्णात पुजारी, चंदूकाका सुतार, सुखदेव पाटील, यशवंत वसगडे, भिमराव लबडे उपस्थित होते.              
                        फोटो 
शिरोली हौसिंग सोसायटीच्या वतीने पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचा सत्कार करताना आमदार राजू बाबा आवळे शेजारी माजी सरपंच शशिकांत खवरे, बाजीराव सातपुते, उत्तमराव पाटील , राजू पाटील,बाबुराव चौगुले,,संतोष बाटे, आदि.

उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा शिक्षणाधिकारी योजना डॉ.किरण लोहार यांचा सन्मान

कोल्हापूर /प्रतिनिधी

जन जन साक्षरता 'या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी योजना  किरण लोहार यांनी केली. या उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या  सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते  अन्य मान्यवर उपस्थित झाला.
     वय वर्षे 15 ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्या साठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले.  त्याच बरोबर पुणे येथील  रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी  पाहून  महेश पालकर , संचालक योजना ,  राजेश क्षीरसागर उपसंचालक योजना पुणे यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले.    

  रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक राहुल रेखा राव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे ,शिक्षण संचालनालय(योजना )महाराष्ट्र राज्य  डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती.  किरण लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा  मार्गदर्शन - नाम. उदय सामंत पालकमंत्री,एम देवेंदर सिंह जिल्हाधिकारी ,कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी,योगदान स्टाफ योजना विभाग, सर्वं गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना, शिक्षक
डाएट प्राचार्य व स्टाफ सर्व नवसाक्षर, स्वयंसेवक यांनी अतिशय मन लावून केलेले काम, रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्ट च्या 200% हुन अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळ 35 मंजूर स्टाफ पैकी फक्त्त, 3 च जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो.

फोटो 
उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या  सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नाम. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते होतांना शेजारी अन्य मान्यवर.

Friday, 27 September 2024

शिक्षक संघटनांनी आक्रोश का केला ? डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर

---------------------------------
गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवायची जबाबदारी शिक्षकांवर आहे. परंतु, शासनाने शिक्षकांच्या माथ्यावर 75 ते 135 प्रकारच्या  अशैक्षणिक कामांचा बोजा मारला आहे. या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक दबल्यामुळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे आम्हाला केवळ शिकविण्याचेच काम करू द्यावे, असे आर्जव शिक्षक तसेच शिक्षक संघटनांनी राज्य शासनाला केले आहे.
शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे ही अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. राज्य शासनाकडून वारंवरा शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जातात, शिक्षक संघटना त्यास विरोध करतात.  अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलतो किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. शिक्षकांना काय काम असते, अशा भावनेने शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात.
त्यामुळे साहजिकच त्यांचे शिक्षणाच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होते. परिणामी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरू लागतो. दर्जा घसरला, शाळांचा निकाल कमी लागला किंवा विद्यार्थी अप्रगत राहिले, मागच्याच वर्गात पुन्हा बसले की शिक्षकांवरच ताशेरे ओढले जातात. या अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी दिली, तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असा आक्रमक पवित्रा घेत शिक्षकांनी अशैक्षणिक कामांमधून सुटका होण्यासाठी शिक्षकदिनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला का आला आहे.
शिक्षकांना असलेली अशैक्षणिक कामे…
मतदार नोंदणी आणि मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, बीएलओ कुटुंब सर्वेक्षण, विविध प्रकारची ऑनलाइन माहिती भरणे, उपस्थिती भत्त्याच्या नोंदी करणे, 40 पेक्षा जास्त नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, लसीकरण मोहीम राबवणे, जंतुनाशक गोळ्या वाटप व अहवाल देणे, शासनाच्या कोणत्याही मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभात फेरी काढणे, माध्यान्ह भोजनाच्या नोंदी करणे/ हिशेब ठेवणे, भाजीपाला खरेदी करणे त्याचा हिशेब ठेवणे, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, लोकांकडून देणगी जमा करून शाळेच्या गरजा भागवणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे, वेगवेगळ्या योजना व परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरणे, घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, पोलिस पंचनाम्यामध्ये पंच म्हणून उपस्थित राहणे, शासनाच्या विविध विभागांना सहकार्य करणे, वृक्षलागवड अहवाल देणे, सरल प्रणालीची माहिती भरणे, युडायस माहिती भरणे, कोकणात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिक्षकांची नेमणूक, गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची व्यवस्था करणे, अशी विविध प्रकारची छोटी-मोठी मिळून  75 ते 135 अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.

शिक्षकांची ज्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे काम त्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यांच्यावर एका बाजूने अशैक्षणिक कामांचा बोजा टाकला जातो आणि दुसर्‍या बाजूने शिक्षणाचा दर्जा घसरला, अशी ओरड केली जाते, हे योग्य नाही. अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांकडून शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे असे म्हटले जात आहे अशैक्षणिक कामे काढून घेऊन त्यांच्याकडून शिकविण्याचेच काम चांगल्या प्रकारे कसे होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.तरच एकविसाव्या शतकातील सक्षम विद्यार्थी घडणार आहे.

शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. राज्य शासनाकडून शिक्षकांवर अशी कामे लादली जातात, शिक्षक संघटना त्यास विरोध करतात. अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलते किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. एकूणच काय तर शाळेत शिकविणे, मुलांना घडविणे यापेक्षा शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात. शिक्षकांना काय काम असते, अशा भावनेने शिक्षकांना शालाबाह्य अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात. शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा भार नेहमीच अधिक असतो. त्यामुळे सहाजिकच त्यांचे शिक्षणाच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होते. दुर्लक्ष होते, असे म्हणण्यापेक्षा त्यांना लक्ष देण्यास पुरेसा वेळच उपलब्ध होत नाही, असे म्हणणे योग्य होईल. परिणामी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरू लागतो. दर्जा घसरला, शाळांचा निकाल कमी लागला किंवा विद्यार्थी अप्रगत राहिले, मागच्याच वर्गात पुन्हा बसले की शिक्षकांवरच ताशेरे ओढले जातात. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सातत्याने समोर येत असतात. जनगणना, मतदार नोंदणी ही कामे शिक्षकांकडे सोपवली जातातच. शिवाय अलिकडे विविध प्रकारच्या सर्वेक्षणाची जबाबदारीही शिक्षकांवर सोपवली जाऊ लागली आहे. त्यामुळे कधी कोणते सर्वेक्षण निघेल आणि त्यासाठी शिक्षकांना तातडीने रवाना व्हावे लागेल, सांगता येत नाही अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे.
  
अलिकडेच निवडणुकांचे काम शिक्षकांवर लादले असताना पंधरा दिवसांपूर्वीच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे कामही शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे. त्यासाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. चालू आठवड्यात शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू झाल्या आहेत. महिन्याच्या प्रारंभीच शिक्षकांची अशैक्षणिक कामे, त्यासाठीचे प्रशिक्षण असे नियोजन बदलल्याने शाळा व्यवस्थापने अडचणीत आली. सणावाराचे दिवस असताना शिक्षकांच्या सुट्ट्या, नियोजित रजा, शाळांच्या सुट्या, ऐनवेळी येणारी एखादी रजा आणि भरती न झाल्यामुळे शिक्षकांचा तुटवडा अशा अनेक समस्या शाळांसमोर आहेतच. अशातच नव्याने अशैक्षणिक कामे आणि प्रशिक्षण सामोरे आल्यामुळे शाळा पेचात पडल्या. मात्र, शासनाचा आदेश डावलता येत नाही त्यामुळे दोन वर्गांवर एक शिक्षक, जादा तास अशी ओढाताण करत शाळांनी अंतर्गत कामे सांभाळून घेतली. मात्र, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे, गुणवत्तेकडे, अभ्यासाकडे आणि सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायचे की अशैक्षणिक कामांकडे, अशा कात्रीत शिक्षक नेहमी सापडतात. स्वाभाविकपणे शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते, असे सांगत पालकही तक्रार करतात.

अशैक्षणिक कामे करणे भाग
शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार नाहीत, असे परिपत्रकही शासनाने २०१३ मध्ये काढले होते. त्यावेळी शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. किमान यापुढे तरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळ देता येईल आणि मुलांचा विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, शासनाचा हा निर्णय फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच निर्णय बदलत शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावीच लागतील असे परिपत्रक काढण्यात आले. शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, निवडणूक, सर्वेक्षण अशी विविध अशैक्षणिक कामे करणेही भाग पडले. वास्तविक शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांनी केवळ अध्यापनाचे काम करावे अशी अपेक्षा आहे. शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या कामांबाबतचा प्रश्न यापूर्वीही विधिमंडळात उपस्थित झाला होता. त्यानुसारच अशैक्षणिक कामे न देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तो कायम राहिला नाही.

शिक्षकांना सातत्याने येणारी शाळाबाह्य कामे ही शिक्षकांचे वेळापत्रक व्यस्त करतात. शिक्षक शाळेत दिसले नाहीत, की विद्यार्थी देखील तक्रार करतात. काही ठिकाणी पालकांच्या रोषालादेखील तोंड द्यावे लागते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा रोष शिक्षकांना सोसावा लागतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागतो. त्यांच्यावरच कामाचा बोजा आणि विद्यादानाऐवजी भलत्याच कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे लागते. शासनाने २०१२ पासून शिक्षकांची भरती प्रक्रिया थांबवली आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविल्याशिवाय नव्याने शिक्षक भरती केली जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. अतिरिक्त शिक्षकांना काम मिळालेले नाही आणि नव्याने भरतीही होत नाही. त्यामुळे कमी शिक्षक संख्येत शाळांना शैक्षणिक अभ्यासाचे नियोजन बसवावे लागते.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अलिकडे नव्याने जेवढे क्रांतिकारी बदल होत आहेत, शाळा अद्ययावत होत आहेत, ई- लायब्ररी, डिजिटल स्कूल यांसारख्या संकल्पना राबविल्या जात आहेत, असे असताना शिक्षकांवरील कामाचा बोजा वाढतच आहे. एकही मूल अप्रगत राहू नये, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न रंगवत आहे. दुसरीकडे प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिक्षकांवरच कामे लादली जात आहेत. वास्तविक अशैक्षणिक कामांसाठी सेवानिवृत्त शिक्षक, सुशिक्षित बेकार, सेवानिवृत्त बँक अधिकारी, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत सहज घेता येऊ शकते. त्यांना पुरेसे मानधन दिल्यास बेरोजगारांना नव्याने रोजगार मिळेल आणि शिक्षकांना पूर्णपणे विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करता येऊ शकेल.

कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून ती त्या विभागाचे उपयोजन किंवा संकेतस्थळावर भरणे, ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागवणे, शासन मान्यता नसलेल्या कामात सहभाग, शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांकडून दिली जाणारी कामे अशी कामे अशैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तसेच अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुरुजींची शैक्षणिक, अशैक्षणिक कामे ठरली !, शासनाने अध्यादेश काढला

गुरुजींची शैक्षणिक, अशैक्षणिक कामे ठरली !
 शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणाऱ्या कामाचा ताण लक्षात घेता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार गावात स्वच्छता अभियान राबविणे आणि हागणदारीमुक्त अभियानात सहभागी होण्यासह तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून शिक्षकांना राहणे अशैक्षणिक काम ठरवले आहे.मात्र, सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे, मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांची नावनोंदणी करणे ही शैक्षणिक कामे ठरविण्यात आली आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी अध्यादेश काढला आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना शैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई केली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असल्याचे मत देण्यात आले होते.यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करून शासनास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शिक्षक शासकीय असला तरी त्यांनी निर्देशित केलेलीच शैक्षणिक कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शैक्षणिक कामेशासन निर्णयानुसार शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे, अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे, याकडे लक्ष देणे, विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रेकिंग करणे, शिष्यवृत्ती परीक्षेसह ‘एनएमएमएस’, ‘एनटीएस’, ‘एमटीएस’, प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यसंस्कार, राष्ट्रीय नेते यांची जयंती, पुण्यतिथी इतर दिनविशेष साजरे करणे, शाळास्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष, सचिव म्हणून कामकाज ही सर्व शैक्षणिक कामे आहेत.

अशैक्षणिक कामेगावात स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त अभियान राबविणे, गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे, इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण, पशू सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण आदी सर्वेक्षणाची महसूल विभागाची कामे, जी माहिती संकलनीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागवणे, शासनाच्या मान्यतेशिवाय अनावश्यक असलेली प्रशिक्षणे, कार्यशाळेत, उपक्रम, अभियान, मेळावे यामध्ये ऑनड्युटी सहभाग घेणे ही अशैक्षणिक कामे बंद केली.
नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात, शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यापासून शिक्षकांना दिले जाणारे वेतन, घरभाडे भत्ता, शाळांची गुणवत्ता याबाबत विधिमंडळ सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निषेध व्यक्त झाले. मोर्चे निघाले. हे कमी की काय म्हणून याच दरम्यान शिक्षण विभागाने शिक्षकांना आपापल्या वर्गात आपला फोटो लावण्याचे फर्मान काढले. त्यावरून रान पेटलेले असतानाच तिकडे कोकणात गणेशोत्सवासाठी गावोगावी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना चहापाणी, नाश्तावाटपासाठी राजापूर एसटी आगारात शिक्षकांना तैनात केल्याने शिक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला. यामुळे शिक्षकांची पदोपदी केली जाणारी अवहेलनेला, अध्यापनाऐवजी शिक्षकांवर लादली जाणारी अनेक अशैक्षणिक कामे आणि सातत्याने शिक्षकांची होणारी ससेहोलपट हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले. काल-परवा झालेल्या शिक्षक दिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिक्षकांचा गौरव केला गेला. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, शिक्षकांचा गौरव करणारी भाषणे झाली. सत्कार समारंभ झाले. काहींना पुरस्कार दिले गेले. किती हा शिक्षकांचा मान सन्मान! आणि दुसऱ्या दिवशी? शिक्षकांच्या वाट्याला काय, तर अवहेलना दुजाभाव, अपमान! मग हा दांभिकपणा कशाला हवा? समाज इतका असंवेदनशील कसा असू शकतो? माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. गुरूशिवाय विद्या नाही अन‌् गुरूशिवाय जीवनाला अर्थही नाही! एका बाजूला गुरूंची थोरवी सांगणाऱ्या या समाजात गुरुपदाची इतकी अवहेलना कधीच झाली नसेल इतकी अवहेलना, गुरूंना वर्गावरून शाळेबाहेर काढून इतर अशैक्षणिक कामाला जपून केली जावी हे असंवेदनशीलतेचे गाठलेले टोकच म्हणावे लागेल. ज्या समाजाने दोन शिक्षकांना लोकशाहीतील सर्वोच्चपद असलेल्या राष्ट्रपतीपदी नेऊन बसवले, त्या समाजात शिक्षकांची प्रतिमा इतकी पायदळी तुडवली जावी, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

खरंतर राज्य असो किंवा केंद्र असो, शिक्षण आणि शिक्षक हा कोणाच्याही प्राधान्याचा विषय राहिलेला नाही. इतर राष्ट्रांच्या मानाने शिक्षणावर केला जाणारा खर्चही कमीच आणि शिक्षकांप्रति आदरही कमीच! सद्य:स्थितीत शिक्षक हा सरकारी कामगार बनला आहे. हे वास्तव आहे, ते कसे पुसणार? खरंतर शिक्षकाचे कार्य विद्यादानाचे; परंतु ते दुर्लक्षित करून त्याला शाळाबाह्य, अशैक्षणिक कामालाच जुंपण्यात सर्व संबंधित धन्यता मानत आहेत. एकीकडे शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे, दर्जा सुधारला पाहिजे, शाळा टिकल्या पाहिजे, एकही मूल शाळेबाहेर राहता कामा नये, असे मोठ्या थाटात सांगायचे; परंतु दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपून त्यांना जास्तीत जास्त काळ वर्गाबाहेर ठेवून त्यांची आणि विद्यार्थ्यांची नाळ तोडायची याला काय म्हणायचे? शैक्षणिक गुणवत्ता साधण्याचा हा कोणता मार्ग म्हणायचा? आता तर काय, ‘म्हणे गुरुजींचे फोटो वर्गात लावा;’ पण गुरुजीच वर्गात नसतील तर त्या फोटोकडे बघून मुले शिकतील असे म्हणायचे आहे काय? गुरूंचा फोटो समोर ठेवून विद्याग्रहण करण्याचा काळ पुन्हा एकदा आला की काय? शिक्षकांची हजारो पदे रिक्त ठेवणार, एक एका शिक्षकाच्या गळ्यात दोन-तीन वर्ग मारणार, त्याला वर्ग अध्यापनापेक्षा सतत शाळाबाह्य कामात गुंतवणार आणि दुसरीकडे त्याच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करणार आणि ती गुणवत्ता दिसली नाही तर त्या शिक्षकाला शास्ती लावणार हा कोणता न्याय म्हणायचा? ‘आम्हाला वर्गावर शिकवू द्या’ हा राज्यभरातील शिक्षकांचा आक्रोश कुणी ऐकणार की नाही?

शिक्षकाचे खरे काम काय तर ज्ञानदानाचे! हा दोन जिवंत मनांशी असलेला अतिशय संवेदनशील संवाद! शिक्षण हक्क कायद्यातदेखील विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. जनगणना, निवडणुका यासारख्या राष्ट्रीय कार्याखेरीज शिक्षकांना अन्य कामे देऊ नयेत, शिक्षकांना सतत वर्गात राहू द्यावे, विद्यार्थीसंख्या आणि विषयानुरूप शाळांमध्ये शिक्षक द्यावेत, या आणि अशा अनेक शिफारशी शिक्षण हक्क कायद्यात केल्या गेल्या आहेत. हा कायदा होऊन एक तप लोटले, तरी शिक्षकांची ना अवहेलना संपली, ना त्यांच्यावरील अनेक शाळाबाह्य कामांचा बोजा कमी झाला! एकूणच प्रशासनापासून समाजापर्यंत सर्वच ठिकाणी शिक्षकाप्रति असणारे आदराचे स्थान कुठेतरी कमी होत जाताना दिसत आहे. अर्थात, याला काही अंशी शिक्षकदेखील जबाबदार आहेत, हेही नाकारता येणार नाही. राज्यात काही ठिकाणी शिक्षकांनी आपल्याच हाताने आपला मान, प्रतिष्ठा आपल्या विघातक कार्याने धुळीस मिळवल्याच्या येणाऱ्या बातम्या समाजमनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. मद्यप्राशन करून वर्गात जाण्यापासून दिवसेंदिवस शाळांचे तोंडही न बघणे, शिकवण्यापेक्षा या अशा गोष्टीत काही शिक्षकांचा सहभाग असावा, हा शिक्षकी पेशाला काळिमाच; परंतु अशा दुर्वर्तनी शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प आहे; पण म्हणून त्याची शिक्षा सर्व शिक्षकांना कशी देता येईल? प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या विद्येचा श्रीगणेशा जेव्हा त्याने पहिले पाऊल शाळेत ठेवले, तेव्हा त्याच्या गुरूंनी इवल्याशा बोटांमध्ये पेन्सिल देऊन केला हे कसे विसरता येईल? ज्या गुरूंचे मानवी जीवनातील, समाज उभारणीतील स्थान इतके मोठे आहे, त्याच गुरूंची अवहेलना अजून आम्ही किती करणार आहोत? शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ते समाजाला कितपत भूषणावह ठरते?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची तब्बल ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. आरटीनुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य असताना राज्यातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षकाविना शिक्षण घेत असतील तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडणार तरी कसा? महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मते तर राज्यातील तीन लाख सात हजार ५४२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसे असेल तर परिस्थिती भयावह आहे. राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक विषयाला शिक्षक नाहीत. आरटीनुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, विज्ञान या विषयांसाठी विशेष शिक्षकांची गरज असताना जिल्हा परिषद शाळांमध्ये भाषा, विज्ञान, गणित या विषयांच्या १७,८२२ जागा रिक्त आहेत. राज्यभरात बहुतांशी शाळांमध्ये एका शिक्षकाला किमान दोन ते तीन वर्ग घ्यावे लागत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई याला अपवाद नाही. एक शिक्षकी शाळा ठेवायच्या नाहीत, असे धोरण असले तरी आजही राज्यात एक शिक्षकी शाळा आहेत. तर किमान आता बऱ्याच शाळा दोन शिक्षकांवर चालवल्या जात आहेत, अगदी मुंबईतदेखील! त्यामुळे येथील प्रत्येक शिक्षकाकडे दोन-तीन वर्गांची जबाबदारी द्यायची; पण वर्ग अध्यापनाऐवजी जास्तीत जास्त वेळ त्यांना शाळेबाहेर बाह्यकामात घालवण्यास लावायचा असेच होणार असेल, तर शिक्षणाची गुणवत्ता कशी उंचावणार? हातात लेखणी आहे म्हणून घसरलेल्या गुणवत्तेला एकट्या शिक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करता येईलही; परंतु त्यातून गुणवत्ता वाढणे केवळ अशक्यच! शाळेचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावणे हे शिक्षकाचे आद्य कर्तव्यच आहे. ते त्यांनी करायलाच हवे. तसे कोणी करत नसेल तर तो शिक्षेस पात्र ठरतो; परंतु त्याला त्याचे कर्तव्य करण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण वेळ वर्गात ठेवणार आहोत की नाही? याचाही आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्याला तसे वर्गात ठेवणार नसू आणि त्याच्या गळ्यात असंख्य अशैक्षणिक कामांच्या माळा घालणार असू, तर शिक्षणाच्या अध:पतनास आम्ही जबाबदार नाही काय? राज्यशिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या तब्बल १४१अशा शैक्षणिक कामांची यादीच प्रसिद्ध केली आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात शिक्षकांवर शैक्षणिक कामे लादली जावीत, यापेक्षा शिक्षकपदाची अवहेलना काय असू शकते? म्हणून शिक्षकाशिवाय शिक्षण देण्याची कल्पना तर पुढे येत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शिक्षकदिनी राज्यातील शिक्षकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत आश्वासन दिले आहे, तसे झाल्यास तो शिक्षक आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेसाठी सुदिन ठरेल!

कोरोनाकाळात शाळा आणि शिक्षकांशिवाय शिक्षण याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळे त्यातून तरी आम्ही काही धडा घेणार की नाही? गुरूंची अशीच अवहेलना होणार असेल, तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः’ असे म्हणण्यात अर्थ तो कसला

अध्यक्ष : श्री राजेंद्र तुकाराम पाटील,कोल्हापूर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,कोल्हापूर.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिकेतील शाळा शिक्षकांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे अप्रत्यक्ष पणे लावली जात आहेत. या अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांचा वेळ गेल्यामुळे त्यांचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांना वेळ दिला गेला तरच गुणवत्ता वाढणार आहे. इतर कामे राष्ट्रीय काम म्हणून लावली जात असतील तर सर्वसामान्य,गोरगरीब  जनतेच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणे हे काम राष्ट्रीय नाही का? असा प्रश्न पडतो. यासाठी शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम द्यावे तरच त्याचा सर्वांगीण विकास होणार आहे.

डॉ अजितकुमार  पाटील,राज्यप्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,कोल्हापूर

● शासनामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण सुधारण्यासाठी उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे ●
१ )प्रत्येक शाळेला एक संगणक शिक्षक देणे.
२) गुणवत्तापूर्ण खेळासाठी बीपीएड, एमपीएड क्रीडा शिक्षक नेमणे.
३) कला,कार्यानुभव, साठी कला शिक्षक नेमणे.
४) शाळा तिथे प्रयोगशाळा शिक्षक नेमणे.
५ ) सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळेत वाचमन नेमणे.
सी सी कॅमेरा बसवणे.
६ ) मुलींच्या स्वसंरक्षणासाठी व समुपदेशन महिला अधिकारी नेमणे.
राष्ट्रभक्ती, शिस्त विद्यार्थ्यांना येण्यासाठी एन सी सी अधिकारी शिक्षण देणे.
७) सर्व विद्यार्थ्यांना समान गणवेश देणे.
८) पोषण आहार देण्यासाठी शाळेमार्फत जबाबदारी देण्यात येऊ नये.
९ ) प्राथमिक, माध्यमिक शाळांची वेळ एकच व सुट्टीचे वेळापत्रक राज्यभरात एकच असावे (किमान जिल्ह्यातील नियोजन)
  अशाप्रकारे एकच सूत्र अवलंबले तर शिक्षण, शिक्षक, समाज यामधून एक सक्षम विद्यार्थी घडणार आहे व देशाला एकविसाव्या शतकातील आव्हाने पेळणारा भविष्यातील एक आदर्श नागरिक घडणार आहे त्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध राहू या.मग पहा एक सुंदर स्वप्न असे  दिसेल की,शिक्षक आनंदी, विद्यार्थी आनंदी व समाजातील प्रत्येक घटक सुसंस्कारित दिसेल यात शंका नाही...
  जय हिंद

Wednesday, 25 September 2024

कौतुक विद्यालयामध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी कुंकू समारंभ व पारंपारिक खेळ मोठ्या उत्साहात संपन्न



हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले ) येथील कौतुक विद्यालयामध्ये गणेशोत्सवानिमित्त हळदी कुंकू समारंभ व पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये घागर घुमवणे, सूप नाचवणे, फुगडी, छिया फू यासारख्या पारंपारिक खेळांचा सर्व महिला पालकांनी आस्वाद घेऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

          या प्रसंगी संगीत खुर्ची उखाणे अशा प्रकारचे मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले. खूप उत्साहाने व हिरीरीने सर्व महिलांनी सदर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व आपला आनंद द्विगुणीत केला. यामध्ये अनुक्रमे सूप नाचवणे - रंजना पाटील,छीया फु - सुश्मिता पाटील,घागर घुमवने - विनिता चौगुले, काटवट कणा - सोनम भोसले, संगीत खुर्ची - ऐश्वर्या हवालदार, काळे मंगळसूत्र - कविता चौगुले, 
भांगेत कुंकवाचा टिळा - सुनिता कुंभार, पारंपारिक दागिने - कल्पना माने, एकुलती एक लेक - निशिगंधा माने, सासु सुनेची जोड - सुष्मिता पाटील या महिलांनी बक्षीस पटकावले.    
         कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला पालकांचे तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी
शुभांगी ढवळे, अक्षिता कोळेकर,ज्योती पाटील,करिश्मा खतीब, शीतल कोळी, प्रतिक्षा पाटील,नीता माळी, श्वेता पाटील रुपाली घुघरे  यांनी विशेष परिश्रम घेतले.

फ़ोटो:- कौतुक विद्यालय येथे बक्षीस वितरण करत असताना संचालिका जयश्री भोसले मॅडम व इतर मान्यवर

Monday, 23 September 2024

बुधवारच्या महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठातंर्गत ४६ संघटना एकवटल्या.



कोल्हापूर / प्रतिनिधी

विविध प्रलंबित शैक्षणिक समस्या महाराष्ट्र शासनाने त्वरीत सोडवाव्यात म्हणून बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्था चालक संघ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर  ४६ संघटना सहभागी होणार आहेत.
        शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्ग दर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात महामोर्चा प्रचंडपणे यशस्वी करण्याचा निर्णय झाला.
   या सभेस सचिव आर. वाय. पाटील, प्रा.सी. एम.गायकवाड,भरत रसाळे, बी. जी. बोराडे,शिवाजी माळकर,राजाराम वरूटे,प्रसाद पाटील,सुधाकर निर्मळे,प्रमोद ताैंदकर,रविकुमार पाटील,सुधाकर सावंत,उमेश देसाई,संतोष आयरे,सुनिलकुमार पाटील
अमर वरुटे,संभाजी बापट,सदानंद शिंदे,तुषार पाटील,जयंत पाटील,सर्जेराव सुतार,संदीप पाडळकर,बी.एस. पाटील,नेताजी कमळकर,सुभाष कलागते,मनोहर जाधव,एस.एस. बोरवडेकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
        या महामोर्चात मुख्याधापक संघ, संस्था चालक संघ, शिक्षक भारती,म. रा. कायम विनाअनुदान शाळा संघटना,म. रा. शाळा कृती समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती, कोल्हापूर महानगर माध्य. शिक्षक संघ, शिक्षक परिषद, कनिष्ट महाविद्यालय शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ ( पाटील गट ), प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), स्वाभिमानी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक सेना, शारिरीक शिक्षक संघटना, डीएड सेवक संघटना, प्रयोग शाळा कर्मचारी महासंघ, शासकिय तांत्रिक माध्य. कर्मचारी संघ, शिक्षण संघर्ष संघटना, पदवीधर शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, स्वयंम अर्थसाहय्य शाळा कृती समिती, सुटा, व्यवसाय शिक्षक संघ, डि. बी. पाटील विचार मंच, महानगर पालिका प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, अखिल भारतीय शिक्षक संघ, डीसीपीएस संघटना, महानगर पालिका शिक्षक संघ, मागासवर्गिय शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हा माध्य. कर्मचारी व शिक्षक संघ, आश्रम शाळा शिक्षक संघटना, विभागिय शिक्षण संस्था संघ, माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ, महाविद्यालयीन प्राचार्य संघटना, पालक  संघटना, अपंग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवा संघ, इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा माध्य. शिक्षक संघ आदी ४६ संघटना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत आंदोलनात उतरल्या आहेत.
      फोटा 
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत शिक्षक संघटना पदाधिकारी समवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर,एस. डी. लाड, आर. वाय. पाटील. बी. जी. बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड आदीसह अन्य मान्यवर.

Saturday, 21 September 2024

२५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेऊन महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार.


कोल्हापूर / प्रतिनिधी
१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबोडतोब रद्द करावा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली.शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्ग दर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
        १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा, २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे १ पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय आदेश रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधांने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारन धोरण रद्द करावे, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ  वेतन श्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता टाऊन हॉल येथे एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
      या सभेस सचिव आर वाय पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे,बाबा पाटील, राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के. के. पाटील,राजेश वरक, इरफान अन्सारी, विष्णू पाटील, महादेव डावरे, संजय पाथरे, राजेंद्र सुर्यवंशी, सतीश लोहार, शिवाजी कोरवी, एन. आर. भोसले, राजेंद्र बुवा, संजय पाटील आदी प्रमुख पदाधिकारीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
कोल्हापूर: शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना 
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड आदीसह अन्य मान्यवर.

Monday, 9 September 2024

मौजे वडगाव येथे होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न


हेरले /प्रतिनिधी  
मौजे वडगाव (ता . हातकणंगले) येथील स्वयंभू कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ प्रणित आर्यन्स ग्रुप यांच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्य खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला के . के. भाऊजी यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न झाला .
            होममिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे निवेदन के. के . भाऊजी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य भगिनींनी सहभाग घेतला . महिलांसाठी करमणूक व मनोरंजनात्मक विविध खेळ घेण्यात आले . महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एकदिवस मनोरंजन व्हावे यासाठी होममिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या
            या कार्यक्रमातील प्रथम क्र . व पैठणीच्या मानकरी सौ.मंजूळा चौगुले यांनी बहुमान पटकाविला द्वितीय क्र . अमृता सावंत तर तृतीय क्र . शैलजा तराळ यांनी पटकाविला तसेच उत्तेजनार्थ म्हणून सविता सावंत यांना देण्यात आले . या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्साह प्रचंड विलोभनीय होता .

Tuesday, 3 September 2024

शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय


    कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रात विनाअनुदानीत शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेली ३४ दिवस विविध प्रकारचे आंदोलने सुरु आहेत. मात्र अद्यापी राज्य शासनाने आश्वासन देऊन सुद्धा अनुदानाचा टप्पा वाढीचा आदेश काढलेला नाही. कोल्हापूरात शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर सद्या खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्या सर्वांची प्रकृती  खालावत चालली आहे.  पुढील टप्पा वाढीचा आदेश शासनाने तात्काळ काढावा या मागणीसाठी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने गुरुवार दि.५ सप्टेबर शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक, खाजगी प्राथमिक, महापालिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथील सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
         या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठातंर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ यासह जिल्हयातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत. रस्ता रोको आंदोलन सकाळी ११ वाजता होणार असल्याने सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
      या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड,बाबा पाटील, सुधाकर निर्मळे,राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संतोष आयरे, के. के. पाटील, उदय पाटील, भरत रसाळे, गजानन काटकर, सुनिल कल्याणी, अजित रणदिवे, श्रीधर गोंधळी, शिवाजी भोसले, रणजित सदामते आदीसह  अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
      फोटो 
कोल्हापूर:शैक्षणिक व्यासपीठाच्या  सभेत बोलतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, एस.डी. लाड,दादासाहेब लाड, राहुल पवार, आर. वाय. पाटील, बाबा पाटील आदी.