Tuesday, 15 April 2025

गिरीष फोंडे निलबंन विरोधात निघणा-या मूक मोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिक्षक समाजसेवक म्हणून गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक चळवळीतून शिक्षकांचे प्रश्न मांडणारे तसेच सामाजिक क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध अग्रेसरपणे लढणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक व समाजसेवक गिरीष  फोंडे यांच्या अवैध निलंबनास विरोध करून त्यांचे निलंबन त्वरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मागे घ्यावे यासाठी गुरुवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भवानी मंडपातून महामनगरपालिकेवर निघणा-या भव्य मूकमोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार आहे असा निर्णय व्यासपीठाच्या विद्याभवन येथे झालेल्या सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

   शैक्षणिक व समाजिक चळवळीमध्ये काम करणा-या कार्यकत्यास अशा प्रकारची क्रूर वागणूक देणे हे अन्यायकारक आहे असे उपस्थित विविध संघटनांच्या सदस्यांनी मत वक्त केले. या बैठकीस राहुल पवार,
 आर.वाय. पाटील, राजेश वरक, भरत रसाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, एस. जे. गोंधळी, राजेंद्र कोरे, एस. के. पाटील, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, सुदेश जाधव जयसिंग पोवार,सतिश लोहार,संजय पाटील आर.डी. पाटील आदी उपस्थित होते.

Thursday, 10 April 2025

राज्यात ३१ हजार विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती वितरित

** 

शिष्यवृत्तीसाठी आधार सीडिंग आवश्यक

कोल्हापूर /प्रतिनिधी

नुकत्याच संपलेल्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील ३१ हजार विद्यार्थ्यांना एकूण सुमारे ३८ कोटी रुपये एनएमएमएस शिष्यवृत्ती रकमेकचे वितरण केंद्रशासनाने थेट बँक खात्यावर केले आहे.

महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) अंतर्गत अपेक्षित ४०,५५० पैकी एकूण 36,376 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 35,414 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन 8,937 आणि नूतनीकरण 22,730 अशा एकूण 31,667 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे. 

शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे.
उर्वरित सुमारे 3 हजार सातशे विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत सीडिंग केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले आधार-सीडेड खाते तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

*एनएमएमएस शिष्यवृत्तीचा उद्देश:* 
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत ठेवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना असून, सन 2007-08 पासून ही योजना सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता 8 वीतील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात, असे माजी राज्य समन्वयक तथा कोल्हापूर-कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

*शिष्यवृत्तीचे स्वरूप आणि पात्रतेचे निकष:*

१.इयत्ता 9 वी ते 12 वी अखेर 4 वर्षांसाठी दरमहा 1,000 रुपये (वार्षिक 12,000 रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.

२.पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

३.शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना योजना लागू आहे.

४.केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाच्या वसतिगृह सवलतीतील विद्यार्थी अपात्र असतात.

५.इयत्ता 10 वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेतल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.

६.इयत्ता 10 वीमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण आवश्यक; अनुसूचित जाती/जमातीसाठी 55% गुण आवश्यक.

७.विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आवश्यक असून, संयुक्त खाते ग्राह्य धरले जाणार नाही.

८.विद्यार्थीचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

*उर्वरित विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी ऑफलाइन* 
सन 2024-25 मध्ये निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन एस पी पोर्टलवर या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला नव्हता किंवा अर्ज पडताळणीसाठी शाळा स्तरावर प्रलंबित होते, अशा ४,१७४ पैकी ३ हजार दोनशे विद्यार्थ्यांच्या अर्जांची ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत, जिल्हास्तरावर शिक्षण अधिकारी योजना यांच्याकडून ऑफलाइन पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये योजना संचालनालयाने १५ एप्रिल पर्यंत मागवली आहे. शिवाय त्यातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती आणि बँक तपशील शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. त्यामुळे आधार सीडिंग बाकी असलेल्या ३ हजार सातशे आणि पडताळणी बाकी असलेल्या ३ हजार दोनशे अशा आणखी एकूण ७ विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती मिळेल अशी शक्यता आहे.

*NMMS परीक्षा आणि निकाल:* 
चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मागील डिसेंबर 2024 मध्ये NMMS विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल 1 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्रासाठी 11,682 शिष्यवृत्तींचा कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित करण्यात आला आहे.

 महाराष्ट्राच्या राज्यातील आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर मधून 1703 विद्यार्थांची निवड झाली आहे, तसेच सर्वात कमी मुंबई दक्षिण मधून 45 विद्यार्थांची निवड झाली आहे.

या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती  प्राप्तीसाठी त्यांच्या बँक खात्याचे आधारशी सीडिंग त्वरित करावे. तसेच निकाल आणि आधारवरील विद्यार्थ्याचे नाव आणि जन्मतारीख योग्य असल्याची खात्री करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

Sunday, 6 April 2025

डॉ प्रभुदास खाबडे यांचा सत्कार

हेरले / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे  यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या बद्दल त्यांचा सत्कार माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यावर त्यांनी  पीएचडी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. चळवळ कशी असते यांचा परिपूर्ण अभ्यास करून पीएचडी मिळवली या ज्ञानाचा उपयोग करून  समाजात नक्कीच चांगले काम करून दाखवणार यासाठी पुढील वाटचालीस त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार कार्यक्रमासाठी माजी सभापती राजेश पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, माजी उपसरपंच विजय भोसले, मुनीर जमादार, रवी चौगुले, मंदार गडकरी, शशुपाल कुरणे, बाळासो चौगुले, अशोक कदम, कांत कुरणे, सनातन कदम, बाबुराव भोसले, प्रशांत खाबडे, जालिंदर उलस्वार, रणजीत कटकोळे आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोटो 
डॉ प्रभुदास खाबडे यांचा सत्कार करतांना माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील मुनीर जमादार, विजय भोसले आदी.