Friday, 27 June 2025

उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरच्या सहाय्यक सचिव पदी नियुक्ती

हेरले / प्रतिनिधी

माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपशिक्षणाधिकारी  गजानन उकिर्डे  
यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरच्या सहाय्यक सचिव पदी नियुक्ती झाली.
   उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांची सेवेची  सुरवात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे मध्ये  सहा. शिक्षक पदी होऊन जुनियर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन १७ वर्षे केले . नंतर त्यांनी लोकसेवा आयोग परीक्षा देऊन ते महाराष्ट्र शासनामध्ये कडेगाव जिल्हा सांगली येथे गटशिक्षणाधिकारी पदी कामकाज केले. तदनंतर त्यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हातकणंगले या पदावर काम केले. पुढे त्यांनी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर या पदावर चांगले काम केले व नुकतीच त्यांची सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे नियुक्ती होऊन हजर झाले. त्यांची या पदी नियुक्ती झालेबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी योजना डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सत्कार केला.

फोटो
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी योजना डॉ. एकनाथ आंबोकर  माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूरचे उपशिक्षणाधिकारी  गजानन उकिर्डे यांचा
सत्कार करतांना.

Friday, 13 June 2025

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि संघटनांच्या वतीने निदर्शने

कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांच्यावर कारवाई 
होणेसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्यरत संयुक्त संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर  निदर्शने करून  लेखी निवेदन  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
      लेखी निवेदनातील आशय असा की,
दि. ०२ जून २०२५ ते दि. १२ जून, २०२५ पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यभर चालू होते. या प्रशिक्षणामधील कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या प्रशिक्षणास मुकावे लागले आहे. कारण प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी सक्तीची केली होती व ती सही अपलोड झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून लीव्ह (Leave) करण्याचे आदेश SCERT चे संचालक  राहूल रेखावर यांनी दिलेले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर अतिनिर्बंध  लादले गेले. या विहित वेळेत पोहोचण्याच्या भितीपोटी चिपळून ते रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मिनी बसचा अपघात होऊन ३० शिक्षक जखमी झाले व त्यातील काही गंभीर जखमी शिक्षक मृत्यूशी झुंज देत आहेत.
    यास केवळ SCERT चे संचालक  राहूल रेखावार यांचा हेकेकोरपणा कारणीभूत आहे. या अपघातानंतर सध्या  राहुल रेखावर यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काहीही संबंध नाही असे धक्कादायक विधान देवून आपली असंवेधनशीलता सिद्ध केलेली आहे. त्याच्या या हिटलरी वृत्तीमूळे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आनंददायी होण्या ऐवजी त्रासदायक झाले.
  अनेक संघटनांनी मागणी करूनही किरकोळ ५/१० मिनीट लेट आलेल्या शिक्षकांच्या अनुउपस्थितिचा कालावधी क्षमापित केलेला नाही. तर त्यांना या प्रशिक्षणातून Leave करून परत घालविले आहे. तसेच वेळेत लिंक ओपन न झाल्याने व सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापनाचा फज्जा या प्रशिक्षणामध्ये उडालेला आहे. या सर्वास संचालक राहूल रेखावार यांचे असहिष्णूता कारणीभूत आहे. म्हणून आम्ही या निवेदनाव्दारे मागणी करतो की, किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावे व SCERT चे संचालक  राहूल रेखावार यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून SCERT चा कारभार काढून घ्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाव्दारे आम्ही करत आहोत. अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,
सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे , सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, मिलींद बारवडे ,उमेश देसाई ,राजेंद्र कोरे, आर डी पाटील, प्रा. सी एम गायकवाड,'राजाराम वरुटे, राजेश वरक, विलास पिंगळे ,दिलीप माने,शिवाजी भोसले , महादेव डावरे , सविता गिरी, सुभाष जाधव, बाबा पाटील, मनोहर जाधव, संजय पाटील, सुरेश संकपाळ, आदिसह अन्य मान्यवर.

फोटो
कोल्हापूर : जिल्हा अधिकारी कार्यालया समोर निदर्शने करतांना अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड,सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे , सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे उमेश देसाई सह अन्य पदाधिकारी

हेरलेतील १६ वर्षाखालील राष्ट्रीय कब्बड्डी खेळाडू कु. समर्थ ठोंबरे याची १८ वर्षाखाली जिल्हा कब्बड्डी संघात निवड न करून त्याच्यावर केला अन्याय

हेरले / प्रतिनिधी

   हेरले (ता. हातकणंगले) येथील कु. समर्थ कुमार ठोंबरे ( वय १६ )याची मार्चमध्ये संपन्न झालेल्या १६ वर्षाखालील बिहार येथील ३४ वी राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेत निवड होऊन उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला मात्र त्याची १८ वर्षाखालील होणाऱ्या कब्बड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने निवड केली नाही. १६ वर्षाखाली एका राष्ट्रीय खेळाडूची जिल्हा संघात निवड केली जात नाही. हा अन्याय या खेळाडूवर झाला आहे. असा अन्याय पुन्हा कोणा कब्बड्डी खेळाडूवर होऊ नये म्हणून १६ वर्षाखालील कु. समर्थ ठोंबरे याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून  कशी निवड झाली याची सविस्तर माहिती  जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.
     समर्थ हा इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असले पासून वयाच्या दहाव्या वर्षापासून जयशिवराय कब्बडी  संघात खेळतो आहे. गेली पाच वर्षे तो खुपच चांगला सराव करीत असल्याने  त्याचा खेळ खुपच उत्कृष्ट झाला. या त्याच्या उत्कृष्ट खेळाचे यश म्हणजे १५ ते १६ फेब्रुवारी २०२५ मध्ये इचलकरंजी येथे बालभारत मंडळाने किशोर गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत  त्याने खेळ उत्कृष्ट केल्याने त्याची जिल्हा संघात निवड झाली. त्याच्या या यशामुळे  २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथे किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत खेळण्याची संधी मिळून राज्य खेळाडू म्हणून उदयास आला. या स्पर्धेत ही उत्कृष्ट खेळ केल्याने त्याची
 कोल्हापूर जिल्हयातून एकमेव निवड  राष्ट्रीय खेळाडू म्हणून बिहार येथील २७ ते ३० मार्च २०२५ मधील ३४ राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी  झाली. या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान आपल्या कब्बड्डी खेळाच्या जोरावर मिळविला.
  कु. समर्थ हा १६ वर्षाखालील वयोगटात राष्ट्रीय खेळाडू होत असतांना त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर  उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत शिखर गाठले असता त्याची कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने  १८ वर्षाखाली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड का केली  नाही, हा प्रकार काय? याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. 
   मुले कब्बड्डी खेळाचा सराव करीत असतांना खुप कष्ट घेतात त्यांची स्वप्ने जिल्हा खेळाडू, राज्य खेळाडू ,राष्ट्रीय खेळाडू होण्याची असतात. त्यांना या यशामुळे शासकिय किंवा खाजगी नोकरीत संधी मिळू शकते. त्यांना या खेळाच्या यशातून जिवनात नोकरीच्या माध्यमातून  आर्थिक स्थर्ये प्राप्त होऊ शकते. मात्र उत्कृष्ट खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करूनही त्यांची  जिल्हा संघातच निवड होऊ शकत नसेल तर त्यांची स्वप्ने अधुरीच राहणार.
   १६ वर्षाखालील राष्ट्रीय खेळाडू  कु. समर्थ कुमार ठोंबरेची १८ वर्षाखालील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड न करता त्याच्यावर झालेला जो अन्याय आहे. तो अक्षम्य आहे. अशा प्रकारे कोणत्याही कब्बड्डी खेळाडूवर असा अन्याय होऊ नये यासाठी ही माहिती
जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी आदी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.

Thursday, 12 June 2025

वयोवृद्ध शेतकऱ्याला कर्तव्यदक्ष पोलीसांचा मदतीचा हात. कर्तव्यतत्पर पोलिसांचा वाहतूक शाखेतर्फे सत्कार


हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील पोलीस हावलदार बाबासाहेब कोळेकर यांनी वयस्कर व्यक्तीला मदत करून त्याची ६८ हजारांची रक्कम नातेवाईकाकडे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुपूर्द केल्याबद्दल पोलीस अंमलदार बाबासाहेब कोळेकर पोलिस अंमलदार जितेंद्र भोसले, सुरेंद्र खाडे  यांचा सन्मान शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सत्कार केला.
   संपत महादू ढगे (वय ७५, रा. नारोली सुपा जि. पुणे) हे तावडे हॉटेल कमानीजवळ रस्त्याकडेला पडलेले मिळून आले. पोलिस हावालदार बाबासाहेब कोळेकर यांना माहिती मिळताच त्याला मदत करण्यासाठी सहकारी जितेंद्र भोसले व सुरेंद्र खाडे यांना बोलावून घेतले. यावेळी वयस्कर व्यक्ती दारू प्यायल्याचे समजले. त्याच्या हातात पैशांचे बंडल होते. पोलिसांनी त्याचा पत्ता, संपर्क क्रमांक विचारून घेतला. संबंधित व्यक्तीच्या मुलाशी संपर्क झाल्यानंतर  संपत ढगे यांच्याजवळ ६८ हजारांची रोख रक्कम असल्याचे समजले.मुलाशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी दोन नातेवाईकांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी ही रक्कम नातेवाईकांच्या ताब्यात देऊन वयस्कर व्यक्तीला पुणे येथे जाण्यासाठी मदत केली. याबद्दल वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी तीन वाहतूक पोलिसांचा विशेष सन्मान केला.

फोटो 
पोलीस अंमलदार बाबासाहेब कोळेकर, जितेंद्र भोसले, सुरेंद्र खाडे  यांचा सन्मान शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे करतांना.

Wednesday, 11 June 2025

जून-जुलै २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी हॉल तिकीट लवकरच

कोल्हापूर / प्रतिनिधी
   जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन  प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दिनांक १२/०६/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील.
अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ यांनी दिली.
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा जून जुलै २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना जून-जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दिनांक १२/०६/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. 
या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
      चौकट
पुरवणी परीक्षेसाठी शाळामार्फत परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. 24 जून पासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात इयत्ता दहावी साठी 2377 आणि बारावी साठी 4822 असे एकूण 7199 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. 
   तर कोकण विभागीय मंडळा अंतर्गत इयत्ता दहावीसाठी 192 आणि बारावी साठी 397 असे 589 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अतिविलंब शुल्कासह पुनर्परीक्षार्थींना अर्ज भरता येणार आहे.
-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.

Monday, 9 June 2025

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व शैक्षणिक समस्या सोडविणे यास प्राधान्य नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत


कोल्हापूर / प्रतिनिधी

   माझ्याकडे प्रशासकिय अनुभव पुष्कळ असल्याने या जिल्हयातील शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा अधिकाधिक विकास करणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या कामात सर्व शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांनी सहकार्य करावे, असे उदगार जिल्ह्याच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी काढले.
       कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने  अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांचा सत्कार करून स्वागत केले. या प्रसंगी एस. डी. लाड यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्वलंत समस्या स्पष्ट करून त्या सोडविण्यास प्रयत्नशील राहूया अशी विनंती केली.
  तसेच नूतन उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले यांचाही सत्कार एस. डी. लाड यांच्याहस्ते करण्यात आला.या प्रसगी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, अधिक्षक प्रविण फाटक, विस्तार अधिकरी डी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

    या शिष्टमंडळात प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे,आर. डी. पाटील, राजेश वरक, मिलींद बारवडे, मनोहर जाधव, आर. बी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    फोटो कॅप्शन
 शैक्षणिक व्यासपीठ  अध्यक्ष एस. डी. लाड नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांचा सत्कार करतांना शेजारी सुधाकर निर्मळे, प्रा. सी. एम.गायकवाड आर. डी. पाटील, राजेश वरक व अन्य मान्यवर