Saturday, 29 October 2016

नरक चतुर्दशी

kolhapur mh9live news

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारतात त्या दिवशी कर्तिक कृष्ण चतुर्दशी असते.या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची ) प्रथा आहे असे मानले जाते.
या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लौकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
वाग्भट याने रचलेल्या अष्टांगहृदय या ग्रंथात दिलेला श्लोक असा आहे:
अभ्यंगमाचरेतन्नित्यं स जराश्रमवातहा |
दृष्टिप्रसाद्पुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढयंकृत् ||
अर्थ:(थंडीच्या दिवसांत) रोज केलेले अभ्यंगस्नान हे जरा(वृद्धत्व) ,श्रम आणि वात(वातदोष) यांचा नाश करते. ते दृष्टी चांगली करणारे, त्वचेला कांती देणारे तसेच शरीर दृढ करणारे आहे.
रोज असे तेल लावून स्नान करणे शक्य नसल्यास किमान डोक्यास तरी तेल लावून स्नान करावे.
चरकसंहितेत चरकांनी सांगीतल्याप्रमाणे:
मूर्धोSभ्यंगात् कर्णयोःशीतमायु, कर्णाभ्यंगात पादयोरेवमेव |
पादाभ्यंगान्नेत्ररोगान् हरेश्च,नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत् | 
अर्थात: डोक्यास तेल लाउन मर्दनाने कानविकार दूर होतात.कानाचेभोवती,पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो.डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दनाने दातांचे रोग नष्ट होतात.(बदाम तेल,तिळ तेल इत्यादी.)(तीव्र तेले जसे सरसू,करडई इत्यादी वापरू नयेत.)

आख्यायिकI

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.


No comments:

Post a Comment