दिवाळी सण मोठा नाही आनंदास तोटा असे असले तरी काही लोकांकडे परिस्थितिमुळे अंग झाकण्यापुरतेही कपडे नाहीत , हीच गोष्ट खटकली आणि काही युवकांच्या ‘व्हॉट्स अॅप’वरील एका ग्रुपवरील संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरातील सीपीआर चौकात उभी राहिली.
घरातील चांगले पण वापरात नसलेले कपडे स्वच्छ व घडी करुन या भिंतीवर आणून ठेवले जातात. गरजू त्यांच्या मापानुसार ते घेऊन जातात. गुरुवारपासून सुरू झालेली ही भिंत गोरगरिबांसाठी दिवाळी भेटच ठरते आहे.
प्रसाद पाटील , सुरज पाटील , अमर पाटील यांनी या भिंतीची संकल्पना ‘व्हॉट्स अॅप’वरील एका ग्रुपवर मांडली. त्यास आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत प्रोत्साहन दिले.
समाजातील मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला व दोनच दिवसांत शहरात ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली.
सकाळी आठपासूनच पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने- नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या.
कोल्हापुरातील सीपीआर चौकात गुरुवारी ‘माणुसकीची भिंत’ संकल्पनेतून गोरगरिबांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील , महापौर अश्विनी रामाणे, गणी आजरेकर, प्रसाद पाटील , सुरज पाटील , अमर पाटील आणि माणुसकीची भिंत ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.हा उपक्रम दि २७ ते ३० ऑक्टोबर पर्यंत सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरु राहणार असुन करवीरवासियांनी यात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment