Monday, 7 May 2018

वाहनविमा हवाच !


मोटारीचा, वाहनाचा विमा हा अपरिहार्य आहे. मोटार, आतील प्रवासी, चालक तसेच मोटारीमुळे कोणाचे नुकसान झाले, तो जखमी झाला, वा त्याचा मृत्यू झाला, तर त्यासाठी विम्याची रक्कम विमा कंपनीतर्फे मिळू शकते. न्यायालयाने सुनावलेली सजा काहीवेळा भोगू शकाल पण एखाद्याच्या मृत्यूने झालेला आघात त्यामुळे भरून येणार नाही. मात्र काही प्रमाणात अशावेळी मोटारीचा विमा कामास येऊ शकतो. असा हा विमा नेमका काय प्रकारचा असतो ते पाहू. मोटारीच्या देखभालखर्चामधीलच हा एक वाटा आहे, त्याचप्रमाणे ती तुमची जबाबदारी आहे हे पक्के ध्यानात असूद्या.

मोटार वा वाहन मग ते चार चाकी असो वा दुचाकी, ट्रक असो वा बस; वाहन हे रस्त्यावर आणायचे झाले तर कायदेशीरदृष्टया काही अपरिहार्य वा सक्तीच्या बाबी पाळाव्याच लागतात. त्यांचे पालन करण्याने नुकसान नव्हे तर फायदाच असतो, ही बाब प्रत्येक वाहन मालक-चालकाने लक्षात ठेवायला हवी. मोटारींची आरटीओकडे नोंद असणे ही जशी कायद्याने सक्तीची बाब आहे, तसेच वाहन रस्त्यावर ज्या वेळी तुम्ही आणता तेव्हा त्याचा विमा उतरविण्यात आलाच पाहिजे, हीदेखील कायद्याने सक्तीची बाब आहे व ती नक्कीच तोटयाची नाही. त्या विमा पॉलिसीनुसार व कायद्यानुसार त्या कृतीचे पालन करण्याने नुकसान टाळता येते हे महत्त्वाचे.

वाहन प्रवासी असो वा मालवाहू, व्यावसायिक उपयोगाचे असो वा वैयक्तिक वापराचे, प्रत्येक वाहनाला विमा हा सक्तीचा आहे. त्यात तुमच्या वाहनाचे मूल्य किती, ते नवीन आहे का, त्याला किती वर्षे वापरून झाली आहेत, त्याच्या विम्यासाठी किती प्रीमियम भरला आहे, आदी बाबी ध्यानात घेऊन विमा किती ठरविला जातो, त्याचा प्रीमियम किती, त्यावर वाहनाच्या अपघाताबाबत होणार्या दाव्यात दिल्या जाणार्या नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली जाते. काहीशा सोप्या भाषेत सांगायचे तर, वाहनाला अपघात-दुर्घटनेमध्ये नुकसान झाल्यास वा माणसाला-माणसांना इजा झाल्यास वा प्राणहानी झाल्यास वा मालमत्तेचे नुकसान झाल्यास ते पैशामध्ये भरून देण्याचे वाहन विमा हे उपयुक्त साधन आहे.

वाहन विमा दोन प्रकारांमध्ये १) थर्ड पार्टी पॉलिसी (टी.पी.) विमा व २) पॅकेज पॉलिसी, ज्याला कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलिसी असेही म्हणतात. या दोन प्रकारांची प्राथमिक माहिती खालीलप्रमाणे-

थर्ड पार्टी पॉलिसी ज्या वाहनासाठी थर्ड पार्टी पॉलिसी विमा उतरविण्यात आलेला असेल, त्या वाहनाला अपघात झाल्यास त्या वाहनामुळे तिसर्या पक्षाचे म्हणजे अन्य एखाद्या वाहनाचे, मालमत्तेचे वा एखाद्या व्यक्तीचे काही नुकसान झाले असेल, तर या प्रकारच्या विम्यातून त्या तिसर्या पक्षाची झालेली हानी ही या विम्याद्वारे विमा कंपनीकडून देण्यात येते. अर्थात वाहनाचा विमा ज्या मूल्याने उतरविण्यात आला असेल, त्याच्या ठरलेल्या मापदंडानुसार ही हानी भरून दिली जाते. हा विमा उतरविलेल्या ज्या वाहनाद्वारे हा अपघात झाला असेल, त्या वाहनाचे मात्र काही नुकसान झाले असल्यास त्याची क्षतिपूर्ती विमा कंपनीकडून केली जात नाही. विम्याचा लाभ हा तिसर्या पक्षाला होतो, यासाठी या पॉलिसीला थर्ड पार्टी इन्शुरन्स असे म्हणतात.

या प्रकारातील पॉलिसीमध्ये समजा एखाद्या स्कूटरचा या प्रकारातील विमा उतरविण्यात आला असेल आणि त्या स्कूटरमुळे अपघात झाला व त्यामुळे तिसर्या इसमाच्या वाहनाचे वा मालमत्तेचे वा त्याच्या शरीराला इजा झाली अशा प्रकरणात त्या पक्षाला विमा कंपनीकडून नुकसानाची भरपाई दिली जाते. मात्र हा विमा ज्या मूल्याचा असेल त्या अनुषंगाने नुकसानभरपाई देण्याची एक रक्कम त्या मूल्यानुसार निश्चित करण्यात आलेली असेल त्या रकमेइतकीच ही नुकसानभरपाई दिली जाऊ शकते.

पॅकेज पॉलिसी वा कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलिसी या प्रकारच्या पॉलिसीमध्ये एखाद्या वाहनासाठी विमा उतरविल्यास त्यामध्ये विविध प्रकारचे फायदे अपघात झाल्यास होऊ शकतात. त्या वाहनामुळे अपघातामध्ये नुकसान झालेल्या दुसर्या वाहनाचे, मालमत्तेचे वा जखमी इसमासाठी वा त्यात मरण पावलेल्या तिसर्या व्यक्तीसाठी तसेच या विमा उतरविलेल्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई होऊ शकते. त्याचप्रमाणे वाहनाच्या चालकाचा मृत्यू झाल्यासही त्यात काही तरतूद असते. त्याचप्रमाणे विमा उतरविलेल्या या वाहनात असलेल्या आसनक्षमतेनुसार त्यामध्ये बसलेल्या व अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांसाठीही विमा नुकसानभरपाई देऊ शकतो. समजा, मोटारीचा विमा उतरविला आहे, त्या मोटारीतील प्रवाशांची आसनक्षमता आरटीओने ठरवून दिलेल्या नियमानुसार ४ प्रवासी व एक चालक अशी पाचजणांची असेल; परंतु अपघाताच्या वेळी सहा-सातजण बसलेले असतील, तर त्या सहा-सात जणांना त्याचा फायदा होत नाही. नियमाप्रमाणे जितकी आसनक्षमता असेल तितक्याच प्रवाशांसाठी हा विमा फायदेशीर ठरतो. उर्वरित लोकांना विम्याचा लाभ दिला जात नाही. म्हणजेच पाचजणांची आसनक्षमता असलेल्या या वाहनातील पाचपेक्षा जास्त असणार्या प्रवाशांना विम्याचा लाभ या पॉलिसीद्वारे दिला जात नाही. बेकायदेशीर प्रवास करणार्या या प्रवाशांना जसा लाभ मिळत नाही त्याचप्रमाणे वाहन अयोग्य कारणासाठी वापरले जात असेल, म्हणजे खासगी वाहन टुरिस्ट म्हणून वापरताना आढळले तरीही विम्याचा फायदा मिळत नाही.

या पॉलिसीमधील आणखी एक फायदा म्हणजे वाहनचालकासाठी आहे. अपघातात त्या वाहनचालकाचा मृत्यू झाल्यास त्याला पॉलिसीच्या विमा प्रीमियमनुसार जो फायदा मिळतो, त्यासाठी अधिक रक्कम वेगळी भरल्यास तो फायदाही वाढू शकतो.

सध्या खासगी विमा कंपन्याही मोठया प्रमाणात विमा क्षेत्रात उतरल्या आहेत. पॅकेज पॉलिसीमध्ये आरटीओ नियमानुसार वाहनाचे आयुष्य १५ वर्षे मानले गेले आहे. १५ वर्षांनंतर मात्र ही पॉलिसी त्या वाहनासाठी घेता येत नाही. त्यासाठी थर्ड पार्टी पॉलिसीच घ्यावी लागते. मात्र निमसरकारी विमा कंपन्या पूर्वीच्याच काही धोरणांवर चालू असल्याने १५ वर्षांची कालमर्यादा या वाहनांसाठी आहे, पण ती ओलांडली असेल व या १५ वर्षांच्या काळात या वाहनासाठी एकही अपघात दावा केला गेला नसेल तर या पॅकेज पॉलिसीचा लाभही निमसरकारी विमा कंपन्या देऊ शकतात. मात्र ते त्या त्या शाखेच्या व अधिकार्याच्या निर्णयावर अवलंबून असते. अर्थात हा अपवाद जरी असला तरी तो विमा उतरविण्याबाबत विमा कंपन्यांच्या त्या त्या वेळच्या निर्णय व धोरणावर अवलंबून असणारी बाब आहे. खासगी विमा कंपन्या मात्र अशा प्रकारे १५ वर्षे झालेल्या वाहनांना पॅकेज पॉलिसी देत नाहीत. अर्थात हा विमा म्हणजे एक प्रकारची कंपन्यांच्या दृष्टीने रिस्क फॅक्टर असतो हे नक्की. थोडक्यात काय, तर वाहन कोणतेही असो, दुचाकी, चारचाकी, ट्रक, अवजड वाहन, त्यांना विमा उतरवावाच लागतो. ते वैयक्तिक वापरासाठी असो वा खासगी वापरासाठी असो, त्यांना वाहन रस्त्यावर आणताना विमा उतरवावाच लागतो. तो न उतरविता वाहन रस्त्यावर आणून चालविणे हा गुन्हा तर आहेच, पण त्याहीपेक्षा तो वाहनमालक, चालक, पादचारी व अन्य वाहने यांच्यासाठीही गंभीर धोका ठरू शकतो, याची प्रत्येकाने जाणीव ठेवायला हवी.


इंटरनेट वेगवान यावेबसाईटच्या सौजन्याने 

No comments:

Post a Comment