बदनापुर/ प्रतिनिधी तालुक्यात काही दलालांमार्फत घरोघरी जाऊन कामगारांना तुमचे पैसे येणार असून तुम्ही यासाठी 500 रुपये अथवा काही ठराविक रक्कम द्या व तुमचे कागदपत्रे द्या, असे सांगून फसविण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोणीही फसवत असेल तर त्याची तक्रार जवळील पोलिस ठाण्यात बांधकाम कामगारांनी करावी, असे आवाहन शेख यकीन यांनी केले आहे.
देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. सबंधित नोंदणीकृत सक्रीय (जिविंत) कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई येथून होणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी करू नये व प्रशासनास सहकार्य करावे.