प्रतिनिधी
सध्या संपूर्ण देशामध्ये लॉक डाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत.अनेकांना आहे त्या ठिकाणीच थांबण्याची वेळ आली आहे.याला सुट्टीवर आलेले जवान सुद्धा अपवाद नाहीत.
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावचे काही जवान लॉक डाऊन पुर्वी सुट्टीवर आले होते.अचानक संचारबंदी लागू झाली आणि एस.टी,रेल्वे, विमानसेवा सुद्धा बंद करण्यात आली. देशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले जवान गावातच अडकून पडले.
देशावर संकट आलेले असताना आपण घरात बसलो आहोत याची खंत मनात होती.आशा वेळी गावचे सरपंच,उप-सरपंच, सदस्य व पोलिस पाटील यांच्या सहकार्याने गावाबाहेरील रस्त्यावर चौकी उभा करण्यात आली आहे. तिथे काही तास ड्यूटी करण्याचा निर्णय घेतला.
संकटाच्या काळात ज्या माजी सैनिकांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शासनाने केले होते. मात्र सैनिक टाकळी येथील बहुतांश माजी सैनिक वयोवृद्ध आहेत. काही माजी सैनिक अन्य ठिकाणी नोकरी करत आहेत. असेही आर्मी,नेव्ही, एअर फोर्स व पोलिस दलाच्या माध्यमातून गावचे जवान तैनात आहेच. पण शासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत सुट्टीवर आलेल्या जवानांनी स्वतः नियमांचे पालन करत गावची सीमा सांभाळली आहे.
सैनिक टाकळी शंभर टक्के लॉक डाऊन झाली आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या माणसांची नोंद ठेवली जात आहे. ग्रामस्थांना घरातच राहाण्याचा आग्रह केला जातो आहे. मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याला सैनिक टाकळी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या दवाखाना, मेडिकल चोवीस तास सुरू आहेत.दूध डेअरी एक तास, किराणा दुकान सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असते.इतर वेळी गावात शुकशुकाट दिसत असतो. यामुळे कोरोणाचा प्रसारच नव्हे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते मतभेद विसरून स्वतः बरोबर इतरांची काळजी घेत आहेत.
सैनिक टाकळीमधील सरपंच सौ.हर्षदा पाटील, उपसरपंच सुदर्शन भोसले, सदस्य संतोष गायकवाड,बाबासो बाबर, वाल्मिक कोळी, योगेश कोष्टी, बबन चावरे,गाव कामगार पोलिस पाटील सौ. सुनिता पाटील व इतर स्वयंसेवक अमर पाटील, मोहन पाटील, संताजी पाटील, प्रदीप पाटील, वैभव पाटील, अभिजित वासमकर, नेताजी पाटील, स्वप्नील पाटील,अमोल पाटील, स्वराज्य करिअर अॅकॅडमीचे अध्यक्ष विनोद पाटील व सुट्टीवर आलेल्या जवानांचे कौतूक होत आहे.