Sunday, 26 April 2020

सर्व शिधापत्रिका धारकांना वर्षभर सवलतीच्या दरात धान्य द्या : खासदार माने - - पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


पेठवडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना वर्षभर सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावे व शिधापत्रिकाधारकांचे फेर सर्वेक्षण करावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविता यावी त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने संमत केला आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्राधान्य (अंत्योदय) आणि प्राधान्य (इतर) अशाच दोनच शिधापत्रिका आहेत व या शिधापत्रिकानुसार धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेचे व बी.पी.एल.च्या सर्व लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर या व्यतिरिक्त ए.पी.एल. लाभार्थ्यांपैकी शहरी भागातील योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना 15001 ते 59000 इतके वार्षिक उत्पन्न तर ग्रामीण भागातील योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना 15001 ते 44000 पर्यंत इतके वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. तर ए.पी.एल. चे जे लाभार्थी या योजनेत येत नाही अशा लाभार्थ्यांना सध्याच्या प्रचलित दराने धान्य देण्यात येते ; मात्र याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वितरित होत असताना तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे. यामध्ये उत्पन्नाच्या अटीवर एकही लाभार्थी हक्काच्या धान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन  प्राधान्य (अंत्योदय) आणि प्राधान्य (इतर) ची नवीन यादी तयार करावी.  जेणे करून गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविण्यासाठी व प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळावे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पात्र शिधापत्रिका धारकांना तीन महिन्यासाठी मोफत व सवलतीच्या दरात धान्य दिले जात आहे. हे पात्र शिधापत्रिका धारकांसोबतच सर्वच शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे. तसेच कोरोनाच्या संकटाचे परीणाम दुर्गामी असून, नागरिकांचे आर्थिक नियोजन पूर्णतः कोलमडणार आहे. त्यामुळे सरसकट सर्व शिधापत्रिका धारकांना वर्षभर सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी खासदार माने यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment