कोल्हापूर - ज्ञानराज पाटील
सध्या कोरोना लसी विकसित करण्यात अनेक देश गुंतले आहेत. त्यातही प्रमुख प्रश्न येतो तो लस यशस्वी होईल का ? सामान्य माणसाला पडलेला साधा प्रश्न एकदा लस टोचल्यावर मला कोरोना पासूून मुक््ती मिळेल का ? तर याचे उत्तर हो आणि नाही असे असेल. कोणतेही विषाणू इतरांच्या शरीरातील काही प्रथिनांचा आपल्यासाठी उपयोग करून घेतात, अशी प्रथिने शोधून त्यांना निकामी करणे हा एक उपाय केला जातो. या अतिशय किचकट कामातून लस बनवली तरी पुढे एक अडथळा उभा ठाकतो तो विषाणूंकडून केल्या जाणाऱ्या ‘म्युटेशन्स’चा !
विषाणू आपल्या गुणधर्मामध्ये सातत्याने बदल करतात. त्यामुळे मोठय़ा कष्टाने आधी विकसित केलेली लस एकाच फटक्यात निकामी ठरते. त्यामुळे नवी लस विकसित केल्यापासून ते विषाणूंकडून त्यावर मात करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ‘म्युटेशन्स’च्या दरम्यानच्या काळातच फक्त दिलासा मिळतो. त्यामुळेच मोजके काही विषाणू वगळता इतर विषाणूंवर मात करणे जमलेले नाही. देवी, पोलिओसारख्या विषाणूंच्या रोगांवर सध्या तरी नियंत्रण मिळालेले दिसते. या लढाईत माणसाने मिळविलेले हे मोठे यश आहे. पण त्याच वेळी एड्सला कारणीभूत असलेल्या ‘एचआयव्ही’, तसेच, ‘एन्फ्लूएन्झा-ए’ या जातकुळीतील बर्ड फ्लू व स्वाईन फ्लू यांचे नवनवे विषाणू निर्माण होतच आहेत. एड्सचा धोका टाळण्यासाठी गेली पंधरा-वीस वर्षे जगभर प्रचंड पैसा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून भगीरथ प्रयत्न केले जात आहेत. तरीसुद्धा त्याच्यावर नियंत्रण मिळाल्याची परिस्थिती नाही. हेच फ्लूबाबतही खरे आहे. त्यामुळेच तर याबाबत गेली कित्येक दशके संशोधन व लसी विकसित करणे सुरू असले तरी दरवर्षी हिवाळ्यात जगभर कोटय़वधी लोकांना फ्लू होतो आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होतो. माणसाच्या विषाणूंशी असलेल्या या लढाईला त्यामुळेच या लढाईला अंत नाही.
या लढाईत माणसाने आपली सोशल डिस्टन्सिंगचे अस्त्र जपून वापरण्याची गरज आहे. आपल्याकडे असलेली ब्रह्मास्त्रे साध्या-साध्या लढायासाठी वापरली तर ती लवकर निष्प्रभ ठरण्याचा धोका असतो. तशी अनेक अस्त्रे निष्प्रभ ठरलीच आहेत. आगामी काळात याकडे अधिक लक्ष द्यायला लागणार आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, नियमित सॅनिटायझर आणि मास्कचा वापर हा सक्तीचे होणार आहे कारण माणसानेच निसर्ग व पर्यावरणात काही बदल घडवून आणले आहेत त्यामुळे माणसाला आता निसर्गाच्या सांगण्याप्रमाणे वागावे लागेल.