Friday, 5 June 2020

कोरोना पार्श्वभूमीवर घरोघरी वटपौर्णिमा साजरी - सोशल डिस्टन्सिंगचे संपूर्ण पालन


कसबा बावडा प्रतिनिधी -

कोल्हापूर शहरासह कसबा बावडा परिसरात सर्वत्र कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत वटपौर्णिमा सण घरगुती स्वरूपात साजरा करण्यात आला.  जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोकामना बाळगत ही वटपौर्णिमा  साजरी करण्यात आली.

इतर वेळी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून वडाच्या झाडाचे पूजन, किंवा सणाच्या नावाखाली फांद्यांची होणारी तोड रोखत यावेळी घरोघरी प्रत्यक्ष वडाचे रोप लावून काठापदराच्या साड्या, गजरा, सौभाग्यालंकारांचा साज लेवून महिलांनी निसर्गापुढे पतीच्या दिर्घायुष्याची व साताजन्माच्या सहवासाची कामना केली.

पावसाच्या आगमनाची चाहूल देणारी वटपौर्णिमा म्हणजे निसर्गाप्रतीची आदराची भावना. सावित्रीने यमाच्या तावडीतून पतीचे प्राण आणले ही पौराणिक कथा या दिवसाला जोडलेली असली तरी त्यातून वडाच्या झाडाचे असलेले औषधी महत्व आणि निसर्गाचे रक्षण अधोरेखित केले आहे. यामुळे दरवर्षी स्त्रिया एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी वडाच्या झाडाला सुत गुंडाळून पूजन करतात पण यावेळी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपास प्रत्येक घरी स्वतंत्रपणे अशी कुंडीतील रोपांची पूजा करण्यात आली. यामुळे सण समारंभला सुद्धा मर्यादा आल्या आहेत. काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे सण समारंभात बदल घडून येत आहेत.
          नेहमी सकाळपासूनच शहरातील पेठा, गल्ली , कॉलन्यातून काठापदराच्या हिरव्या साड्या शालू परिधान करुन आणि सौभाग्यालंकारांचा साज लेवून महिला घराबाहेर पडायच्या .  रस्त्यांवर हातात पूजेचे ताट घेवून सजून धजून निघालेल्या महिला दिसायच्या . ठिकठिकाणी वडाच्या झाडासमोर पूजनासाठी   महिलांची प्रचंड गर्दी दिसायची हा प्रकार आज पूर्णपणे कमी झाला असून घरोघरी किंवा गल्ली व कॉलनीत वैयक्तिकरीत्या वट पौर्णिमा पूजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment