एस. एम. वाघमोडे (गांधीनगर प्रतिनिधी )
घरातून हरवलेल्या लाईन बाजार ,कसबा बावडा येथील एका मनोरुग्ण वृद्ध व्यक्तीस मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्लीच्या कोल्हापूर टीमने पुन्हा त्याच्या घरी सुखरूप पाठवून गेल्या काही दिवसापासून निराधार बनलेल्या वृद्ध मनोरुग्ण आधार मिळवून दिला.
गडमुडशिंगी (ता.करवीर ) येथील शिवाजी चौकामध्ये एक वृद्ध व्यक्ती असाह्य, तहान ,भुकेने व्याकुळ अवस्थेत असलेली मानवाधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हा समन्वयक महादेव वाघमोडे यांच्या निदर्शनास आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तीस कोणीही मदत करत नसल्याने या व्यक्तीची प्रकृती खालावत गेली. भुकेने आणि तहानेने व्याकूळ या व्यक्तीस उठता बसता येईना व बोलणेही अडखळु लागले. चालताही येत नसल्याने ती व्यक्ती घसटत फिरत होती. ही परिस्थिती पाहून वाघमोडे यांनी त्यांना जेवण दिले. त्याची आस्थेने चौकशी केली . तदनंतर आपण लाईन बाजार कसबा बावडा (कोल्हापूर ) येथील असून आपले नाव रमेश शिंदे असल्याचे सांगितले. प्रसंघावधान राखत वाघमोडे यांनी सोशल मीडिया वरती सदर व्यक्ती ची माहिती व्हायरल करून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या सोशल मीडियावरील संदेशाला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सदर व्यक्तीच्या नातलगांनी वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला. तसेच या व्यक्तीची माहिती सामाजिक कार्यकर्ते आकाराम पाटील यांनी लाईन बाजार प्रभागाच्या नगरसेविका माधुरी लाड यांना दिली. त्यांनीही तात्काळ वाघमोडे यांना संपर्क साधला तसेच प्रभागातील नातेवाइकांना याची कल्पना दिली. परंतु लाॅकडाऊनमुळे त्यांच्या नातलगांना गाडीची व्यवस्था करता येत नव्हती. या गोष्टीची कल्पना वाघमोडे यांनी मानवाधिकार सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्यसहसचिव सुभाष भोसले, जिल्हा उपाध्यक्ष भूषण लाड व जिल्हा संघटक मोहम्मद शेख यांनी पुढील कार्यवाही करत मोहम्मद यासीन शेख यांच्या खाजगी गाडीतून सदर व्यक्तीस घरी क.बावडा ,लाईन बझार येथे पोहच केले . यावेळी त्यांनी सदर व्यक्तीस सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोज व मास्क देऊन कोरोणा पासून संरक्षण साधले. या उपक्रमात सुभाष भोसले,महादेव वाघमोडे, मोहम्मद शेख , भूषण लाड , आकाराम पाटील यांनी योगदान दिले .
या माणुसकीच्या कार्याचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
बॉलीवूड अभिनेते विवेक ओबेराय यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली कार्यरत असून संपूर्ण देशभरात वंचित उपेक्षित दीनदुबळ्या व अन्यायग्रस्तांना मदत करण्यासाठी या संघटनेचे कार्यकर्ते देशभर कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment