‘ *आरिफ पोपटे*
कारंजा: राज्यातील एसटी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकर्या तरी टिकणार का? अशा अस्थिर मानसिकतेत कर्मचार्यांचे कुटुंबीय जीवन जगत आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या लालपरीची ओळख टिकवायचे असेल तर कर्मचार्यांच्या समस्यांकडे द्या! अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना मार्च महिन्याचे २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे अनेक कर्मचार्यांवर इतर काम करण्याची वेळ आली आहे. लाखांपेक्षा अधिक कर्मचार्यांचे कुटुंबिय सध्या अत्यंत अस्थिर मानसिकतेत जगत आहे. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकर्या तरी टिकणार का? ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना २०१९ मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले त्यातील ४ हजार ५०० जणांना घरी बसविण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता ५० वर्षांवरील कर्मचार्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचा घाट घातला, ही बाब दुर्देवी असल्याचे आमदार पाटणी म्हणाले. कोरोना काळात सेवा देत असतांना ३२८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुटुंबियांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही.
अशा कर्मचार्यांच्या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे अशीही मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
No comments:
Post a Comment