Thursday, 16 July 2020

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या राज्य समन्वयक म्हणून मु.का.अ. विनय गौडा यांची नियुक्ती*

-                             *नंदुरबार - ( वैभव करवंदकर )  :- - - -*       राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना शासनाने परवानगी दिली असून, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण बदली प्रक्रियेच्या राज्य समन्वयक पदी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा जी सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                                        जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्यात आले आहे . त्यानुसार सदर बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत होत्या. तथापि , कोविड -१ ९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षीच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या विहित कालावधीमध्ये करणे शक्य नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यास्तव यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने न करता त्या ऑफलाईन पध्दतीने करण्यात याव्यात. तथापि , जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापुर्वी सुरु केली असून, त्या अनुषंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. यास्तव या शैक्षणिक वर्षामध्ये आंतरजिल्हा बदल्या ह्या प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पध्दतीने दि. ३१ जुलै पूर्वी करण्यात याव्यात असे आदेश राज्य शासनाने पारित केले असून,  त्या अनुषंगाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जलद गतीने राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा जी सी यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सर्व शिक्षकांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत असणे आवश्यक आहे. बिंदुनामावल्या मागासवर्ग कक्षाकडून तपासून त्या एन .आय.सी . पुणे यांना प्रमाणित करुन पाठविण्याची जबाबदारी राज्य समन्वयक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , नंदुरबार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, असेही आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या कामासाठी तसेच आंतरजिल्हा बदल्यांच्या अनुषंगाने इतर कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे व चंद्रपूर यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाने नवीन बदली धोरण २०२० तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीमध्येदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांचा समावेश होता. त्याअनुषंगाने त्यांनी राज्यभरात बैठका घेऊन शिक्षक व संघटना प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले होते, हे विशेष. 
 दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळी पथके नेमून अर्ज स्वीकारणेची व्यवस्था करण्यात यावी . यासाठी आवश्यकतेनुसार स्थानिक शिक्षक, प्रतिनिधी संघटना व जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करावा, जिल्हांतर्गत ऑफलाईन बदल्यासंदर्भात दि . २७.०२.२०१७ च्या शासन निर्णयामधील तसेच त्याअनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, परिपत्रके, पत्रे यामधील मार्गदर्शक तत्वे लागू राहतील. यानुसार बदली प्रक्रीया पार पाडताना कोविड -१ ९ प्रादुर्भाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे . अर्ज घेण्याच्यावेळी सामाजिक अंतर पाळले जाईल याची दक्षता घ्यावी . जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या १५ टक्के मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत , यांची दक्षता घ्यावी. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात अवलंबिण्यात आलेली ऑनलाईन प्रक्रीया तात्पुरत्या स्वरूपात या बदल्यांसाठी अधिक्रमित करण्यात येत आहे, असे या आदेशात म्हटले असून,  दि . ३१.०७.२०२० पूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment