*नंदुरबार - ( वैभव करवंदकर ) - - - - -* नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवेच्या हेतूने B.H.M.S ची पदवी संपादन केली. तळागाळातल्या लोकांना वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वस्तीतच माझ्या वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. वडील शिक्षक असल्याने त्यांचे संस्कार मला प्रेरित करत होते. कोरोना महामारीच्या काळातील वैद्यकीय सेवेचा सेवा यज्ञ मी तसाच चालू ठेवला. माझ्या रुग्णांचे हाल होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक हेतू होता. लोकांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु मी तपासलेल्या पेशंटला कोरोनाचे निदान झाल्याचे मला कळाले. सामाजिक भान जपत त्या दिवसापासून मी दवाखाना बंद केला. घरातल्या घरातच विलगीकरणात राहू लागलो. डॉ.रवींद्र पाटील(रविकिरण प्याथॉलॉजि लॅब) यांच्या मदतीने कोरोना चाचणी केली. डॉक्टर असूनही मनात भीती व अस्वस्थता होती. तसेच झाले. दि.१८ जुलै वेळ संध्याकाळी सात वा. मला कळालं मी कोविड पॉझिटिव आहे. मला घेण्यासाठी रुग्णालयाची गाडी माझ्या कॉलनीत आली. बाहेर पावसाचा ओलावा होता. माझ्या कुटुंबीयांचे डोळे अश्रुनी पाणवले होते. माझं मन आपुलकीचा ओलावा शोधत होतं. माझ्या घरासमोर रुग्णालयाची गाडी उभी राहिली. एखाद्या अपराध्याला घ्यायला यावेत असा आविर्भाव कर्मचाऱ्यांचा होता. वातावरण गंभीर झाले. त्यामुळे मानसिकदृष्ट्या माझे कुटुंब खूप खचलं. वयस्कर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा हताश व हतबलतेचा भाव अधिक गडद झाला. कोणत्या अपराधाची शिक्षा मी भोगतोय हे मलाही कळत नव्हते. घराकडे जिज्ञासेने, भीतीने, तिरस्काराने अनेक नजरा कळत नकळत डोकावताना मला जाणवल्या. त्यावेळी मनाची अस्वस्थता अधिकच वाढली. मी कोणी गुन्हेगार नव्हतो. वैद्यकीय सेवा देताना मला कोरोनाची लागण झाली होती. परंतु रात्री पहाटे कोणाच्याही मदतीला धावणारा डॉ. चेतन बच्छाव आज भीतीचं व तिरस्काराचं
कारण का ठरावा? कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवा चालू ठेवली हा माझा गुन्हा होता का ? हे प्रश्न मला सतावत होते. लक्षणे नसलेला मी कोविड रुग्ण होतो मला औषधोपचारापेक्षाही आपुलकीची व सहजतेने समजुन घेण्याची जास्त गरज भासत होती.
नैराश्य व अस्वस्थतेच्या मानसिकतेत मला covid- center ला नेण्यात आले. त्यानंतर आपुलकीचे,मदतीचे, माणुसकीचे आगळे, वेगळं रूप अनुभवलं. डॉ. राजेश वळवी , रविकिरण लॅबचे डॉ. रवींद्र पाटील ,डॉ .ज्ञानेश्वर पाटील, डॉ. रवींद्र पाटील (सेवा क्लिनिक) डॉ. देवेंद्र लांबोळे
डॉ. मनोज तांबोळी डॉ. हेमंत चौधरी,डॉ .कल्पेश चौव्हान,निलेश मेडिकलचे अरविंद पाटील या मित्रांनी मला मानसिक आधार दिला. कोविड सेंटरमधील माझे वास्तव्य अधिक सुखकर व सुसह्य कसे होईल यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खूपच कळकळीने प्रयत्न केले आनी मला तशी सुख,सुविधा ही मिळउन दिल्या. या काळात माझे बालमित्र विश्वनाथ व आनंदाने मला प्रत्यक्ष भेटण्याचा केलेला प्रयत्न सुखावून गेला. निखळ मैत्रीचा भाव नैराश्य व दुःखाचा अंधकार दूर सारतो हेच खरे. जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सातपुते,डॉ.राजेश वसावे, डॉ. राजेंद्र चौधरी,डॉ.विनयभाई पटेल,डॉ.किरण जगदेव,डॉ. गौरव तांबोळी,डॉ.संजय गावित हे कोविड सेंटरला मला तन्मयतेने देत असलेली
सेवा,मानसिक आधार उल्लेखनीय,अविस्मरणीय आहे. रुग्णसेवेत नेहमी कार्यमग्न राहण्याच्या सवयीमुळे तेथे शांत बसता आले नाही. जिल्हा रुग्णालयातील सिस्टरांना कोविड रुग्णांना औषधोपचार देण्याच्या कामात मदत करू लागलो. त्यातून मला वेगळेच समाधान मिळाले. लायन्स क्लब नंदुरबार व डॉक्टर मित्र परिवार व इतर मित्रांनी,माझ्या नातेवाईकांनी माझ्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यातून माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली. कोरोना रुग्ण कालावधीत नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी खूप सकारात्मक पद्धतीने सहकार्य करताना दिसले. गणेश माळी माळी वाडा या मित्राने विलगिकरन झाल्यापासून ते कोरोना सेंटरला असतांना माझ्या कुटुंबीयांना सांगेलं ती मदत केली. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. कारण त्यांनी केलेली मदत दिलेला मानसिक आधारा मूळे मनातील अस्वस्थतेचा काळोख दूर झाला होता. कोरोना रुग्ण झाल्यावर तिरस्करणीय नजरा नोंदवल्या, सहकार्याचे हात पाहिलेत, सकारात्मक आश्वासक संवाद ऐकले व मित्रांचा मानसिक आधार अनुभवला.
कोरोना हा काही मोठा आजार नाही परंतु त्याची संसर्ग क्षमता जास्त असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.काळजी घेत असताना कोरोना रुग्णा बद्दल तिरस्कार निर्माण व्हायला नको. अपराधी असल्याचा
भाव जपला जायला नको. सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळत आपण आपुलकी, माणुसकी, सहकार्य, मानसिक आधार व सकारात्मक संवाद या माध्यमातून कोरोना रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला आधार देऊ शकतो. या सामाजिक मूल्यांच्या माध्यमातून कोरोनाशी लढलो तर लवकर यशस्वी होऊ यात शंका नाही. जगण्यात व जीवनात सहजता व समाजात आरोग्य निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया
डॉ.चेतन नानाभाऊ बच्छाव
उषाई क्लीनिक, नंदुरबार
No comments:
Post a Comment