Saturday, 1 August 2020

प्रा डॉ अनिल भिकाने यांची अकोला येथे अधिष्ठातापदी नियुक्ती

उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे  

 येथील पशुवैद्यक महाविद्यालयातील चिकित्सा संकुल तथा औषधोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख   प्रा डॉ अनिल उद्धवराव भिकाने यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्‌यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ भिकाने हे आदर्श प्राध्यापक, सर्वोत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट विस्तार कार्यकर्ता असे तिन्ही सर्वोच्च बहुमान मिळवणारे माफसू विद्यापीठातील एकमेव प्राध्यापक असून गेल्या २७ वर्षापासून ते उदगीर येथे कार्यरत होते. उदगीरचे पशुवैद्यक महाविद्यालय लोकाभिमुख बनवण्यात तसेच महाराष्ट्रातील एक सुसज्ज अशा पशुचिकित्सालयाच्या उभारणीत सिंहांचा वाटा असणाऱ्या डॉ भिकाने यानी चिकित्सालयाच्या माध्यमातून निष्णात पशुवैद्यक  विद्यार्थी घडवण्याबरोबर तोकड्या मनुष्यबळात गरजू  शेतकऱ्याना अहोरात्र सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञ असलेल्या डॉ भिकाने यानी  प्रयोगशाळेच्या चार भितिंत न अडकता प्रत्यक्ष गोठ्यावर जावून   मराठवाड्यातील अनेक बेरोजगार तरुणाना प्रोत्साहित करून दुग्ध व शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वंयरोजगारासाठी प्रवृत्त केले आहे. त्यानी पशुवैद्यकीय ज्ञान व तंत्रज्ञान  ४५० पशुरोग निदान शिबीरे व ५०० हून अधिक शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्या पर्यत   पोहचवण्याचा 'प्रयत्न केला आहे. इ.स.२०१३,२०१५-१६ व २०१९ मध्ये मराठवाड्यातील ३७ दुष्काळी छावण्याना भेटी देवून बहुमोल असे कार्य केले आहे. त्यांनी १८५ लेख तसेच ४१ रेडिओ/ दुरदर्शन वरिल मुलाखतीद्वारे पशुपालकाना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या पीपीआर ,उरमोडी, कोड फुटणे, सर्पदंश, रक्तदान  या महत्वपूर्ण विषयावरील संशोधनाची नोंद आंतरराष्ट्रीय  मासिकात घेण्यात आली आहे . त्यानी लिहलेली नउ पुस्तके देशभर पशुवैदयक व विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. गेल्या १७ वर्षापासून राज्यमंडळ व बालभारतीत  ते निमंत्रक असून १२ वी स्तरावरील अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीत त्याचा सहभाग आहे. त्याना राष्ट्रीय स्तरावरील तिन सुवर्णपदकासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सध्याला ते जगभरातून तिनशे सदस्य असणाऱ्या व्हीआयपीएम या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून  त्यानी उदगीरच्या मराठवाडा जनता विकास परिषद, मराठी विज्ञान परिषद, जिव्हाळा ग्रुप व ग्रीन आर्मीच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही  मोलाचे योगदान दिले आहे.
या पदोन्नतीबद्दल  डॉ भिकाने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे!

No comments:

Post a Comment