Sunday, 2 August 2020

"पोकरा"तील शेतकरयांच्या व्यक्तीगत लाभाच्या योजनांना पुर्वसंमती देण्याची परवानगी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा -


$ रजनिकांत वानखडे 
वाशिम प्रतिनिधी

शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांची मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनादवारे मागणी 

  $ जिल्ह्यातील  लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन 

वाशीम: दि. 31 
            नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ( पोकरा ) शेती व शेतीशी निगडीत भांडवल व उद्योगासाठी अनुदान तत्वावर विविध योजना राबविल्या जातात. परंतू सद्य स्थितीत या अर्जांना पुर्व संमती देणे बंद आहे. म्हणून किमान शेतकरयांच्या व्यक्तीगत लाभाच्या योजना/ अर्ज यांना पुर्व संमती देण्याचे लेखी निर्देश देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. त्यासोबतच यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याचे आवाहन करतानाच यासंदर्भात लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अढाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

    जागतीक बॅंकेचे अर्थसहाय्याने व महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने राज्यातील 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये सदर " पोकरा " योजना राबविली जाते. वाशीम जिल्ह्यातील अंदाजे 149  गावांचा त्यामध्ये समावेश आहे. योजना क्षेत्र असलेल्या  गावांतील शेतीचा सर्वांगाने विकास करून शेतकरी व भूमीहीन कुटूंबे स्वयंपुर्ण व स्वावलंबी बनविने हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.  म्हणून  छोटी नदी - नाले खोलीकरण, बंधारे बांधणे, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, फवारणी, पेरणी यंत्रे, पाईपलाईन, सप्रिंकलर, ठिबक सिंचन, इलेक्ट्रीक मोटर संच, बिजोत्पादन,  कृषीशी निगडीत उद्योग उभारणे, कुककुटपालन, शेळीपालन   इत्यादी अनेक कारणांसाठी या योजनेमधून अनुदान दिले जाते.

वाशीम हा मागासलेला जिल्हा असून येथील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कुटूंब शेती व शेती पुरक व्यवसाय यावरच अवलंबून आहेत.  कोरोनामुळे राज्याच्या आर्थीक स्थितीची अवस्था डबघाईस आली असल्याची जाणीव आहे. हळुहळु ती पुर्वपदावर येत आहे. परंतू त्याहीपेक्षा शेतकरयांची आर्थिक परिस्थिती दयनीय बनली आहे. अशा परिस्थितीत स्वतःची पदरमोड करून जमा असलेल्या काही शिल्लकीतून शेतीचा व त्यावर आधारित भांडवली व्यवसाय करू इच्छिणारे शेतकरी यांना वारयावर सोडून चालणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. 
            जागतिक बॅंकेने पैसे दिले तेवढे खर्च केले असल्याचे कळते परंतु शासन त्यांच्या वाट्याचे पैसे देत नाही तोवर जागतीक बॅंक अधिक अर्थ पुरवठा करणार नाही. म्हणून शासनाने त्वरित शेतकरयांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांना/ अर्जांना पुर्व संमती देण्याचे आदेश द्यावेत व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

           निवेदन देतेवेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव, वाशीम तालुका सचिव मंगेश मापारी, कोषाध्यक्ष अरूणभाऊ विभुते, उपाध्यक्ष गुणाजी पाटील इंगोले, संपर्क प्रमुख संतोषराव शिंदे, कार्याध्यक्ष उत्तमराव इढोळे, मालेगाव तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ मुके, वाशीम शहराध्यक्ष श्रीरामभाऊ कालापाड, शहर उपाध्यक्ष विलास लहानकर आदीजन उपस्थित होते.


No comments:

Post a Comment