Thursday, 10 September 2020

देशासह नंदुरबार देखील स्वातंत्र्यसंग्रामाने भारावले , हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि बाल सवंगड्यांचा आज 9 सप्टेंबर रोजी शहीद दिन

  *नंदुरबार - प्रतिनिधी - वैभव करवंदकर ------*     

          ए मेरे वतन के लोगो... जरा आखमे भरलो पाणी.. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.. या गीतानुसार भारत मातेचा थोर सुपुत्र आणि ज्या बालवीराने  तिरंगा ध्वज धरून वंदे मातरमचा नारा देत जुलमी  ब्रिटिशांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला. त्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि बाल सवंगड्यांचा आज 9 सप्टेंबर रोजी शहीद दिन !                                   नंद गवळी राजा यांनी वसवविलेल्या नंदनगरीत बाल शहीद शिरीषकुमार मेहता यांचा जन्म दिनांक 28 डिसेंबर 1926 रोजी नंदनगरीतील  मेहता व्यापारी कुटुंबीयांत झाला.  पातळ गंगा नदी किनारी डोंगर कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची ओळख व्यापाऱ्यांचे शहर म्हणून परिचित होते.  स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि त्यांचे सवंगडी शशिधर केतकर, लालदास शहा, घनश्यामदास शहा, धनसुखलाल वाणी या बालवीरांचा समावेश  होता. त्यामुळे नंदुरबारचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून नंदुरबार शहरात व्यापार वैभव आणि एकमेकांप्रती असलेला  स्नेह आजही कायम आहे. म्हणूनच अनेक नामवंत व्यक्तींनी या शहराला भेट दिल्याचे सांगण्यात येते. सन 1590 मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले व सुबक घरांनी सजलेले शहर असे मत एन. एन. अकबरी यांनी मांडले होते.  सन 1660 मध्ये प्रसिद्ध प्रवासी पे नेव्हर  यांनी भेट दिली होती.  त्यावेळी त्यांनी नंदुरबारचा उल्लेख श्रीमंत आणि समृद्ध नंदनगरी असा केला होता.  याच नंदुरबारात बाळा शंकर इनामदार नावाचे तेलाचे व्यापारी होते. त्यांना मुलगा नसल्याने ते दुखी असत यातून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला.  त्यांना कन्या प्राप्त झाल्याने ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली.1924 ला पुष्पेंद्र आणि सविता यांचे शुभमंगल झाले. दिनांक 28 डिसेंबर 1926 रोजी या दांपत्याच्या पोटी शिरीषकुमारचा जन्म झाला. त्या काळी देशासह नंदुरबार देखील स्वातंत्र्यसंग्रामाने भारावले होते.  स्वातंत्र्य प्राप्तीसाठी विद्यार्थी आणि सामान्य जनतेने आपले सर्वस्व पणाला लावले होते. शिरीषकुमार मेहता शालेय जीवनात देशप्रेमाने अग्रेसर ठरला. त्यावेळी महात्मा गांधी आणि  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव  विद्यार्थ्यांवर होता. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांना चले जाव असा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या काढून इंग्रजांना हिंदुस्तान सोडण्याचा इशारा देण्यात आला. त्याकाळी वंदे मातरम, भारत माता की जय घोषणा देणाऱ्यांना ब्रिटिश सरकार अटक करून तुरुंगात टाकत असे. बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे दिनांक 9 सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबारात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषकुमारने हातात तिरंगा घेऊन इंग्रजांना आव्हान दिले. "नही नमसे.. नही नमसे... निशाण भूमी भारत नुं..."  या घोषणेसह प्रभात फेरी नंदनगरीतील गल्लीबोळातून  मध्यवर्ती बाजारपेठेतील आणि आत्ताच्या माणिक चौकात पोहचली.  यावेळी इंग्रजांनी   प्रभात फेरी अडविली.  शिरीषकुमारचा हातात तिरंगा  ध्वज होता. पोलिसांनी प्रभातफेरी विसर्जित करण्याचे फर्मान सोडले. मात्र विद्यार्थ्यांनी वंदे मातरम भारत माता की जय आदी  जयघोष सुरू ठेवला. बालकांनी पोलिसांचे आवाहन नाकारले. अखेर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्याने मुलींच्या दिशेने बंदूक उगारली असता धाडसी शिरीषकुमारने सांगितले कि, गोळी मारायची तर मला मारा. यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सोडलेल्या  एक, दोन, तीन गोळ्या  शिरीषकुमार मेहताच्या छातीवर  लागल्या. यामुळे शिरीष कोसळला .या गोळीबारात शिरीषकुमार मेहतासह शशिधर केतकर, लालदास शाह,  धनसुखलाल वाणी, घनश्यामदास शाह हे पाचही बालवीर शहीद होऊन धारातीर्थी पडले.  म्हणून नंदनगरीतील माणिक चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले.  आज 78 व्या हुतात्मा दिनानिमित्त नंदनगरीच्या बाल क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम आणि वंदन !  

संकलन - महादू हिरणवाळे, संस्थापक अध्यक्ष शहिद शिरीषकुमार मित्र , नंदुरबार

No comments:

Post a Comment