*:*हातकणंगले / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे वैज्ञानिक प्रा.डॉ.के.एम.गरडकर यांना नुकताच 'फेलो ऑफ महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ' हा पुरस्कार प्राप्त झाला. संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्र अकॅडमी व सायन्सेस ही संस्था प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात अतुलनीय कामागिरी बजावलेल्या वैज्ञानिकांना हा पुरस्कार बहाल करते. संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स तसेच संशोधन संबंधित रिव्युव्हर तसेच एडिटर म्हणून केलेले सर्व कार्य इत्यादी निकषाच्या आधारे या पुरस्काराची निवड केली जाते.
प्रा.डॉ.गरडकर हे शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक पदावरती कार्यरत असून त्यांना संशोधन क्षेत्रात २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. सध्या ते इंडस्ट्रियल केमिस्ट्री या विभागाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग इत्यादी क्षेत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.तसेच कॅन्सर या रोगावर उपाय म्हणून विविध नॅनोपार्टिकल वरतीही सध्या त्यांच्या टीम चे संशोधन कार्य सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील जवळपास ३७२३ हुन अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे. त्यांनी आजवर भारत सरकार च्या युजीसी, डीएइ-बीएआरसी, डीएसटी अशा विविध संस्थेकडून संशोधन प्रकल्पासाठी १.५० कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणला आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यान्वित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत १० विद्यार्थ्यांनी आपली पीएच डी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले आहे तर ८ विद्याथी पीएच डी शिक्षण घेत आहेत.
त्याचबरोबर त्यांनी भारतातील नामवंत विद्यापीठे व संस्थांमध्ये बोर्ड ऑफ स्टडीज, युजीसी, एलआयसी इत्यादी समित्यांवर शैक्षणिक सल्लागार व मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते भारतातील अनेक विद्यापीठाचे पी.एच.डी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
डॉ. गरडकर यांचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. तसेच त्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत चे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. प्रा.गरडकर यांचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर पण प्रेरणादायी असा राहिला आहे. प्रा.गरडकर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांना जागतिक पातळीवर सिद्द करण्यासाठी प्रेरित केले आहे. गरजू विद्यार्थी व त्यांचे पालक यांना ते नेहमीच मदत करण्यास तत्पर असतात. यावरून त्यांची समाजाप्रती बांधिलकी दिसून येते. ते अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, एल्सवेअर, स्प्रिंजर, विले, आयओपी अशा १५० हुन अधिक नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यापैकी अनेक जर्नल्सनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधापैकी २५ हुन अधिक शोधनिबंध सायन्स डायरेक्ट च्या विविध जर्नल्स मध्ये टॉप १५ मध्ये गणले गेले आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ हुन अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर १०० हुन अधिक कार्यशाळा, प्रशिक्षणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र यामध्ये सहभाग दर्शविला आहे. डॉ. गरडकर यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिकन केमिकल सोसायटी, इंडियन सोसायटी फॉर रेडिएशन अँड फोटोकेमिस्ट्री, सोसायटी फॉर मटेरियल केमिस्ट्री, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री इत्यादी संस्थांनी त्यांना आजीव सदस्यपद बहाल केले आहे. याचबरोबर ते अप्लाइड फिजिकल सायन्स इंटनॅशनल नॉलेज प्रेस, केमिस्ट्री अँड अप्लाइड बायोकेमिस्ट्री, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या नामवंत आंतरराष्ट्रीय जर्नल्स चे संपादक म्हणून काम पाहत आहेत.
या पुरस्काराबद्दल बोलताना डॉ. गरडकर म्हणाले '' भविष्यामध्ये गुणवत्तापूर्ण वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा खूप असल्यामुळे उद्योगधंदे, प्रशासन, शेती, वैद्यकीय अशा क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे या दृष्टीकोनातून भारताला महासत्ता बनविण्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज आहे. ज्ञानदानापेक्षा ज्ञाननिर्मितीकडे सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मूलभूत संशोधनाकडे वाटचाल करून आपल्या संशोधनाचा समाजासाठी कसा फायदा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आई वडील, थोरामोठ्यांची आशीर्वाद, हितचिंतक यांच्या जोरावरच आजवर सफल झालो आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. गरडकर यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.
photo - डॉ. गरडकर यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रकुलगुरू डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर
No comments:
Post a Comment