पेठवडगांव / प्रतिनिधी
मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबविते. यामध्ये शालेय मुलींकरता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ,अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती ,इयत्ता पहिली ते दहावी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती विमुक्त जाती ,भटक्या जमाती, अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला ,तहसीलदार यांच्या सहीचा पालकांच्या उत्पन्नाचा दाखला सादर करण्याच्या खर्चिक व किचकट अटी ठेवण्यात आल्यामुळे बहुतांश शिष्यवृत्ती पात्र गोरगरीब विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत .
शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता विविध दाखल्याची पूर्तता करण्याकरिता पालकांना नाहक त्रास होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून केवळ विद्यार्थ्यांच्या शालेय बोनाफाईटवर व तहसीलदार यांच्या कडील पालकांचा उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी तलाठी यांच्याकडील पालकांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देऊन मुलींच्या तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी पाटील यांनी ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे . शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे मत नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष पूजा मुराळी, सरचिटणीस मीना चव्हाण, कार्याध्यक्षा वैशाली कोंडेकर ,जयश्री माने, नीता पोतदार, नूतन सकट ,प्राजक्ता जाधव आदी पदाधिकारी शिक्षिका उपस्थित होत्या.
फोटो
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबत लेखी निवेदन देताना शिक्षक संघ महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मी पाटील,वैशाली कोंडेकर, मीना चव्हाण ,जयश्री माने , पूजा मुराळी आदी
No comments:
Post a Comment