हेरले / प्रतिनिधी
दि.3/7/21
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती हातकणंगले व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने
१जुलै रोजी कृषी दिन कार्यक्रम राज्य पातळी सोयाबीन पिक स्पर्धा सन - २०१८ प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी बाळासो बाबगोंडा पाटील किणी ( ता. हातकणंगले) यांच्या शेतामध्ये आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरवात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करणेत आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर व प्रमुख उपस्थिती पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी होत्या.
कृषी अधिकारी अभिजीत घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त सहयोगी प्राध्यापक एम.ए.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सोयाबीन पिकावरील कीड रोग नियंत्रण व उत्पादन वाडीसाठी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे यांनी कृषी विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती दिली व कृषीसंजीवनी सप्ताह बाबत माहिती दिली.
पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती एक उद्योग म्हणून करण्याचे आवाहन शेतक-यांना केले. त्याच बरोबर पंचायत समिती व कृषी विभागामार्फत
केलेल्या अथक परिश्रमामुळेच हातकणंगले तालुक्यातील सन - २०१७ राज्य पातळी सोयाबीन प्रथम क्रमांक,
सन - २०१८ राज्य पातळी सोयाबीन प्रथम व द्वितीय क्रमांक, सन २०१९ राज्य पातळी सोयाबीन प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक हातकणंगले तालुक्यातील शेतक-यांना प्राप्त झालेले आहेत. त्या बद्दल पंचायत समिती कृषी विभागाचे विशेष कौतुक केले.
गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतक-यांनी सेंद्रीय शेती करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य सदन राखणेसाठी सहकार्य करणेचे आवाहन केले.
प्रगतशील शेतकरी कृष्णाची आनंदा मसुरकर ( पट्टणकोडोली) यांनी कार्यक्रमाचे आयोजन शेतक-यांच्या
बांधावर केले बद्दल प्रशासनाचे आभार मानले व पुढील वर्षीचा कार्यक्रम त्यांच्या शेतावर आयोजित करणेची प्रशासनाला विनंती केली.
अभिनव उपक्रमाचे सदस्य सुनील काटकर यांनी शेतक-यांनी पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत व संजय पाटील फौंडेशन किणी यांच्या वतीने किणी गावामध्ये सेंद्रिय शेती, पशुपालन, व डेअरी उद्योगामध्ये उल्लेखनीय काम करणा-या शेतक-यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहन दिले. नेसरी कृषी
विद्यालय येथून किणी येथे दाखल झालेल्या कृषीकन्या टीमने वृक्ष लागवड करून उपस्थितांना माहिती दिली.
पंचायत समिती हातकणंगले यांच्या वतीने तालुका पातळी खरीप सोयाबीन पिक स्पर्धा सन - २०२० मध्ये
आनंदा हरिभाऊ मसुरकर ( पट्टणकोडोली) प्रथम क्रमांक, बाजीराव पांडुरंग पाटील (लाटवडे)द्वितीय क्रमांक, भीमराव नानासो देसाई (पाडळी ) तृतीय क्रमांक, तानाजी रघुनाथ पाटील (पाडळी ) चतुर्थ क्रमांक तसेच जिल्हा पातळी खरीप सोयाबीन पिक स्पर्धा सन २०२० सारिका वसंत पाटील (लाटवडे) द्वितीय क्रमांक, भाऊसो दादा पाटील ( आळते) तृतीय क्रमांक, रमेश बाबगोंडा पाटील ( किणी )चतुर्थ क्रमांक मिळविले बद्दल त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोप, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत तालुका पातळी रब्बी ज्वारी पिक स्पर्धा सन - २०२०/२०२१ मध्ये
विजेते शेतक-यांचा सत्कार करून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ठ पत्रकारिते बद्दल कृषिमित्र पुरस्कार प्रस्ताव शासनास सादर केलेले पत्रकार नंदू साळूंखे यांचाही सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी शुभांगी कार्वेकर व कृषी सहाय्यक संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव शिंदे व कनिष्ठ सहाय्यक संभाजी साजणे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी सतिश देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत किणी चे सरपंच ,उपसरपंच,सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment