Tuesday, 28 September 2021

गोदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

हातकणंगले / प्रतिनिधी

   मास एक्स्प्रेस कार्गोचे गोदाम फोडणाऱ्या चौघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर एकास बाल सुधार गृहात पाठवण्यात आले. शुभम संजय मिठारी, अक्षय संजय कांबळे ( दोघेही रा. नागाव, ता. हातकणंगले ),  शुभम नंदकुमार गव्हाणे व आदित्य भिकाजी पाटील ( दोघेही रा. महाडीक कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) अशी त्यांची नावे आहेत. पेठ वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोरील न्यायालयात सर्वांना हजर करण्यात आले होते. आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांशी यांचा संबंध तसेच उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती केली होती. 
मास एक्स्प्रेस कार्गो  लि. पुणे या कंपनीचे शिरोली एमआयडीसी येथील टोप हद्दीत असणारे गोडाऊन फोडून सुमारे दोन लाख एकोनसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या पाच जणांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांच्याकडून कॉटन किंग कंपनीचे पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, तसेच मोबाईल अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटवेअर, मोबाईल असा सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली  चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटार असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत मास एक्स्प्रेस कार्गो चे कर्मचारी  उमेश गोपाळ मरगज ( वय ३०, रा. आर. के. नगर, कोल्हापूर ) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.  
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व उप विभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, अविनाश पोवार, समीर मुल्ला, प्रवीण काळे, सतिश जंगम, महेश अंबी, निलेश कांबळे, महादेव पाटील आदींनी ही कारवाई केली. 
.....................
फोटो 
शिरोली : गोदाम फोडणाऱ्या चौघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे व त्यांचे शोध पथक

No comments:

Post a Comment