हेरले / प्रतिनिधी
दि.13/2/21
सांगली - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित करणे साठी प्रशासन हेरले गावातील जमिन धारकांना गुंठ्यास २ लाख ९८ हजार रुपये देऊ केले आहेत. ही रक्कम आम्हास मान्य नाही.त्यापेक्षाही जास्त बाजार भावा दराने खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. केवळ कमी पैसे देऊन शेतकऱ्यांना फसवू पाहणाऱ्या प्रशासनाला जाब विचारू,त्यांचा प्रयत्न हाणून पाडू. आमची जमीन घेऊन त्यावर सरकार रस्ता करणार आहे. अर्थात खाजगीकरणातून करणार आहे, म्हणजे कोणीतरी खाजगी उद्योगपती पैसे गुंतवणार आणि आमच्या जमिनीच्या किमतीच्या १०० पट टोल वसूल करत राहणार, वाहनधारकांचे शोषण करत राहणार म्हणजे जमिनीला जास्त किंमत देण्याचे प्रशासनाचे उपकार नाहीत. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही परंतु येथील स्थानिकांचे थडगे बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधणार असाल तर त्यांची थडगी बांधल्या शिवाय सोडणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
ते हेरले ( ता. हातकणंगले) येथे हातकणंगले तालुक्यातील टोप, नागांव वडगाव, हेरले, माले, चोकाक येथील रत्नागिरी सोलापूर हायवेसाठी नुकसान ग्रस्त भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळणेसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना ,नागरिक कृती शेतकरी यांच्या वतीने आयोजित मेळाव्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अशोक मुंडे होते.
माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी नव्याने संपादित करणा-या जमीनीचा मिळणारा मोबदला हा शेतक-यांवर अन्याय करणारा असून नवीन भूमिअधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यामुळे या महामार्गासाठी जमीनी संपादित करण्यासाठी शेतक-यांनी विरोध करावा व जोपर्यंत आपल्याला पुर्वीच्या कायद्याप्रमाणे मोबदला मिळणार नसेल तोपर्यंत एक इंचही जमीन देण्यात येऊ नये
राज्य सरकारने केलेला कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. एनडीएबरोबर असतानाही आपण या कायद्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हा शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीने आपणाला पाठिंबा दिला होता. आता हीच मंडळी या कायद्याचे समर्थन का करीत आहेत?महाविकास आघाडी सरकारलाही शेतक-यांचे काही देणे-घेणे उरलेले नाही.
रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. पशुखाद्य महागले आहे, शेतीचे साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.पाच राज्यांच्या निवडणुकी नंतर देशामध्ये महागाई ने सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखर, इथेनॉललाही चांगला दर येत आहे. निश्चित एफआरपी देऊनही साखर कारखान्यांकडे चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत. म्हणून एफआरपीपेक्षा प्रतिटन दोनशे रुपये जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठीही आंदोलन छेडणार आहोत.
माजी सभापती राजेश पाटील म्हणाले,
दहा वर्षापूर्वी सांगली कोल्हापूर रस्ता रुंदीकरण कामी हालोंडी, हेरले, माले, चोकाक या प्रत्येक गावांना वेगवेगळे दर निश्चित करून चौदा ते पंधरा हजार दर प्रशासनाने काढला होता. मात्र आम्ही न्यायालयीन लढा देऊन गुंठ्यास एक लाख २० हजार रुपये शिरोली ते हातकणंगले पर्यंत शेतकऱ्यांना मिळवून दिले.त्यामुळे सद्या प्रत्येक गावास नोटीस नाही, नोटीसा पूर्ण झाले नंतर हरकती घेऊन दर मान्य नाही असे सांगूया. या नवीन हायवेमध्ये १०० मिटर सेंटर पासून आपण आपल्या जमिनीमध्ये काही करू शकत नसल्याने जमिनीस दर मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. म्हणून व्यापक लढा करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहूया.
माजी जि.प. सदस्य जयकुमार कोले म्हणाले २५ वर्षे या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देऊन न्याय माजी खासदार राजू शेट्टी यांनी मिळवून दिला आहे. दूधदर,ऊसदर मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी यांनी पंढरपूर ते बारामती, पुणे ते मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व पंचगंगा उगमापासून ते संगमा पर्यंत पदयात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. सद्याचे सरकार लोकप्रतिनिधीचे नसून सरकार नोकरांचे आहे. त्यामूळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याया हक्कासाठी लढा देण्यासाठी सज्ज राहावे.
स्वागत व प्रास्ताविक मुनिर जमादार यांनी केले.मनोगते राजेंद्र पाटील ( नागांव) माजी सरपंच रावसाहेब चौगुले ( मौजे वडगाव) सुनिल कांबळे ( माले) धनंजय टारे ( आळते ) रमेश कांबळे ( रुकडी) प्रा.राजगोंड पाटील,महंमद खतीब, राहूल शेटे ( हेरले) यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील,पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, आप्पासाहेब एडके, तालुका अध्यक्ष अरुण मगदूम,संदीप कारंडे,उदय चौगुले,कपिल भोसले, लक्ष्मण निंबाळकर, आदीसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
फोटो
हेरले (ता. हातकणंगले) येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना माजी खासदार राजू शेट्टी शेजारी प्रा. राजगोंड पाटील अशोक मुंडे जयकुमार कोले माजी सभापती राजेश पाटील मुनिर जमादार व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment