Friday, 3 June 2022

नुकसानभरपाई न मिळाल्याने पाईपलाईन काम बंद पाडले

हेरले प्रतिनिधी
       
       जल जीवन मिशन योजने अंतर्गत चोकाक (ता. हातकणंगले ) येथे मंजूर असलेल्या एक कोटी ६७ लाखाच्या पाणी योजनेच्या कामाची वर्क ऑर्डरच नसतांनाही संबंधित कंत्राटदाराने विनापरवाना काम सुरू केले असून जॅकवेल, पाण्याची टाकी याचा थांगपत्ता नसतानाच थेट तीन ते चार किमीची पाईपलाईन पूर्ण केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच मिळाली नसल्याने काही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे. त्यामुळे ही योजना सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोव-यांत सापडली आहे.
        जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हातकणंगले तालुक्यांत सुमारे ९५० कोटी रुपयांच्या एकूण ४१ योजना मंजूर आहेत. त्यापैकी कार्यारंभ आदेश योजना ९, निविदा कार्यवाही प्रगतीतील योजना ११, निविदा कार्यवाही प्रलंबित योजना १, तांत्रिक मान्यतेसाठी सादर योजना १०, तांत्रिक शेरे पूर्तता प्रगतितील योजना ३, प्रशासकिय मान्यता कार्यवाहितील योजना ०१, तत्वतः मान्यतेसाठी सादर योजना २ आणि मजीप्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ४ यांचा समावेश आहे.
    यातील चोकाक गावांसाठी १ कोटी ६७ लाखाची योजना मंजूर झाली असून याची निविदा कार्यवाही प्रगतित आहे. असे असतांना मात्र संबंधित ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले आहे. वास्तविक काम सुरू करण्यांपूर्वी संबंधित जागा मालकांना नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. मात्र एकालाही नुकसान भरपाई न देता परस्परच काम सुरू केले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे. 


     संबंधित कंत्राटदाराने वर्क ऑर्डर नसताना परस्परच काम सुरू केले आहे. याबाबत तेथील सरपंच, लोकप्रतिनिधी, प्रशासनाने त्या कंत्राटदाराला रोकायला पाहिजे होते. याबाबत तक्रार आल्यास माहिती घेऊन कारवाई केली जाईल....
सुरेश कुलकर्णी...
उपअभियंता... पाणीपुरवठा विभाग
पंचायत समिती, हातकणंगले...

     फोटो..
 बंद पाडलेले पाईपलाईनचे काम..

No comments:

Post a Comment