हातकणंगले/ प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कौशल्य विकसित करावी त्याचबरोबर स्वतः अपडेट होऊन शाळेत सातत्याने छोटे छोटे उपक्रम राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. असे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव डी. एस. पोवार यांनी केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ यांच्या वतीने
सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांची सहविचार सभा विषय
इ.१० वी व इ.१२ वी फेब्रु. मार्च २०२४ परीक्षेच्या कामकाजाबाबतच्या सूचना व मार्गदर्शनासाठी दि.१३ डिसेंबर २०२३ ते दि.२ जानेवारी२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने कुंभोज (ता. हातकणंगले) येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूल सभागृहात शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील मुख्याध्यापंकांची व प्राचार्यांची सहविचार सभा आयोजित केली होती त्या प्रसंगी बोलत होते.
विभागीय सचिव डी. एस. पोवार पुढे म्हणाले शाळेत जीवशास्त्र शिकवीत असतोच त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जीवनशास्त्र शिकवणे सद्यस्थितीत महत्त्वाचे ठरत आहे. शाळेमध्ये प्रत्येक वर्षी वार्षिक पारितोषिक समारंभाचे आयोजन केले जाते. यावेळी प्राथमिक स्वरूपात यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कौतुक केले जाते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे कौतुक करणे वेळे अभावी राहून जाते. म्हणून प्रत्येक महिन्यास यशस्वी कार्य केलेल्या व यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे त्या त्या महिन्यातच सर्वांच्या समोर कौतुक केल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण होऊन सर्व यशस्वी विद्यार्थी मनस्वी आनंदी होतात. मुख्याध्यापकांनी काय करावे याचे चिंतन करून आपली भूमिका सकारात्मक पद्धतीने सतत बदलत ठेवावी. आपल्या सहकारी शिक्षकांच्या शैक्षणिक विविध कार्यातील उत्तम कार्याची दखल घेत त्यांचे सर्वांच्या समोर कौतुक करावे. तसेच त्यांना शाबासकी द्यावी यामुळे त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होऊन सदैव उत्तमोत्तम शैक्षणिक कार्य करण्याची भावना जागृत राहते.
या सहविचार सभेस सहाय्यक सचिव संजय चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, वरिष्ठ अधिक्षक दीपक पोवार, सुभाष दुधगांवकर, मनोज शिंदे, सुधिर हावळ या अधिकारी वर्गांनी मार्गदर्शन केले.
दहावी व बारावी विद्यार्थ्यांची विलंब, अतिविलंब, अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा फॉर्म भरवण्याच्या तारखा,गुणपत्र दुरुस्तीसाठी उपाययोजना, १७ नंबर फॉर्म भरणे, तोंडी परीक्षा संदर्भात इंटरनल, एक्सट्रनल एक्झामिनर त्यांची माहिती देणे, या परीक्षेचे गुण कसे भरावे, लोककला, चित्रकला, एनसीसी, स्काउटगाईड, खेळाडूंचे क्रीडा प्रस्ताव आदी विषयांचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी कसे प्रस्ताव करावेत, दिव्यांग विद्यार्थी यांना लिखाणासाठी
किती जादा वेळ देणे व शुगर असलेले विद्यार्थी त्यांना आहारासाठी वेळ या संदर्भात माहिती, पुनर गुणांचे मूल्यांकन, परीक्षा नियामक, केंद्र संचालक एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर आदींच्या देयकांची माहिती, परीक्षा प्रवेश पत्र आदी मुद्दयांची माहिती देण्यात आली.
या सहविचार सभेस मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी, जितेद्र म्हैशाळे, मनोज शिंदे, श्रीशैल मठपती, पी. डी. शिंदे, मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे आदीसह हातकणंगले तालुक्यातून १५२ मुख्याध्यापक व ६६ प्राचार्य व शिरोळ तालुक्यातील ८१ मुख्याध्यापक व ३१ प्राचार्य असे एकूण माध्यमिक शाळांचे २३३ मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे ९७ प्राचार्य उपस्थित होते. सूत्र संचालन सागर माने यांनी केले.
फोटो
हातकणंगले व शिरोळ तालुका मुख्याध्यापकांच्या सह विचार सभेत बोलतांना कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डी. एस. पोवार व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment