काही विचारप्रवाह हे छोट्या-छोट्या उपक्रमांतून सुरू होतात. उदा. सुरुवातीला महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात एक उपक्रम म्हणून सुरू केली. त्याचे महत्त्व पटल्यामुळे या कल्पनेचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला गेला. त्यातून 'स्त्री शिक्षण' हा विचारप्रवाह रूढ झाला.
२. जुन्या उपक्रमांतून नवीन विचारप्रवाह: प्रत्येक वेळी नवीन उपक्रमातून किंवा कल्पनेतूनंच विचारप्रवाह येतात असे नाही तर कधी-कधी जुन्या कल्पना किंवा विचारच पुन्हा नव्याने येऊन नवे विचारप्रवाह म्हणून स्वीकारले जातात. उदा. मानवतावाद, पूर्ण आहार - शाकाहार, मूल्यशिक्षण इत्यादी विचार भारतामध्ये प्राचीन काळात रूढ होतेच. या शतकामध्ये पुन्हा नवविचार म्हणून पुढे आलेले दिसतात.
३. एका क्षेत्रातील उपक्रमापासून दुसऱ्या क्षेत्रात विचारप्रवाह आज प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. बऱ्याच वेळा शिक्षणाशिवाय अन्य क्षेत्रांतील एखादा उपक्रम यशस्वी झालेला आढळल्यास त्यातून नवीन शैक्षणिक विचारप्रवाहांचा उगम होतो. उदा. व्यवस्थापन क्षेत्रातील 'मार्केटिंग' किंवा उद्योगक्षेत्रातील 'प्रणाली उपागम' यांचा शिक्षणक्षेत्रामध्ये वापर.
४. संशोधनातून विचारप्रवाह : आज प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या बाबींतील संशोधनाचा विस्तार विचार करून वाढत आहे. अशा संशोधनातून एखाद्या उपक्रमाची यशस्विता सर्वत्र पटल्यावर त्यातून विचारप्रवाहांचा उगम होतो. उदा. मानसशास्त्रातील 'ताणतणाव', 'भावनिक बुद्धिमत्ता' या संकल्पनांचा शिक्षणक्षेत्रामध्ये समावेश.
५. आधुनिकीकरणातून विचारप्रवाह: आज प्रत्येक गोष्टीवर आधुनिकीकरणाचा प्रभाव होत असलेला आढळून येतो. या आधुनिकीकरणाच्या स्वीकाराशिवाय शिक्षणक्षेत्रालाही आपली प्रगती साधता येणार नाही. त्यामुळे आज संगणक शिक्षण व माहिती तंत्रविज्ञान या आधुनिक विचारप्रवाहांचा उगम झाला आहे.
६. बदलासाठी विचारप्रवाह: प्रगतीसाठी जशी गतीची आवश्यकता असते, तशीच गतीसाठी बदलाची आवश्यकता असते. म्हणून बदल हा प्रगतीचा अविभाज्य घटक आहे. सद्य:स्थितीतील विचारप्रवाहामध्ये बदल केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. या विचारातून विचारप्रवाहांचा उगम होतो. उदा. इयत्ता १ लीपासून इंग्रजी विषयाचे अध्ययन, माहिती तंत्रविज्ञानाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये समावेश.
७. नावीन्यासाठी विचारप्रवाह: तोच तोचपणाचा कंटाळा, नावीन्याची आवड हा माणसाचा स्थायिभाव आहे. या भावातून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या प्रवृत्तीतून प्रथम उपक्रमांची सुरुवात होते व त्यांची उपयुक्तता पटल्यानंतर त्यातून विचारप्रवाहांचा उगम होतो. उदा. अध्यापन पद्धतींऐवजी अध्यापन प्रतिमानांचा वापर, अध्यापनं सूत्रांऐवजी अध्यापनाच्या कौशल्यांचा शिक्षक-शिक्षणामध्ये विचार इत्यादी.
८. गरजांच्या पूर्ततेसाठी विचारप्रवाह : शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या गरजेतून विचारप्रवाहांचा उगम होतो. या विचारप्रवाहांच्या माध्यमातून गरजांची पूर्तता करण्याचे मार्ग शोधले जातात. म्हणूनच गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. उदा. नोकरी किंवा व्यवसाय करताना शिक्षण घेण्याची गरज भासली. त्यातून 'मुक्त शिक्षण', 'दूरस्थ / पत्रव्यवहाराद्वारा शिक्षण' या विचारांचा उगम झाला. ९. ज्ञानाच्या विस्फोटातून विचारप्रवाहांचा उगम : आजचे युग हे ज्ञानाच्या विस्फोटाचे युग आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अध्यात्मापासून-अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालेला आढळून येतो. या ज्ञान विस्फोटातून अनेक शैक्षणिक विचारांचा उगम होतो. उदा. संप्रेषणाची विविध साधने, संप्रेषण तंत्रविज्ञान इत्यादी.
१०. विज्ञान व तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे विचारप्रवाहांचा उगम :
आज विज्ञान व तंत्रविज्ञान या क्षेत्रांत नवनवीन शोधांची भर पडली आहे. संगणक तंत्रविज्ञानाने जणू सर्व विश्व व्यापून टाकलेले आहे व त्यातून निर्माण झालेल्या गतीने अनेक नवविचारप्रवाहांचा जन्म झालेला आहे. यातून शिक्षणक्षेत्रही सुटलेले नाही. विश्वाच्या गतीबरोबर राहण्यासाठी आज अनेक शैक्षणिक विचारप्रवाहांचा उगम झालेला आढळून येतो. उदा. उपग्रहाद्वारे शिक्षण, इंटरनेट, चॅट ग्रुपचा वापर, On-line examination इत्यादी.
११. शिक्षण घेणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे विचारप्रवाहांचा उगम : वाढत्या लोकसंख्येबरोबर सामाजिक जागृतीच्या फलस्वरूपाने आज शिक्षण घेणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या संख्येच्या, विविध क्षेत्रांतील शिक्षण घेणाऱ्यांच्या सोईसाठी आज शिक्षणात मुक्त शिक्षण, दूर शिक्षण, पत्रव्यवहारांद्वारा शिक्षण,व्यवसायाभिमुख शिक्षण, मोबाईल शिक्षण यांसारख्या अनेक विचारप्रवाहांचा उगम झाला आहे. १२. बदलत्या सामाजिक परिस्थितीतून विचारप्रवाहांचा उगम : अनेक क्षेत्रांत झालेल्या ज्ञानाच्या प्रस्फोटामुळे समाजातील लोकांच्या जीवनाची गती वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील मानसिक ताण वाढला आहे व एकंदर समाज या तणावाखाली वावरत आहे. त्याचे परिणामस्वरूप मानसिक संतुलन बिघडणे, आत्महत्या, गुन्हेगारी यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या निवारणासाठी शिक्षणक्षेत्रात अध्यात्म, नैतिक मूल्याशी संबंधित विचारप्रवाहांचा उगम झालेला आहे.
१३. राजकीय धोरणातून विचारप्रवाहांचा उगम : कोणत्याही देशातील शैक्षणिक ध्येय-धोरणांवर राजकीय धोरणांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे राजकीय धोरणे बदलली की शैक्षणिक धोरणात बदल होऊन नवीन विचारप्रवाहांचा जन्म होतो. आज शिक्षण क्षेत्रात आलेला कंत्राटी शिक्षक भरती हा प्रकार राजकीय ध्येय धोरणातून निर्माण झालेला विचारप्रवाह आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
१४. अनुभवातून विचारप्रवाह : प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात विविध प्रकारच्या अनुभव विश्वातून जात असते. हे अनुभव त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित न राहता जेव्हा उपक्रमाचे वा प्रयोगाचे रूप धारण करतात तेव्हा त्याच्या यशस्वितेवर ती कल्पना रुजत जाऊन विचारप्रवाहांची निर्मिती होते. उदा. सिल्व्हिया यांनी केलेल्या शैक्षणिक प्रयोगाचे मूळ बालपणी तिच्यावर झालेल्या संस्कारात व अनुभवात आहे. ज्याद्वारे त्यांनी विविध प्रयोग करून शिक्षणात एक वेगळा विचारप्रवाह पुढे आणला.
१५. ज्ञानाच्या जाळ्यातून विचारप्रवाहांचा उगम ज्ञान आयोगामध्ये
(Knowledge Network) संबंधात काही शिफारशी केलेल्या दिसून येतात. सुयोग्य मनुष्यबळ
शिक्षणातील विचारप्रवाहांचे स्वरूप
निर्मितीसाठी उच्च कोटीच्या मूलभूत शैक्षणिक सुविधा आणि स्रोतांची आवश्यकता आहे आणि त्यांची प्राप्ती होण्यासाठी 'ज्ञानाचे जाळे' ही संकल्पना अस्तित्वात येऊ पाहत आहे. यामधूनच नवविचारप्रवाह पुढे येत आहे. तो म्हणजे नेटवर्कची क्षमता वाढवून सर्व विद्यापीठे, ग्रंथालये, दवाखाने, प्रयोगशाळा एकत्र जोडणे ज्याद्वारे देशातील सर्व विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक या सर्वांना ज्ञानसमृद्धी करता येईल.
No comments:
Post a Comment