Wednesday, 27 November 2024

बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे आणखी झाले सोपे !


विद्यार्थी,पालक,शाळांसाठी मोबाईल ॲप विकसित 

गणित व विज्ञानात उत्तीर्णतेच्या निकषात बदल नाही

कोल्हापूर /प्रतिनिधी

  केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

    फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१०वी परीक्षांची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१ नोव्हेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय चालू वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेचा निकषात कोणताही बदल नसल्याचे मंडळांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोईसाठी MSBSHSE हे Android Mobile Application विकसित करण्यात आलेले असून ते Google Play Store मध्ये Download करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर Mobile Application मध्ये मंडळामार्फत नुकतेच प्रसारित करण्यात आलेली इ.१०वी व इ.१२वी फेब्रुवारी मार्च २०२५ परीक्षेची वेळापत्रके, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१०वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी. असेही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

  या बाबींची नोंद कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय मंडळामार्फत देण्यात आल्या आहेत. ॲप बाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ॲपची वैशिष्ट्ये-
•ॲप गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध. 
•विद्यार्थी शाळा व •कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध. 
•नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. 
•फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध. 
•याशिवाय अन्य नवीनतम- अद्यावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध.

"केवळ वेळापत्रकच नाही तर परीक्षेसंबंधी उपयुक्त असलेली माहिती, सर्व परिपत्रके,अनुषंगिक सुविधा विद्यार्थी - पालक, शाळा, कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-राजेश क्षीरसागर,
 अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ

Monday, 25 November 2024

डॉ . दिपक शेटे यांची राज्य अभ्यासक्रम निर्मिती करीता निवड


हेरले /प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एस सी ई आर टी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यास करून आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे .
सदर राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता गणित विषयाकरिता तज्ञ सदस्यपदी डॉ. दिपक मधुकर शेटे  नागांव यांची निवड झाली.
डॉ. दिपक शेटे हे स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन आणि ज्युनिअर कॉलेज मिणचे ता . हातकणंगले येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांचा शालांत परीक्षेचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागला आहे . नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने केल्याबद्दल त्यांची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी  सात  पुस्तकांचे लेखन केलेले आहे . सुमारे पंच्चेचाळीस  लाख रुपये खर्चून स्वघरी गणितायण लॅब निर्मिती केली आहे. त्यांची गणितातील अवलिया म्हणून राज्यभर ओळख आहे . 
त्यांच्या  शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले आहे .
त्यांना डाएटचे प्राचार्य राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी  एकनाथ आंबोकर यांचे प्रोत्साहन मिळाले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी एस घुगरे, सचिव एम ए परीट यांचे मार्गदर्शन लाभले.

Thursday, 21 November 2024

वेळापत्रक आले..तयारीला लागा..!


कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर
माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च 2025 परीक्षा पूर्व कामकाजाची माहिती अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

    परीक्षा कालावधी - इ. 12 वी - प्रात्यक्षिक / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा दि. 24/01/2025 ते दि.10/02/2025 लेखी परीक्षा दि.11/02/2025 ते दि.18/03/2025 अखेर असेल.
   इ.10 वी - प्रात्यक्षिक / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा दि. 03/02/2025 ते दि.20/02/2025 लेखी परीक्षा दि.21/02/2025 ते दि. 17/03/2025 अखेर असेल.एकूण परीरक्षक संख्या - 45,इ.12 वी परीक्षा केंद्र - 176,इ.10 वी परीक्षा केंद्र -357 आहेत.

   प्राप्त आवेदनपत्र संख्या (दि.19/11/2024 अखेर)
इ.12 वी फेब्रु-मार्च 2025 प्राप्त आवदेनपत्र संख्या 1,16,182, इ.10 वी फेब्रु-मार्च 2025 प्राप्त आवदेनपत्र संख्या - 1,30,844
फेब्रु-मार्च 2025 आवेदनपत्र ऑनलाईन विलंब शुल्काने भरण्याची दिनांक इ.12 वी - दि. 15/11/2024 ते 22/11/2024 इ.10 वी - दि.20/11/2024 ते 30/11/2024 असेल.
   इ.10 वी व इ.12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ, लेखनिक, जवळचे
परीक्षा केंद्र या सवलती मिळण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात
आलेले आहेत.
 इ.10 वी व इ.12 वी उत्तरपत्रिका तपासणीसाठी परिक्षक/ नियामक नियुक्ती करण्याचे काम सुरु आहे.
इ.10 वी व इ.12 वी परीक्षेसाठी परिरक्षक, केंद्रसंचालक नियुक्तीची कामे सुरु आहेत.
 इ.10 वी व इ.12 वी परीक्षा केंद्र निश्चितीकरण करणेचे काम सुरु आहे.
  दहावी बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असल्याने शाळांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, विद्यार्थ्यांनी उजळणी करावी. तसेच प्रश्न पत्रिकांचा सराव करावा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी
केले आहे.

Friday, 15 November 2024

कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान- बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर


 
कोल्हापूर / प्रतिनिधी
 कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
 राजेश क्षीरसागर यांची  पदोन्नतीने शासनाने १५ ऑक्टोबर रोजी नियुक्ती केली आहे. या पदाचा कार्यभार १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी सुधाकर तेलंग यांच्याकडून स्वीकारला.
      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे या बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. निकालातील गुणवत्तावाढीवर आणि कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा वापर कसा करता येईल यावरही भर देणार असल्याचे ते म्हणाले.कोल्हापूर विभाग मंडळ अंतर्गत कोल्हापूर,सातारा व सांगली हे तीन जिल्हे येतात. या विभागीय मंडळाची स्थापना  १९९२ मध्ये झाली आहे. 
     राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून चार वर्षे कामकाज केले आहे. तेथील विविध परीक्षांमधील कामकाजाचा राज्यस्तरावरील त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. याशिवाय त्यांनी रत्नागिरी व सातारा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप उमटली होती. डिसेंबर २०२० पासून उपसंचालक पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राज्यस्तरावर पुणे येथील योजना शिक्षण संचालनालयात  आतापर्यंत काम पाहिले. शासनाने १५ ऑक्टोबर रोजी त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदाचा कार्यभार १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी सुधाकर तेलंग यांच्याकडून स्वीकारला आहे.  क्षीरसागर म्हणाले कार्यालयीन व परीक्षा विषयक कामकाजात ऑनलाईन पद्धतीचा अधिकारी उपयोग करण्यावर आपला भर राहील. तसेच निकालातील गुणवत्ता वाढवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   या प्रसंगी बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे,माजी सहसचिव दत्तात्रय पोवार, सहायक संचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी त्यांचे स्वागत केले.
     फोटो 
बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे.

Saturday, 9 November 2024

निवडणूक प्रक्रिया निष्पःक्षपणे आणि निर्भीडपणे पार पडण्यासाठी सर्वांनी निवडणूक कामकाज करावे - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर


हेरले /प्रतिनिधी

नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे निवडणूक कामकाजाची जबाबदारी पार पाडावी तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पःक्षपणे आणि निर्भीडपणे पार पडण्यासाठी सर्वांनी निवडणूक कामकाज करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले.
        हातकणंगले विधानसभा (अ.जा.) मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संजय घोडावत विद्यापीठ येथे शनिवार दि.९ व रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी आयोजीत केले आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते.

    प्रशिक्षणामध्ये स्क्रीनवर पीपीटीच्या माध्यमातून स्लाईड शोद्वारे सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या वेळेत माहिती दिली. निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील टप्पे
,निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण तपासणी, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी,ईव्हीएमची माहिती,
मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्व तयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्राबाबत, मतदान केंद्राचे वेबकॉस्टिंग, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, अंध, दिव्यांग मतदारांची मतदानाची प्रक्रिया आदीची माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.
    दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत विशेष हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएमची ओळख, जोडणी, व्हीव्हीपॅट निरीक्षण, मतदानाचे मॉकपोल, मतदार यंत्र मोहोरबंद करणे आदींचे प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले.दोन दिवसांच्या प्रशिक्षणास सर्व क्षेत्रिय, केंद्राध्यक्ष, एक ते तीन क्रमांकाचे अधिकारी  असे १५९२ अधिकार्‍यांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. 
 या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अजय नरळे, निवडणूक नायब तहसिलदार संजय पुजारी, निवासी नायब तहसिलदार संदीप चव्हाण,मणुष्यबळ व्यवस्थापक सुरेश बन्ने, गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले आदींचे मार्गदर्शन लाभले.
         फोटो
दुसरे प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करतांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, शेजारी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम.