Wednesday, 27 November 2024

बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे आणखी झाले सोपे !


विद्यार्थी,पालक,शाळांसाठी मोबाईल ॲप विकसित 

गणित व विज्ञानात उत्तीर्णतेच्या निकषात बदल नाही

कोल्हापूर /प्रतिनिधी

  केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

    फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१०वी परीक्षांची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१ नोव्हेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय चालू वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेचा निकषात कोणताही बदल नसल्याचे मंडळांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोईसाठी MSBSHSE हे Android Mobile Application विकसित करण्यात आलेले असून ते Google Play Store मध्ये Download करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर Mobile Application मध्ये मंडळामार्फत नुकतेच प्रसारित करण्यात आलेली इ.१०वी व इ.१२वी फेब्रुवारी मार्च २०२५ परीक्षेची वेळापत्रके, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१०वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी. असेही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

  या बाबींची नोंद कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना विभागीय मंडळामार्फत देण्यात आल्या आहेत. ॲप बाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ॲपची वैशिष्ट्ये-
•ॲप गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध. 
•विद्यार्थी शाळा व •कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध. 
•नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकाल यासह अनुषंगिक बाबी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. 
•फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह अनुषंगिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध. 
•याशिवाय अन्य नवीनतम- अद्यावत सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगिनशिवाय उपलब्ध.

"केवळ वेळापत्रकच नाही तर परीक्षेसंबंधी उपयुक्त असलेली माहिती, सर्व परिपत्रके,अनुषंगिक सुविधा विद्यार्थी - पालक, शाळा, कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-राजेश क्षीरसागर,
 अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ

No comments:

Post a Comment