Saturday, 29 March 2025

विभागात दहावी परीक्षेत कॉपी प्रकरणांचा रकाना निरंकच !


बारावी परीक्षेत सातारा निरंक, कोल्हापूर एक, तर सांगलीत सहा  प्रकरणे.


कोल्हापूर / प्रतिनिधी

 विभागीय मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये परीक्षेपूर्वी अडीच महिन्यांपासून विविध उपक्रमाद्वारे सुरू केलेली जागृती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांचे योग्य नियोजन, परीक्षा संचालनातील सर्व घटकांनी यथोचित पार पाडलेली जबाबदारी यामुळे यंदाही दहावी बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणांचा कोल्हापुर विभागाचा रकाना निरंकच राहिला आहे. तर बारावी परीक्षेत विभागात सात प्रकरणांची नोंद झाली असून सर्व सात प्रकरणे प्रतिबंधात्मक कारवाईशी निगडित आहेत. 

विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या परीक्षाविषयक गुणात्मक उपक्रमामुळे विभागातील शाळा, विद्यार्थी व पालकांच्याही मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत असून यंदा प्रथमच कॉपीमुक्त परीक्षा अभियान खऱ्या अर्थाने प्रभावी ठरले आहे.

विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी पदभार घेतल्यापासूनच गैरप्रकारमुक्त परीक्षेची पार्श्वभूमी तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी विविध परीक्षांमध्ये राज्यस्तरावर केलेल्या कामकाजाचा तगडा अनुभव त्यांच्या कामी आला. विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात जिल्हास्तरावर सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेऊन विभागीय मंडळाच्या योजना व परीक्षेविषयी इत्यंभूत माहिती दिली. परीक्षेत गैरप्रकार घडल्यास कारवाईचा इशाराही दिला. जिल्हास्तरावरील बैठकी प्रमाणेच शाळास्तरावर संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी- पालक - शिक्षक यांच्यामध्ये जागृती करण्याबाबत निर्देश दिले. त्याच जोडीला कॉपीमुक्तीची शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्याबाबत निर्देश दिले. ताणतणावमुक्त परीक्षा कशी देता येईल, प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे, परीक्षापूर्व व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी याबाबत तिन्ही जिल्ह्यात स्वतंत्रपणे स्थानिक तज्ञांच्या मदतीने ऑनलाइन चर्चासत्रे आयोजित केली, त्याचे थेट प्रक्षेपण शाळाशाळांमधून केले गेले.


*विभागातील उपक्रमांची दखल अन् राज्यस्तरावर अवलंब*

गैरप्रकारमुक्त परीक्षेच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागात घेण्यात आलेल्या उपक्रमाप्रमाणेच राज्यस्तरावर कॉपीमुक्त परीक्षा अभियान २० ते २६ जानेवारी  या कालावधीत घेण्यात आले. राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना ... या विषयावर स्वतंत्रपणे  कोल्हापुरातील विषयतज्ञांच्या मदतीने विभागीय मंडळाने व्हिडिओ तयार केला. तो राज्यमंडळाने सर्वांसाठी यूट्यूबवर उपलब्ध करून दिला. राज्यभरातून या उपक्रमाचे स्वागत झाले. या ध्वनिचित्रफिती शाळा शाळांमधून दाखवण्यात आल्या. दहावीच्या ध्वनीचित्रफितीस तर एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आयोजित केलेल्या सप्ताहातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन म्हणजे शिक्षासूची वाचन, उत्तरपत्रिकेवरील सुचना वाचन, पालक सभा, ग्रामस्थ सभा, प्रभात फेरी, उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले.

*चालू वर्षी खऱ्या अर्थाने परीक्षा*

कोल्हापूर विभागीय मंडळाची स्थापना सन १९९२ मध्ये झाली असून त्यावेळी मंडळात सातारा, सांगली, कोल्हापूर,रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होता. सन २०१२ मध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे कोकण विभागीय मंडळ स्थापित झाले. बोर्ड परीक्षेचे गांभीर्य विविध कारणांनी मागील १० ते १५ वर्षात कमी होत गेले. कोरोना कालावधीपासून तर त्यात फारच शिथिलता आली. पर्यायाने शिस्त व अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ लागला. 

यावर्षी विभागाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर शाळांनी सराव व उजळणी दक्षतापूर्वक घ्यायला सुरुवात केली, विद्यार्थी अभ्यासाला लागले, शिस्तीतही सुधारणा होताना दिसत आहे.चालू वर्षाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर पेपरच्या काळात निरव शांतता दिसून आली. केंद्राबाहेरील पळापळ आणि अंतर्गत चलबिचल जवळपास संपुष्टात आली. एरवी दिसणारे पुस्तकांचे व कॉपीचे ढीग गायब झाले. गैरप्रकार करणारे, उत्तेजन देणारे आणि मदत करणारे यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आणि परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याचाही सुपरिणाम दिसून आला. परीक्षा संचलन करणाऱ्या केंद्रसंचालक, वर्गावरील सुपरवायझर यांचेही काम सोपे झाले. त्यामुळे यंदाची बोर्ड परीक्षा खरी कसोटी ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्व घटकातून येत आहेत.


*विभागीय मंडळ आणि जिल्हा दक्षता समित्यांचा समन्वय*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कृतीकार्यक्रमाची  अंमलबजावणी करताना इयत्ता इ. १० वी व इ.१२वी च्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त एस पी सिंग,राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

विभागीय मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान सात भरारी पथकांचे नियोजन केले जाते. तथापि चालू वर्षी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ऑनलाइन बैठकीद्वारे परीक्षेत गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हास्तर, तालुकास्तरावरून महसूल व इतर अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. सर्व केंद्रांवर बैठी पथके नेमण्यात आली. भरारी पथकांची संख्या वाढल्याने प्रत्येक केंद्रावर भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यात विशेष लक्ष घातले होते.

तर उपद्रवी व संवेदनशील केंद्रांबाबत विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते. मागील पाच वर्षात गैरप्रकार घडलेल्या केंद्रांवरील केंद्रसंचालकांसह सर्व कर्मचारी वर्ग बदलण्यात आल्याने त्याचाही धाक निर्माण झाला. संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण ही करण्यात आले. दुर्लक्षित असलेल्या बारावी ऑनलाईन परीक्षेतबाबतही सूक्ष्म नियोजन करण्यात आले. परीक्षा कालावधीत पेपर दिवशी सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सांगली राजेसाहेब लोंढे, कोल्हापूर डॉ. एकनाथ आंबोकर यांच्याशी सातत्याने होणाऱ्या छोटेखानी ऑनलाईन बैठका फायदेशीर ठरल्या.

*दहावी परीक्षेत कॉपीमुक्तीची हॅट्रिक*

चालूवर्षीसह मागील तीन परीक्षेत कोल्हापूर विभागात दहावी परीक्षेत एकाही प्रकारची नोंद नाही, यात विभागाने हॅट्रिक साधली आहे. जिल्हानिहाय विचार करता मागील पाच दहावीच्या बोर्ड परीक्षेत सांगली जिल्ह्यात एकाही प्रकाराची नोंद नाही.
मागील बारावीच्या दोन बोर्ड परीक्षेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकाही कॉपीप्रकाराची नोंद नव्हती. चालू वर्षी सांगली सहा व कोल्हापूर एका प्रकाराची नोंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यांची हॅट्रिक हुकली आहे. साताऱ्यात बारावी परीक्षेत मागील व चालू वर्षी एकही प्रकाराची नोंद नाही. चालू वर्षीच्या परीक्षेत विभागात बारावी परीक्षेत सात प्रकाराची नोंद झाली असून सांगलीतील सहा प्रकार रसायनशास्त्र व कोल्हापुरातील प्रकार गणित पेपरवेळी झाले आहेत. त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई होणार आहे. 
लगतच्या कॉपीमुक्त मुक्त परीक्षेची संस्कृती रुजलेल्या कोकण विभागीय मंडळात केवळ एका कॉपी प्रकाराची नोंद असून राज्यात कॉपीमुक्तीत कोकण मंडळ अव्वल स्थानी आहे, तर कोल्हापूर विभागीय मंडळ दुसऱ्या स्थानी आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

"चालू वर्षाच्या परीक्षेत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या आहेत, क्षेत्रिय यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाल्याने गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यात यश आले.
-सुभाष चौगुले, विभागीय सचिव. 

"विद्यार्थी पालकांसह परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची मानसिकता बदलण्यात बऱ्याच अंशी यश आले. परीक्षा देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही घटकांचा यावर्षी कस लागला. निकालानंतर येत्या शैक्षणिक वर्षात अभियानाचे दूरगामी व इष्ट परिणाम दिसतील. 
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ

Monday, 24 March 2025

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या आझाद मैदानतील आंदोलनातून साधला जुन्या पेन्शन मिळण्याचा राजमार्ग… प्रा. विजय शिरोळकर


हेरले /प्रतिनिधी


            आझाद मैदान मुंबई येथे १७ ते २१ मार्च अखेर आंदोलन पार पडले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीसाठी संघटनेने राज्याध्यक्ष  प्रा. विजय शिरोळकर, प्रा. योगेश्वर निकम,  प्रा. संपत कदम,भास्कर देशमुख  काकासाहेब कोल्हे  सहभागी झाले होते. शिक्षण मंत्र्यांनी यूपीएस/ एनपीएस स्वीकार करावा म्हणून आग्रह केला. पण २००५ पूर्वी टप्पा अनुदान असणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही असे ठामपणे सांगितले. टप्पा अनुदानावर  २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीचा अहवालानुसार  जुनी पेन्शन देण्यात यावी याकरिता आग्रह धरला.शिक्षण मंत्र्यांनी निवेदनावरती टिपणी टाकून कार्यवाही करिता  शिक्षण सचिव यांना आदेशित केले. आपला विषय अधिकृतरित्या शिक्षण सचिवांच्याकडे  पोहोचलेने जुने पेन्शनची दारे उघडली गेली हे आंदोलनामुळे  मिळालेले यश हेही नसे थोडक असा आशावाद संघटनेने व्यक्त केला. पुढे  शिक्षण सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी गेलेले निवेदनाआधारे  प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्याकडे पाठवावा यासाठी नाम.प्रकाश आबिटकर,नाम.चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. शिरोळकर म्हणाले.
       बीड जिल्हाध्यक्ष प्रा.गवते यांनी अभ्यागताच्या भेटीचे नियोजन उत्तमप्रकारे पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे  आमदार विजयसिंह पंडित, गेवराई बीड यांनी आंदोलनास भेट देऊन, दादांच्याकडे हा विषय ताकतीने मांडू असे आश्वासित केले.  शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,शिक्षक आमदार जयंत आसगावकर  यांची भेट घेऊन संघटनेने चर्चा केली. आंदोलनास कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आंदोलनास भेट देऊन पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  असा विश्वास दिला. आमदार नाना पटोले  यांनी भेट देऊन तुमचा विषय काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये ताकतीने मांडेल असे आश्वासित केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे , कायम  विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष  खंडेराव जगदाळे  पेन्शन संघर्ष समितीच्या  संगीताताई शिंदे, सचिन पगार , शिक्षक नेत्या शुभांगीताई पाटील , वितेश खांडेकर,  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष  तानाजीराव माने  व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन करुन जाहीर पाठिंबा दिला.आझाद मैदान आंदोलन यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कोषाध्यक्ष प्रा. तानाजी शेळके, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख  अजित सावंत  संपर्कप्रमुख भास्कर देशमुख , ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे काकासाहेब कोल्हे, प्रा.निशिकांत कडू, आदी प्रयत्न केले. बहुतांश  जिल्हाध्यक्ष, , पदाअधिकारी , मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, पेन्शनग्रस्त बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो 
शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना प्रा. विजय शिरोळकर व अन्य पदाधिकारी.

Friday, 21 March 2025

हेरले येथील प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट



हेरले/ प्रतिनिधी
१०० दिवस कृती आराखड्यांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावांमध्ये भेटी देऊन शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. याच्या अनुषंगाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हेरले (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळा शाळा नंबर दोन हेरले व कन्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
      यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी जीवनात चांगला अभ्यास करून यश प्राप्त करावे.आज शाळेमध्ये भेट देऊन वर्गाची पाहणी केली.तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
 या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत  सरपंच राहुल शेटे,यांनी  केले.
   यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले,विस्तार अधिकारी ए एस कटारे,विस्तार अधिकारी नेमिनाथ पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत अधिकारी बी.एस .कांबळे,पोलिस पाटील नयन पाटील, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय राबाडे, शाळा नं 2  चे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती कोरे, हेरले गावाचे,मंडल अधिकारी नविली बेळनेकर, तलाठी सचिन चांदणे,महमद जमादार, सुनील मगदुम, राहुल निंबाळकर, रोजगार सहाय्यक सुरज पाटील तिन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

फ़ोटो 
-हेरले येथील केंद्र शाळेच्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे त्यांच्या सोबत अधिकारी वर्ग.

Thursday, 20 March 2025

ठरलं तर मग..! दहावी बारावीनंतर आता पालकांची परीक्षा.


•अजूनही करा ऑनलाइन नोंदणी व जोडणी, करा पेपरचा सराव अन् द्या परीक्षा..!



कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा.

•साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी.

कोल्हापूर / प्रतिनिधी

प्रौढ शिक्षण ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण' या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा रविवारी २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्या पुढील जेष्ठांना मिळाली आहे.

याबाबत उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मागील शैक्षणिक वर्षात ही परीक्षा १७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आली होती. वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.असाक्षर व स्वयंसेवक ऑनलाइन नोंदणी उल्लास ॲपवर वर्षभर सुरू असते. ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यायची आहे.

 राज्य मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत संपन्न झाली आहे. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे.

मागील शैक्षणिक वर्षात १७ मार्च रोजी झालेल्या एफएलएनएटी परीक्षेस राज्यातून ४ लक्ष ५९ हजार इतके प्रौढ असाक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४ लक्ष २५ हजार उत्तीर्ण झाले. ही लेखी परीक्षा एकूण १५० गुणांची असून वाचन ५०, लेखन ५०, व संख्याज्ञान ५० अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात १६.५ व एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात ५ लक्ष ७७ हजार इतक्या असाक्षरांच्या नोंदणीचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १९ मार्च अखेर ५ लक्ष ६४ हजार ७५१ नोंदणी झाली आहे. त्यात १ लक्ष ६१ हजार ४६१ पुरुष तर ४ लक्ष ३ हजार ११७ स्त्रिया आणि ७३ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली आहे.मागील वर्षी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले, तसेच मागील वर्षात उत्तीर्ण होऊ न शकलेले आणि चालू वर्षात नव्याने नोंदणी झालेले असे एकूण सुमारे ८ लक्ष ४ हजार एवढे असाक्षर परीक्षेस प्रविष्ट करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. असाक्षरांना शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून१ लक्ष ३३ हजार १४२ जणांची नोंदणी झाली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी संयुक्तपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळांवरही उल्लास कार्यक्रमाची जबाबदारी सोपवल्याने या कार्यक्रमास आणखी गती मिळत आहे. योजना शिक्षण संचालनालयाने या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून जिल्हानिहाय परीक्षा निरीक्षकांच्या निमित्त केल्या आहेत. शिवाय केंद्र शासन स्तरावरून महाराष्ट्रातील परीक्षेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.

कोल्हापूर विभागांतर्गत सातारा २३,२५२, सांगली १७,७८०, कोल्हापूर २९,६८०,रत्नागिरी १०,५७४ आणि सिंधुदुर्ग ६,५९६ अशा एकूण ८७,८८२असाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय उपसंचालक महेश चोथे यांनी विभागातील जिल्ह्यांसाठी ऑनलाइन बैठक घेऊन संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. राज्यस्तरावरून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

उल्लास परीक्षेच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सराव प्रश्नपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता असाक्षर आजी-आजोबा, आई-बाबा, काका-मामा, काकू आणि  मावशी आपल्या पाल्यांसोबत अन् स्वयंसेवकांसोबत अभ्यासात गुंग झाले आहेत.

"असाक्षर व स्वयंसेवक नोंदणी आणि जोडणी उल्लास ॲपवर ऑनलाईन पद्धतीने शाळांमार्फत सुरू आहे. ज्यांची नोंदणी व जोडणी अद्याप होणे बाकी आहे, त्यांनी तातडीने करावी. परीक्षेचा सराव करावा.
-राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ.

मौजे वडगांव उपसरपंचपदी स्वप्नील चौगुले


हेरले /प्रतिनिधी 
 मौजे वडगाव ( ता. हातकणंगले)सत्ताधारी जय शिवराय ग्रामविकास आघाडी कडून स्वप्नील चौगुले यांची मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली . यापूर्वीचे उपसरपंच रघूनाथ गोरड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते . आघाडीच्या ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार चौगुले यांना संधी मिळाली . स्वप्नील चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बिनविरोध निवड करण्यात आली . यासाठी जयशिवराय ग्रामविकास आघाडीच्या नेतेमंडळीनी प्रयत्न केले. यावेळी माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे ,  सुरेश कांबरे ,  रघुनाथ गोरड, ग्रा प . सदस्य नितिन घोरपडे ,सविता सावंत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार , दिपाली तराळ, मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे - पाटील, यांच्यासह जय शिवराय ग्रामविकास आघाडीचे सर्व नेते  मंडळी , व ग्रामस्थ  उपस्थित होते.

Monday, 17 March 2025

जिल्ह्यातील हजारो शिक्षक कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले

कोल्हापूर /प्रतिनिधी

संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे आणि खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस येणार आहेत.  बहुजनांचे शिक्षण संपुष्टात महाराष्ट्रात मध्ययुगीन व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाला सवाल विचारण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक कार्यकर्ते  आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. 
    यावेळी बोलताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष  प्रमोद तौंदकर म्हणाले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे हे भारतीय संविधानाने आणि एनईपी ने सांगितले आहे पण अलीकडच्या काळामध्ये राज्यकर्ते आणि राज्यकर्त्यांच्या बरोबर अधिकारी सुद्धा शिक्षणावरचा खर्च कमी करत आहेत एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि तिच्याच मुलाचं म्हणजे भाच्याचं शिक्षण संपवायचं असा दुटप्पी धोरण सध्या शासन करत आहे या मुलांच्यासाठी जुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर भविष्य काळामध्ये गुलाम या शिक्षण पद्धतीतून निर्माण होतील हो ला हो म्हणणारे तरुण तयार होतील सर्वसामान्यांची मुलं ज्याने असंख्य स्वप्न पाहिले आहेत ती स्वप्ने उद्ध्वस्त होतील आणि शासन जगण्यापूर्ती मदत करते म्हणून ही मुलं झेंडे उडवायला फक्त हे राज्यकर्ते वापरतील म्हणून समाजाला सुद्धा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी या प्रशासन अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन निदर्शन केली पाहिजेत 
अर्जुन पाटील म्हणाले मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर भारताचे आर्थिक राजधानी आहे असा असताना शिक्षण सेवक पद या महाराष्ट्रात निर्माण करून दोन प्रवर्ग निर्माण केले आहेत आणि म्हणून शिक्षण सेवक पद रद्द करावे ही मागणी या निमित्ताने घेतली आहे
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये पहिली ते पाचवीच्या शाळांसाठी एक ते सात पटापर्यंत दोन शिक्षक आणि तिथून पुढे प्रत्येकी 30 पटला एक शिक्षक असे शिक्षक विद्यार्थी प्रमाण निश्चित असताना या कायद्याचा भंग करत महाराष्ट्र शासनाने दहा पटाखालील शाळांना एकच शिक्षक देण्याची तरतूद या नव्या शासन निर्णयावर केलेली आहे. तसेच कायद्यातील विद्यार्थी शिक्षक प्रमाणाच्या तरतुदीना छेद देत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंदच पडतील अशी व्यवस्था केली आहे. त्याचसोबत सहावी ते आठवीच्या वर्गांना पटाच्या कोणत्याही अटीशिवाय विज्ञान, भाषा आणि समाजशास्त्र या तीन विषयांसाठी प्रत्येकी एक शिक्षक असे तीन वर्गशिक्षक  देणे अपेक्षित असताना नव्या जाचक अटी लादत 20 पेक्षा कमी पटाला एकच शिक्षक मंजूर करून त्यांच्यावर तीन वर्गांची आणि तीच विषयांची जबाबदारी टाकणारा अनाकलनीय निर्णय शासनाने घेतला आहे. आरटीई 2009 चा कायदा पूर्णतः मोडून काढणारा आणि पालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणाऱ्या या शासन निर्णयाविरुद्ध शिक्षकांनी प्रचंड मोठ्या संख्येने आवाज उठवला.

यासोबतच समान काम समान वेतन या धोरणासनुसार शिक्षण सेवक पद रद्द करणे ही मागणी ही जोरकसपणे मांडण्यात आली. आपोआप वगळता इतर कोणत्याही खात्यामध्ये नियुक्तीच्या दिनांकापासून पूर्ण वेतन दिले जात असताना फक्त शिक्षकांनाच वेठबिगारासारखे राबवून घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हे पदच रद्द करण्यात यावे आणि पूर्णवेळ शिक्षक नियुक्ती करण्यात यावी यांसह इतरही मागण्या मांडण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 2000 हून अधिक शिक्षक या धरणे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपस्थित होते. यावेळी शिक्षक समितीच्या राधानगरी शाखेने या आंदोलनासाठी बनवलेली वेगवेगळी पोस्टर्स लक्षवेधी ठरली.
  याप्रसंगी प्रमोद तौदकर जिल्हाध्यक्ष, प्रभाकर कमळकर  सरचिटणीस, अर्जुन पाटील पुणे विभाग अध्यक्ष,रवळू पाटील जिल्हा नेते, गणपतराव मांडवकर कार्याध्यक्ष, सुनील कुंभार कोषाध्यक्ष 
 ज्योतीराम पाटील शिक्षक नेते,संदीप मगदूम - जिल्हा प्रवक्ते, वर्षा केनवडे महिला राज्याध्यक्ष,संगीता अस्वले महिला जिल्हाध्यक्ष, शुभांगी माळी सरचिटणीस, 
 राजेंद्र पाटील, रामदास झेंडे, सुरेश कोळी, 
 शिवाजी बोलके, बाबुराव परीट,सुधाकर सावंत शहर राज्याध्यक्ष,उमेश देसाई, हरिदास वरणे, बाळकृष्ण पाटील, अभिजीत काटकर, बाबा धुमाळ, अनिल भस्मे, कृष्णात भोसले, सचिन कोल्हापुरे, मारुती पाटील, संजय कुंभार, विनायक मगदूम, सुरेश पाटील, युवराज काटकर, विक्रम वाघरे, विकास पाटील, अरविंद पाटील, तुकाराम  मातले, राजू नाईक, धनाजी पाटील, एकनाथ आजगेकर, बाजीराव पाटील, राजू परीट, पूजा पाटील, चंद्रकांत पाटील, डी डी पाटील, यशवंत चौगुले, राजेश सोनपराते, कृष्णात कारंडे आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक समितीचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Sunday, 16 March 2025

जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानावर अन्नत्याग साखळी उपोषण करणार प्रा. विजय शिरोळकर

    कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बजेट अधिवेशनादरम्यान उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने सोमवार  १७ तारखेपासून अन्नत्याग साखळी उपोषण करणार आहे. यामध्ये  २०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त बांधव बेमुदत अन्नत्याग साखळी उपोषणास बसणार आहेत.

   यापूर्वी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्यात आले होते. पुण्यामध्ये आयुक्त कार्यालय समोर निदर्शने केली होती. ५ मार्च पासून मंत्रालयात उपासमारपूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलनं छेडले होते. सदर आंदोलनात राज्य उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भास्कर देशमुख, मुंबई संपर्कप्रमुख नाना राजगे, ठाणे जिल्हाध्यक्ष राजू लहासे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विलास जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, प्रा. राजेंद्र गायकवाड नाशिक,  संजय मांडवकर राजापूर,माधव मुधोळकर नवी मुंबई, रवींद्र चव्हाण धुळे आदींच्या नेतृत्वाखाली विविध मंत्र्यांना व सचिवाना भेटून वस्तुस्थिती कथन करण्यात आले होते.

   उपरोक्त मागण्यांमध्ये संघटनेची मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावावी. मयत बांधवांच्या वारसदारांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावेत.  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः / टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना  १९८२ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे १००टक्के अनुदानित शाळेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी. २००५  पूर्वी नियुक्त सर्वच विनाअनुदनित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सरकारकडून सुप्रीम कोर्टात न्यायालयीन बाबींमध्ये होकार पत्र देण्यात यावे. सदर मागण्या करता आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्यध्यक्ष विजय शिरोळकर, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कार्याध्यक्ष
 प्रा. योगेश्वर निकम, सचिव प्राध्यापक अभिजीत धानोरकर, सहसचिव सुनील कांबळे, कोषाध्यक्ष 
प्रा. तानाजी शेळके, विधि सल्लागार अॅड गजानन एडोले आदींनी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे दिली.

Saturday, 15 March 2025

शिक्षक व सेवकांच्या २१ मार्चचा लक्षवेधी आक्रोश मोर्चास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा.


कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिक,नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने  शुक्रवार दि. २१ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या लक्षवेधी आक्रोश मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा देण्याचे बैठकीत जाहिर करण्यात आले.व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
    लक्षवेधी आक्रोश आंदोलनामध्ये मागण्या पुढील प्रमाणे १९८२ /८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा मिळावा, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे, डीसीपीएस धारक प्राथमिक, माध्यमिक, खाजगी प्राथमिक, नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना मार्च २०२१नंतर डीसीपीएस रक्कमेवरील व्याज व शासन हिस्सा अनुदान मिळावे, अनुकंपा आणि कुटुंब निवृत्ती वेतन बाबतची कार्यवाही तात्काळ व्हावी, १५ मार्च २०२४ चा  संचमान्यतेचा अन्यायी  शासन निर्णय रद्द व्हावा,सातव्या वेतन आयोगातील वरीष्ठ वेतन श्रेणी त्रुटी दुरुस्त व्हावी, शिक्षकासाठी १०, २०, ३० आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, अनुकंपा शिक्षकासाठी टीईटी ची अट रद्द व्हावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वा. टाऊन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात येणार आहे.  सदर  बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करण्यात आला.
   या बैठकीस आर. वाय. पाटील,भरत रसाळे, शिवाजी माळकर, सुधाकर निर्मळे, सुदेश जाधव, करणसिंह सरनोबत, मंगेश धनवडे, सतीश लोहार, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील, आनंदा बनकर, मारुती फाळके आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना  शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी अध्यक्ष एस. डी. लाड, भरत रसाळे, शिवाजी माळकर आदी मान्यवर.

Sunday, 9 March 2025

बारावीची ऑनलाईन बोर्ड परीक्षाही गैरप्रकारमुक्त


सीसीटीव्हीचा वॉच, बैठ्या व भरारी पथकाचीही नियुक्ती अन् लॅबची तपासणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
येत्या बुधवार १२ मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान(आय टी) व सामान्य ज्ञान(जी के) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना सक्त ताकीद दिली आहे. ऑनलाइन परीक्षा आयोजित केलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले असून लेखी परीक्षेप्रमाणेच प्रत्येक केंद्रासाठी बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती जिल्हास्तरावरून करण्याच्याही सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.

बोर्डाची बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असून ११ मार्च रोजी लेखी परीक्षा (तुरळक विषय वगळता) संपत आहे. त्यानंतर १२ ते १८ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोल्हापूर व कोकण विभागात या ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती झाली असून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषय मान्यता देण्यात आली आहे, त्याच कनिष्ठ महाविद्यालयात (काही अपवाद वगळता) परीक्षा केंद्र असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या खाजगी सैनिकी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षाही ज्या त्या सैनिकी शाळेतच होणार आहे. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रत्येकी एक खाजगी सैनिकी शाळा आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्र संचालक, आयटी शिक्षक पर्यवेक्षक यांना विभागीय मंडळाने परीक्षेबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले असून या सर्वांसह विद्यार्थ्यांसाठी माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.

इंग्रजी, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे तीन अनिवार्य विषय वगळता इतर विषयांकरिता वैकल्पिक विषय म्हणून कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोल्हापूर विभागीय मंडळातील बारावीच्या २५,१७९ विद्यार्थ्यांनी तर कोकण विभागीय मंडळातील ४,८०३विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे. कोल्हापूर मंडळात २२४ तर कोकण मंडळात ७० परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तर कोल्हापूर विभागातील तिन्ही सैनिकी शाळेतील बारावीच्या एकूण ८८ व कोकण मंडळातील दोन सैनिकी शाळेतील ७० विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची परीक्षा होणार आहे.

असे आहे वेळापत्रक - माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा १२,१५ व १७ मार्च रोजी सकाळी ११ ते १:३० आणि दुपारी ३:०० ते ५:३० या वेळेत बॅचनुसार होणार आहे. तर सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा १५,१७ व १८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत बॅच नुसार होणार आहे. लेखी परीक्षेप्रमाणे याही परीक्षेत दहा मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे.विहित वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तर परीक्षेच्या संगणक प्रयोगशाळेत अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

असे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- 
माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा अडीच तासांची व ८० गुणांची असून त्यात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, बहुपर्यायी एक उत्तर बरोबर, दोन उत्तरे बरोबर, तीन उत्तरे बरोबर, जोड्या लावा, लघुत्तरी प्रश्न आणि एचटीएमएल कोड व प्रोग्रॅम लिहिणे असे प्रश्न असतील. २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर झालेली आहे.
तर सैनिकी शाळांमधील सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २ तासांची १०० गुणांची आहे. या परीक्षेत शंभर प्रश्न असतील.

अशी आहेत जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे -
माहिती तंत्रज्ञान विषयाकरता सातारा ७१, सांगली ५३, कोल्हापूर १०० अशी कोल्हापूर विभागात एकूण २२४ तर कोकण मंडळात रत्नागिरी ४६, सिंधुदुर्ग २४ अशी एकूण ७० परीक्षा केंद्र आहेत. तर या पाचही जिल्ह्यात सामान्य ज्ञान विषयासाठी सैनिकी शाळेत प्रत्येकी एक परीक्षा केंद्र आहे.
माहिती तंत्रज्ञान विषयाकरिता सातारा 8,360 सांगली 4,351 कोल्हापूर 12,468 असे कोल्हापूर विभागात 25,179 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत. कोकण मंडळात रत्नागिरी 2,904 सिंधुदुर्ग 1,899 असे 4,803 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.
सामान्य ज्ञान विषयाकरता सातारा केवळ ५,सांगली 23, कोल्हापूर 60, रत्नागिरी 34 आणि सिंधुदुर्ग 36 असे परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.

गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा -

माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा घेत असताना शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाचा अवलंब काटेकोरपणे इतर विषयाच्या परीक्षेप्रमाणेच करावयाचा आहे. परीक्षा काळात सदर धोरणाचा अवलंब न केल्यास व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयावर तसेच परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक व शिपाई या सर्वांवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवा व शर्ती) नियमावली 1981 नुसार व माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act 2000) नुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार केंद्र संचालक व आयटी टीचर यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र परीक्षार्थी, पर्यवेक्षक, शिपाई यांना मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास व बाळगण्यास मनाई आहे.
पर्यवेक्षक हे संगणक साक्षर असतील, मात्र ते माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक शिकवणारे शिक्षक नसतील. आयटी शिक्षकांना केवळ तांत्रिक मदतीसाठीच संगणक कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांची परीक्षापूर्व तपासणी करण्याच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच परीक्षेपूर्वी वीज पुरवठा, इंटरनेट कनेक्शन व गती याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १० मार्च रोजी सर्व परीक्षा केंद्रांवर चाचणी (ड्राय रन) घेण्यात येणार आहे.

•विभागीय व जिल्हा समन्वयकांची नियुक्ती - 
तांत्रिक मदतीसाठी कोल्हापूर विभागीय समन्वयक म्हणून सुषमा पाटील तर कोकण विभागीय समन्वयक म्हणून सचिन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
जिल्हानिहाय आयटी समन्वय पुढीलप्रमाणे, 
सातारा- विशाल शिंदे, किरण शिंदे, संपत चव्हाण.
सांगली-धनाजी शेवडे, शांतिनाथ पाटील. 
कोल्हापूर-बी एम वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे. 
रत्नागिरी- समृद्धी बावधनकर. सिंधुदुर्ग- प्रसन्नकुमार मयेकर.

श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा (मल्टी स्टेट) शाखा हेरले च्या अध्यक्ष पदी राहुल माळी तर उपाध्यक्ष पदी नारायण खांडेकर यांची निवड


हेरले /प्रतिनिधी
 हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टी स्टेट ) शाखा हेरले च्या अध्यक्ष पदी राहुल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी नारायण खांडेकर यांची निवड करण्यात आली.
  यावेळी नूतन संचालक नीलेश कोळेकर,श्रीपाल आलमान,दीपक थोरवत,अदिति आलमान,प्रतिक्षा पाटील यांची संचालक पदी निवड करण्यात आली. यासाठी मुख्य कार्यालयातील हेरले शाखा इन्चार्ज एस. एम. डब्ब सर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाखा मॅनेजर  यलगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यावेळी शाखा कर्मचारी विवेक चौगुले, लोकेश खांडेकर व शंकर कोळेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Wednesday, 5 March 2025

६ मार्चपासून मुंबई मंत्रालय येथे उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलन.

कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005 पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बजेट अधिवेशना दरम्यान  दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे.  ६ मार्च ते  १६ मार्च कालावधीमध्ये उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलन. सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास १७ मार्च ते २१ मार्च  या कालावधीत अन्नत्याग साखळी उपोषण, निदर्शने, आझाद मैदान मुंबई उपरोक्त मागण्या करिता निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिली आहे.

   मयत बांधवांच्या वारसदारांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावेत. २१नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः / टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदानित शाळेत १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती
विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी. २००५ पूर्वी नियुक्त सर्वच विनाअनुदनित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. विनाअनुदनित शिक्षकांना सेवा उपदानसुद्धा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून सेवाउपदान सातव्या सातव्या वेतन आयोगाप्रम सर्व शिक्षकांना देण्यात यावे.कृपया वरील मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंदोलनापूर्वीच मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढून आझाद मैदानावर होणारा आक्रोश उपासमार मेळावा थांबवावा ही नम्र विनंती. असे आवाहन अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी केले आहे.