कागदी नोटा - ज्याला आपण इंग्रजीत "कॅश' म्हणतो, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तंत्रज्ञानाने बरीच प्रगती करूनही अजूनही आपण अनेक वेळा कॅशचा वापर करतो. बसमध्ये तिकीट काढण्यासाठी अथवा रिक्षावाल्याला द्यायला अजूनही कॅशच लागते. जगातील एक देश मात्र कॅशलेस- रोखमुक्त बनत चालला आहे. दिवसेंदिवस या देशामध्ये अनेक ठिकाणी तुमची इच्छा असेल तरीही कॅश वापरता येत नाही! एवढेच नव्हे, तर अनेक बॅंकांच्या शाखेमध्ये कॅश दिली-घेतली जात नाही. या देशाचे नाव आहे स्वीडन! स्वीडन जगातील पहिला रोखमुक्त देश बनण्याच्या मार्गावर आहे.
स्वीडनमध्ये दर पाच खरेदीपैकी चार खरेदी रोखमुक्त असतात. या खरेदीसाठी पैसे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिले जातात. दुकानामध्ये होणारे 95 टक्के व्यवहार क्रेडिट कार्डाने होतात. 2010 ते 2012 च्या मध्ये स्वीडनमधील 500 बॅंकांच्या शाखा पूर्णपणे रोखमुक्त झाल्या. या शाखांमध्ये कुठल्याही प्रकारची कॅश दिली अथवा घेतली जात नाही. तुम्हाला अकाउंटमध्ये कॅश भरता येत नाही, अथवा कॅश काढताही येत नाही. याच काळात वापर होत नाही म्हणून स्वीडनमध्ये 900 एटीएम मशिन काढून टाकण्यात आल्या. कॅशचा वापर न केल्याने स्वीडीश बॅंकांच्या या शाखांमध्ये बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची गरजच नाही. तसेच या शाखांमध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी तिजोरीचीही गरज नाही. 2010 मध्ये स्वीडीश बॅंकांच्या तिजोऱ्यांमध्ये अंदाजे 8.7 अब्ज क्रोनर होते. 2014 मध्ये ही रक्कम 3.6 अब्ज क्रोनरएवढी खाली आली आहे. स्वीडनमधील चर्चमध्येही देणगी देण्यासाठी पेटीऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मशिन ठेवल्या जातात. "कोलेक्टोमॅट' नावाच्या या मशिनमध्ये क्रेडिट कार्ड रीडर असल्याने क्रेडिट कार्डने देणगी देणे सोपे जाते. एका वृत्तानुसार स्वीडनमधील चर्चला मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी 85 टक्के देणग्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळतात!
रोखमुक्तीचे अनेक फायदे ---
नोटा आणि नाणी छापायला सरकारांना खूप मोठा खर्च येतो. त्या सांभाळण्यासाठीही खूप मोठा खर्च अनेक लोकांना व संस्थांना करावा लागतो. बॅंकांना नोटा ठेवण्यासाठी मोठमोठ्या तिजोऱ्या बनवायला लागतात. त्या नोटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बंदूकधारी रक्षक असणाऱ्या गाड्या लागतात. एवढेच नव्हे, तर त्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या हे तपासण्यासाठी विशेष मशिनही लागतात. सुट्या पैशांच्या आणि फाटलेल्या नोटांच्या प्रश्नाविषयी तर मी काही अधिक सांगायला नकोच. त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यम वापरून पैशाची देवाण-घेवाण करणे खूपच सोपे असते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून पैसे देण्यामुळे कुणी, कुणाला आणि कधी पैसे दिले याची नोंद राहते. त्यामुळे काळ्या व्यवहाराला आळा बसतो. त्यामुळेच जगातील अनेक सरकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे देण्याला प्रोत्साहन देतात.
No comments:
Post a Comment