Sunday, 7 May 2017

‘भाकरीचे गाव’ अशी ओळख असलेले ‘तक्का गाव’



'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली' किंवा ‘अरे संसार, संसार आधी हाताले चटके, तवा मिळते भाकर !’ या ओळीचा संदर्भ जरी वेगळा असला तरी त्यातील भाकर ही पनवेल तालुक्यातील तक्का गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. आयुष्य हे भाकरी भोवतीच कसे फिरते किंवा पावलो पावली कसे चटके देते ते दाखवणार्‍या या ओळी पनवेल शहराजवळील तक्का गावातील महिलांसाठी वरदान ठरल्या असून भाकरी बनवून गावातील प्रत्येक महिला ही सक्षम बनली आहे. स्वतःला सक्षम बनवताना तिने आपल्या कुटूंबाला देखील आधार दिला आहे.




पनवेल तालुक्याच्या विकासाबरोबर तालुक्यातील गावाची ओळख बदलत चालली आहे. गावाची शहरे झाली, बंगल्याचे इमले झाले, इतके असताना देखील याच तालुक्यातील पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तक्का गावातील महिलेच्या जिद्दीमुळे आज देखील हे गाव एक ‘गाव’ म्हणून ओळखले जाते. या मागचे कारण म्हणजे या गावात घरी बनवल्या जाणार्‍या तांदळाच्या भाकरी. या गावातील प्रत्येकाच्या घरात ‘तांदळाची भाकरी’ हेच खाद्यपदार्थांमधील मुख्य अन्न आहे. घरात मच्छी किंवा मटण असेल तर बरोबर तांदळाची भाकरी असल्या तरच हे खाद्य रूचकर लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. घरात केवळ कुटूंबासाठी बनवली जाणारी या तांदळाच्या भाकरीने पनवेल तालुक्यातील तारांकीत हॉटेल, ढाबे यांनी घेतली आहे. आणि या हॉटेल तसेच ढाब्यामध्ये जाणारी ही भाकरी तक्का गावातील असल्याचे या गावातील महिला ठणकावून सांगत आहे. या गावातील महिलांबरोबर गावातील सर्व सदस्यांसाठी ओम साई महिला मंडळाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या मंडळामध्ये जवळपास ४० महिला कार्य करीत आहेत. या महिला सकाळी व संध्याकाळी ऑर्डरनुसार भाकर्‍या बनवतात. ही केवळ तांदळाची भाकरी नाही तर तांदळामधून उकड काढून पाण्यावर थापून ही बनवली जाते. जवळपास एक महिला दिवसाला ५० भाकर्‍या बनवते. तसेच दिवसातून येणारी भाकर्‍यांची ऑर्डर ही महिला मंडळामध्ये समसमान रितीने वाटून घेतली जाते, अशी माहिती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा वाघिलकर यांनी दिली. दीड हजारा पासून ते पाच हजारा पर्यंतच्या तांदळाच्या भाकर्‍यांची ऑर्डर घेत असल्याचे महिलांनी सांगितले. या गावातून दिवसाला हजारो भाकर्‍यांची ऑर्डर पनवेल परिसरातील मोठ-मोठे ढाबे व पंचतारांकीत हॉटेलमध्ये जात असल्याचे वाघिलकर यांनी सांगितले. तर या रोजगारामुळे एक महिला महिन्याला जवळपास १० हजार रूपये कमवते. या व्यवसायाच्या माध्यमातून आलेल्या कमाईतून प्रत्येक महिला ही १०० रूपये जमा करून सर्व महिलांकडून विशिष्ट रक्कम जमा केली जाते. जमा झालेल्या या एकूण रक्कमेतून पनवेल परिसरात लोकोपयोगी समाजकार्य केले जातात. आत्तापर्यंत जमा झालेल्या एकूण रक्कमेतून मंदिर व शाळांना जवळपास ८ इन्व्हर्टर दिले गेले असल्याचे महिला सदस्यांनी सांगितले.
खापरावरची भाकरी  
तांदळाच्या पिठाची उकड बनवलेली ही भाकरी खास करून खापरावर बनवली जाते. तसेच पीठात मळण्यापेक्षा ही पाण्यासोबत मळली जाते. तेव्हाच या भाकरीला चव येते. सध्यातरी विविध समारंभांमध्ये या भाकर्‍यांना चांगलीच मागणी आहे
 ,your story च्या सौजन्याने 

No comments:

Post a Comment