अॅसिडिटी म्हणजे नेमके काय?
आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात.
हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अॅसिडिटी असे म्हणतात.
अॅसिडिटी का होते?
पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry.
Hurry – भराभरा जेवल्याने हवा गिळली जाते. म्हणून पोट फुगते, पोटाला तडस लागते.
Worry – अनावश्यक अतिकाळजी करत राहणे.
Curry – मसालेदार पदार्थ, शीतपेये, कॉफी, चॉकलेट.
आपलं आयुष्य हल्ली सुपरफास्ट झालंय. लोकांना सकाळी ब्रेकफास्ट घ्यायला पण वेळ नसतो. नुसताच चहा, कॉफी इ. पेय घेतली जातात; ज्यामुळे पोटातील अॅसिड किंवा आम्लपित्त वाढते व अॅसिडिटी जाणवू लागते.
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विविध टेन्शनखाली जगत असतो. ८.३०ची लोकल गाठायची. ऑफिसातल्या बॉसचं व कामाचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचे, करिअरचे टेन्शन, बायकांना ऑफिस, मुलं, घरकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टींत ताळमेळ साधायचे टेन्शन, डोक्यावर कर्ज असेल तर त्याचे अजून टेन्शन, या विविध ताणांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो व त्यामुळे जठर-रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते व अॅसिडिटीची सुरुवात होते. पोटात जळजळ होणाऱ्या बऱ्याच रुग्णांना मानसिक तणावांनी ग्रासलेले असते.
फास्ट फूडच्या जमान्यात भूक लागली की रस्त्यात उभे राहून कुठेही वडापाव, पावभाजी, पिझ्झा, पाणीपुरी, दाबेली इ. सटरफटर खाल्ल जातं. त्यामुळे अमिबीयासिस किंवा जियारडिआसिस यासारखे इन्फेक्शन होते व त्यामुळे अॅसिडिटी (gastritis) चा त्रास होतो.
रात्री भरपेट जेवून तत्काळ झोपणे, रात्री खूप उशिरा झोपणे, कॉल सेंटर किंवा शिफ्टबदलीच्या नोकऱ्या. यामुळे रात्री जागरण व दिवसा अपुरी झोप यामुळे अॅसिडिटी बळावते.
मद्यपान करणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा कुठल्याही दुखण्यासाठी ब्रुफेन किंवा त्यासारखे वेदनाशामक औषध घेत राहणे, आहारात जास्त तेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही अॅसिडिटी वाढते. अन्नातील तिखटपणा हिरवी मिरची, लाल मिरची, आले-लसूण पेस्ट, मिरपूड इ. या पदार्थानी येतो. असे पदार्थ सर्वाना सोसतीलच असे नाही. ज्या लोकांना असे पदार्थ सोसत नाहीत, त्यांना पोटात किंवा छातीत जळजळ/ विस्तव पेटविल्यासारखे वाटते.
अतिकडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अॅसिडिटी होते. शिळे अन्न खाल्लय़ाने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.
भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा आयुर्वेदाने सांगितलेला मूल्यवान मुद्दा आपण विसरतो व अनेकदा दोन घास जास्तीचे खातो. त्यामुळेदेखील आम्लपित्त वाढते व आंबट ढेकर येऊ लागतात.
अॅसिडिटीची लक्षणे
जळजळ, आम्लपित्त
पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ होणे ही अॅसिडिटीची मुख्य लक्षणे आहेत. काहीही तिखट किंवा तेलकट जास्त खाल्ल्यास जळजळ होते. जेव्हा जठरात किंवा आतडय़ात व्रण (अल्सर) असतो, तेव्हा प्रभावी उपाययोजना करून जळजळ नाहीशी होते. जर व्रण नसेल तर त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्सर डिस्पेप्सिया म्हणतो, म्हणजे लक्षणे तर अल्सरची आहेत, पण एन्डोस्कॉपी केल्यास अल्सर नाही. अशा रुग्णांना वारंवार हा त्रास सतावतो. काही वेळा जेवताना किंवा जेवणानंतर जठरातील आम्ल उलट अन्ननलिकेत येते व त्यामुळे अन्ननलिकेस इजा पोहोचते. यालाच आपण रिफ्लक्स डिसीज असे म्हणतो.
छातीतील किंवा पोटातील जळजळ कधी उपाशीपोटी होते किंवा कधी भरपेट जेवल्यावर होते. काहींना जेवल्यानंतर पोट फुगून येण्याचा त्रास होतो. जळजळ ही कधी उपाशीपोटी होते किंवा कधी भरपेट जेवल्यानंतर होते. उन्हात जाऊन आल्यानंतर किंवा मसाल्याचा एक कणही जेवणात आला तरी पोटात जळजळ होणारे रुग्णही असतात.
ढेकर येणे/देणे
ढेकर देणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. भरभर जेवताना किंवा पाणी पिताना नकळत हवा पोटात शिरते. ती हवा मग ढेकर देण्याच्या रूपाने बाहेर पडते. अॅसिडिटीमध्ये ढेकरांबरोबर आंबट द्रव किंवा अन्नकण तोंडात येणे. जेवल्यानंतर वा पाणी प्यायल्यावर ढेकर यावा तर हवा पण येत नाही म्हणून कासावीस होणे, ही लक्षणे बहुतेकदा रिफ्लेक्स डिसीजची असतात.
पोट फुगणे, अपचन वा गॅस
जास्त काळ अॅसिडिटीचा त्रास असेल तर त्याचे अल्सरमध्ये रूपांतर होऊ शकते. अल्सर म्हणजे जठर किंवा आतडय़ाच्या पहिल्या भागात एक जखम होणे. अल्सरमुळे पाठीत दुखणे, रक्ताच्या उलटय़ा होणे किंवा अल्सर फुटून पोटात इन्फेक्शन होऊ शकते.
अॅसिडिटी – गॅसेस झाले म्हणजे लगेच अल्सर झाला, कॅन्सर झाला असे होत नाही. ती भीती आणि शक्यता नसते असे नाही, पण त्याचं प्रमाण आणि शक्यता खूप कमी असते. बऱ्याच वेळा खाण्यातला काही बदल, बाहेरचे खाणं, फास्ट फूड, अबरचबर/ चटरफटर खाणं, जागरणं अशामुळे हा त्रास होऊ शकतो.
डॉ. अविनाश सुपे
No comments:
Post a Comment