कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बळीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
बळीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे.
बळीराजा वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे अन् त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे तो तिन्ही लोकांचा चक्रवर्ती राजा होता त्यामुळे इंद्राचे इंद्र पद धोक्यात आले होते म्हणून इंद्राने विष्णू ला शरण जाऊन साकडे घातले.
तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्या पायाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाय कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिपावली पाडवा !
▼
No comments:
Post a Comment