हेरले/ वार्ताहर दि. ७/११/१७
वाहन चालकांनो सावधान ! पुढे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली आहे, वाहने जपून चालवा अन्यथा अपघाताने जीवघेणी ठरू शकेल. एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झालेने ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली यांची सांगड रस्त्यावरून ऊस वाहतूक करीत असतांना वाहतूकीचा तरी बोजवारा उडतोच मात्र संभाव्य अपघातातून जीवघेणी सापळा ठरत असतो. त्यामुळे वाहन चालकांनी सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर जिल्हा सधन असल्याने ऊस उत्पादनात अग्रेसर ठरत आहे. ऊस उत्पादनास पोषक हवामान,अन्य अनुकूल घटक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक ठरले आहे. जास्तीत जास्त क्षेत्र या पिकाचे असल्याने सहकारी साखर कारखानदारी विकसीत झाली आहे. सालाबादप्रमाणे नोव्हेबंरच्या पहिल्या आठवडयामध्ये ऊस गाळप हंगामास सुरूवात होऊन साखर कारखाने सुरू होतात. सर्वत्र ऊस तोडणीची लगबग सुरू झाली आहे.
वीस किमीच्या क्षेत्रात ऊस उत्पादन नजीक साखर कारखाने स्थापन झाले असल्याने ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली या वाहनातून परवडणारी असल्याने सर्रास केली जाते. मात्र या वाहतूकीकडून काही वेळेला नियमांचे उल्लघंन होत असल्याने अपघातास कारणीभूत ठरून गळीप हंगामात जीवघेणी ठरत आहे.असे अनेक अपघात होऊन स्पष्ट झाले आहे. प्रत्येक सालामध्ये अनेक अपघात होऊन प्रचंड जिवीत व वित्तहानी झाली आहे.
दूचाकी , चारचाकीसह अन्य वाहनधारकांनी गळीत हंगाम बंद होईपर्यंत प्रवास करीत असतांना समोर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पासून सावधानता बाळगणे महत्वाचे आहे.ट्रॉलीतून रस्त्यावर ऊसाच्या मोळ्या पडणे, ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यात उलटणे,रस्त्यात पंक्चर होणे , ट्रॅक्टरास एकच हेडलाईट असणे,आदी कारणे अचानक अपघात होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे सर्वांनी अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.
ट्रॅक्टर ट्रॉलीस रिप्लेक्टर नसतात.
ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागील बाजूस अन्यवाहना प्रमाणे सावधानता बाळगणेसाठी दिवे नसतात. म्हणून लाल रेडीअमचे रिफ्लेक्टर लावायचे असतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढील वाहन दिसेल आणि सावधनता बाळगून ओव्हरटेक करीता येईल. किंवा थांबलेले दिसून येईल. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसलेने अन्य वाहनांना अंदाज येत नाही. परिणामी भीषण टक्कर होऊन अपघातास सामोरे जावे लागते. मग चूक कोणाची दंड कोणाला अशी दयनीय अवस्था निर्माण होते.
ऊसाचा क्षमतेपेक्षा जास्त लोड भरला जातो.
ऊसाची दोन्ही सांगडमध्ये जास्तीत जास्त वाहनास न पेलणारा क्षेमतेपेक्षा जास्त लोड भरून मुख्य रस्त्यावरून वाहतूक केली जाते. काही वेळेस लोड व्यवस्थीत न भरलेने किंवा रस्त्याच्या खबडबमुळे अचानक ट्रॉली उलटतात. त्यामुळे अन्य गाडीवरती ऊसाच्या मोळ्या पडणे तसेच पाठीमागील वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक होऊन अपघात झालेची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
अचानक वळण घेतल्याने रस्ता अडविला जातो.
ट्रॅक्टर दोन ट्रॉली घेऊन ऊस वाहतूक करीत असतात. त्यांची लांबी जास्त असते. त्यांची गती दुसऱ्या वाहनापेक्षा कमी असते.काही वेळेस रस्त्याच्या वळणावर अथवा दुसऱ्या रस्यावरून जाणेसाठी वळण घ्यावे लागते. त्या प्रसंगी अन्यवाहना प्रमाणे सहजगतीने टर्न बसत नसलेने पाठीमागून येणाऱ्या वाहनास अडथळा निर्माण होऊन जलदगतीमुळे टक्कर होऊन अपघात होतात.
मुलांना चालत्या ट्रॉलीतून ऊस काढण्यास रोखा.
मुलांना ऊस खाण्यास आवडतो. गावातील रस्त्यावरून ही वाहने जात असतांना ऊस काढण्यासाठी ट्रॉलीच्या मागे मुले धावत असतात. त्यावेळी तोल जाऊन ट्रॉलीच्या खाली पडण्याची शक्यता असते. तरी आपल्या मुलांना धावत्या ट्रॉलीतून ऊस काढण्यासाठी मज्जाव करा.
सायकलस्वारांनी ऊस ट्रॉलीतील ऊस धरून जाऊ नये.
कामगार, मजूर आपल्या कामावर जाणेसाठी सायकलवरून प्रवास करीत असतात. गळीत हंगाम सुरू झाले नंतर काहीजण ऊस ट्रॉलीतील ऊसास धरून सायकल न मारता पाच पंचवीस किमी सहज प्रवास करीत असतात. मात्र काही वेळला अचानक ट्रॅक्टर थांबला, हातातील ऊस सुटला, ट्रॉलीतील मोळ्या डोक्यात पडल्या या कारणामुळे अपघात होऊन सायकलस्वारास जिवघेणी ठरू शकते.
पोलीस दलाने ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूकीस शिस्त लावावी.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यावरून ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली वाहनातून होत आहे. बारा तालूक्यातील पोलीस ठाण्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील ऊस वाहनास रिफ्लेक्टर लावले आहेत का? ट्रॅक्टरास दोन हेडलाईट आहेत का? टेपचा मोठया कर्कश आवाजात वाहतूक करणाऱ्या या तीन घटकाची तपासणी करून नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवरती कायदेशीर कारवाई करून वाहतूकीस शिस्त लावावी. त्यामुळे संभाव्य अपघात टळू शकतील. साखर कारखान्याकडून ट्रॅक्टर ट्रॉलीस रिफ्लेक्टर वितरीत करून वाहनास लावण्यास अनिवार्य करावे.
No comments:
Post a Comment