आज १ मे.. अर्थात महाराष्ट्र दिन...
शिवाय हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काही राज्यकर्त्यांचा विरोध होता.
स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी तत्कालीन राज्यकर्ते पाऊलं उचलत नसल्यानं संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. दार कमिशनकडून भाषावर प्रांतरचनेस विरोध दर्शवण्यात आला. इतकंच नाहीतर विदर्भासह महाराष्ट्र, सौराष्ट्रासह गुजरात आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर करण्यात आली. त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव असल्याचं लक्षात येताच मराठी जनता पेटून उठली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी नव्या चळवळीवनं पेट घेतला.
संयुक्त महाराष्ट्रावरील कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. कवनांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन असे कितीतरी तमाशे गाजत होते...
संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, एका धगधगत्या चळवळीचे फलित म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव , कारवार, निपाणी , बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले 'मुंबई ' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र 'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.
आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, एस.एम, जोशी यासारख्या व्यक्तींनी या चळवळीचं नेतृत्व केलं. ही चळवळ दडपण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यांत १०५ जणांना हौतात्म्य प्राप्त झालं. पुढं चळवळ अधिक तीव्र झाल्यानं एक पाऊल मागं जात तत्कालीन सरकार मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी राजी झालं. त्या १०५ हुतात्म्याच्या बलिदानामुळं आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. हुतात्म्यांना वंदन करत महाराष्ट्र दिन चिरायू होवो याच साऱ्यांना शुभेच्छा.
संकलन - ज्ञानराज पाटील, कोल्हापूूर
No comments:
Post a Comment