Saturday, 30 June 2018

शासनाच्या शाळा बंद धोरणास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा तीव्र विरोध

कोल्हापूर / प्रतिनिधी

     मिलींद बारवडे


   शाहू ,फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे  यांच्या विचारांच्या शाळा बंद करून शिक्षणाचे कंपनीकरण करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे पण शासनाच्या या धोरणास  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा तीव्र विरोध राहील असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले .

          श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे  जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी .लाड  होते .ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी .बी .पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .

        या बैठकीत पवित्र प्रणालीनुसार शिक्षक भरती करण्यापूर्वी २०१२ नंतर नियुक्त केलेल्या अर्धवेळ व पूर्णवेळ शिक्षकांना प्रथमत: मान्यता द्यावी ,शाळांची पटसंख्या कमी झाली तर शिक्षक कमी केला जातो पण पट वाढल्यानंतर वाढीव शिक्षकांची पदे मंजूर  केली जात नाही ती मंजूर व्हावीत ,सन २०१५-१६  संचमान्यतेमध्ये वाढीव विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शासनाने प्रस्तावित पदे दाखवली पण त्यानंतर मात्र ती दाखवली नाहीत, ती पदे दाखवून त्यास मान्यता द्यावी , शिक्षक  भरतीचे अधिकार शासनाकडे आणि शाळेचे प्रशासन संस्थेकडे या धोरणामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावणार असून व  पवित्र पोर्टल हे धोरण सेवाशर्ती नियमावली छेद देणारे असल्याने संस्थाचालकांना ते मान्य नसल्याने त्याचा पुनर्विचार व्हावा  , शिक्षकेतर कर्मचारी भरतीस परवानगी मिळावी ,शासनाच्या अशैक्षणिक धोरणामुळे प्राथमिक पासून पदवीपर्यंत शिक्षणाची होणारी गळचेपी थांबवावी  आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या . तर संस्थाचालक संघटनेची पुणे येथे ४  जुलै रोजी बैठक होणार असून या बैठकीतील निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे व्यासपिठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी यावेळी सांगितले . तसेच २०  टक्के अनुदानावरील शिक्षक कर्मचाऱ्यांचे ग्रामसेवा ते नागपूर आंदोलनास सक्रिय पाठिंबा , एखादा निर्णय इतर विभागाने घेतला असेल तर तसाच निर्णय कोल्हापूर उपसंचालक  विभागाने ही घ्यावा , आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांना उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी पूर्वग्रहदूषित वागणूक देऊ नये या  ठरावासह आमदार कपिल पाटील यांच्या हॅटट्रीक निवडीबद्दलच्या  अभिनंदनाचा  ठराव यावेळी करण्यात आला .  

        यावेळी वसंतराव देशमुख, जयंत आसगावकर , व्ही. जी .पोवार,  आर. वाय. पाटील, बी. जी .बोराडे , डी.एस. घुगरे ,  प्रभाकर आरडे , सुधाकर निर्मळे , सी. एम .गायकवाड , डॉ. ए.एम. पाटील , एस .के. पाटील, डी .एस .पाटील , बी .बी .पाटील, राजेश वरक ,व्ही.जी .पाटील , जी.एस .बागडी ,उदय पाटील , डी. एस .जाधव ,संदीप पाटील , समीर गायकवाड, भाऊसाहेब सकट,लक्ष्मण कांबरे, गिरीष फोंडे आदीसह तीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आभार व्ही. जी.पोवार यांनी मानले . 

               फोटो 

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत बोलताना विजयसिंह  गायकवाड , शेजारी डी.बी. पाटील , एस.डी. लाड , व्ही.जी. पोवार इतर .

No comments:

Post a Comment