हेरले / प्रतिनिधी दि. ४/९/१८
म्हैस दुध वाढविण्यासाठी संघाने एक धोरण निश्चित केले आहे. याचा प्राथमिक दूध संस्था व सभासदांनी लाभ घ्यावा व म्हैस दुधाची वाढ करावी. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळचे) चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले. ते हातकणंगले तालुका संपर्क सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, म्हैस दुधाचे घटते प्रमाण, गाय दूधाचे वाढलेले प्रमाण व जागतिक बाजार पेठेतील पावडरचे कमी झालेले दर . यामुळे संघास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संघाच्या संचालक मंडळाने म्हैस दूध वाढीसाठी धोरण जाहीर केले आहे. जातिवंत म्हैस खरेदीसाठी हरियाणा व पंजाब येथील म्हैस खरेदी केल्यास वीस हजार व गुजरातसाठी पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच वासरू संगोपनासाठीही भरीव अनुदान जाहीर केले आहे. तरी याचा संस्था व उत्पादक यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
मल्टीअँक्ट बाबत बोलताना श्री. पाटील यांनी सन २०२० पर्यंत संघाने वीस लाख लिटर दूध संकलन करण्याचा संकल्प केला आहे. सध्या बारा लाख लिटर इतके संकलन होत आहे. पण भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रमाण अधिक होईल असे वाटत नाही. तो टप्पा पूर्ण करण्यासाठी मल्टीअँक्ट शिवाय पर्याय नाही. त्यामुळे संघाच्या वार्षिक सभेत पाठिंबा द्यावा व सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी संकलन, पशुखाद्य , वित्त, पशुवैद्यकीय, मिल्कोटेस्टर, वैरण विकास, संगणक, गुण नियंत्रण व दूधबिल आदी विभागवार सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तालुका स्तरीय बक्षीस पात्र म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा,, उत्तम प्रत व महिला संस्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सभेस जेष्ठ संचालक अरुण नरके, रविंद्र आपटे, दिपक पाटील, धैर्यशील देसाई, रामराज कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, शरद तुरंबेकर, आर.सी. शहा, यु. व्ही. मोगले, एच.एम.कापडीया,डि.एच.शियेकर, भरत मोळे, दत्तात्रय वागरे, एस.पी. समुद्रे, विश्वासराव इंगवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संचालक विश्वास जाधव यांनी केले. आभार संचालक पी.डी. धुंदरे यांनी मानले.
फोटो
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित संपर्क सभेची सुरूवात दिपप्रज्वलनाने करताना चेअरमन विश्वासराव पाटील, सोबत रवींद्र आपटे, विश्वास जाधव, डी.व्ही. घाणेकर आदी.
No comments:
Post a Comment