Tuesday, 9 October 2018

मसाला उद्योगाचे बादशाह एम.डी.एच (MDH) मसाला यशोगाथा

सोशल मीडिया पासून ते टीव्ही मिडिया पर्यंत सर्वत्र पसरलेली बातमी एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबतची माहिती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे.

पण या निमित्ताने आपण मसाल्याचे बादशाह एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या व्यवसायाची यशोगाथा पाहूया.

धर्मपाल यांचं शिक्षण फक्त पाचवी पर्यंतच झालं आहे. वडिलांपेक्षा वेगळा व्यवसाय करून त्यांना यशस्वी व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी अनेक व्यवसाय करून बघितले. पण त्यांना यश आलं नाही.

महाशय धरमपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ ला सियालकोट (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाशय चुनीलाल आणि धरमपाल जन्माला येण्या आधी 1919 ला MDH म्हणजे महाशियन दी हात्ती या मसाला दुकानाची स्थापना केली होती. 

धरमपाल यांनी पाचवीमधूनच शाळा सोडली. ते साल होते १९३३. त्यानंतर १९३७ मध्ये वडिलांच्या मदतीने त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला. मग काही दिवस साबणाचा व्यवसाय, त्यानंतर काही काळ नोकरीही केली. कपडे आणि तांदळाच्या व्यापारामध्येही त्यांना काही काळ आपले नशीब आजमावले. 

१९४७ साली  देशाची फाळणी झाल्यावर धरमपाल गुलाटी भारतात आले. २७ सप्टेंबर १९४७ ला ते दिल्लीला आले, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त १५०० रुपये होते. त्यातले ६५० रूपये खर्च करून त्यांनी एक टांगा विकत घेतला. नवी दिल्ली स्टेशनपासून कुतुब रोड आणि करोल बाग ते बडा हिंदूराव पर्यंत ते टांगा चालवत असत. त्यानंतर करोलबाग इथं एका लाकडाच्या लहानश्या पेटील मसाले विकायला सुरूवात केली. तेव्हापासून तो व्यवसाय वाढतच गेला.

 त्यांनी आपल्या पारंपारिक मसाला व्यवसायाची नव्याने मुहूर्तमेढ रोवली आणि पुनश्च ‘महाशिअन दी हात्ती ऑफ सियालकोट’ म्हणजेच ‘देग्गी मिर्चवाले’ यांचे नाव उज्जवल केले.

धर्मपाल हे एमडीएच मसाल्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. गेली अनेक वर्ष ते कंपनीच्या मसाल्यांचे ब्रॅण्डींग करतात. आणि त्यांच्या त्या जाहीरातीला उत्तम प्रतिसादही मिळतोय. एमडीएच मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर त्यांचा फोटो असतो.

एमडीएच ची सुरूवात छोट्या स्तरपासून झाली असली तरी कंपनीचा आजचा व्याप प्रचंड मोठा आहे. देशातल्या मसाला बाजारात कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. कंपनी 62 प्रकारची उत्पादनं तयार करते. ही सर्व उत्पादनं 150 पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत.

 तुम्हाला आश्चर्य धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांचं वार्षिक वेतन हे 24 कोटी रूपये होतं. त्याचबरोबर कंपनीत त्यांचा 80 टक्के हिस्साही आहे. आपल्या वेतनामधला 90 टक्के हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी देतो असा त्यांचा दावा आहे.

एमडीएच ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्याची उत्पादनं विकली जातात. 

‘जे जे तुमच्यकडे सर्वोत्कृष्ट आहे, ते ते जगाला द्या. तुम्ही दिलेले सर्वोत्कृष्ट तुमच्याकडेच परत येईल.  अशी फिलॉसॉफी असणाऱ्या महाशय धरमपाल गुलाटी यांचे योगदान भारतातील सर्व उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.


3 comments:

  1. सुंदर माहिती

    ReplyDelete
  2. एक प्रामाणिक पण व्यावसायिक शिक्षण कसे सर्वश्रेष्ठ असते याचे उत्तम मार्गदर्शक प्रेरणादायी विचार खूप खूप चांगले आहेत
    धन्यवाद
    अजितकुमार पाटील,कोल्हापूर

    ReplyDelete