Tuesday, 9 October 2018

घटस्थापना आणि नवरात्र महात्म्य


नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यैभद्रायै नारायणि नमोऽस्तुते ॥

ब्रम्हरुपे सदानन्दे परमानन्द स्वरुपिणी ।

द्रुत सिध्दिप्रदे देवि, नारायणि नमोऽस्तुते ॥नवरात्र व्रत, उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नऊ दिवस भक्तिभावे करतात. प्रतिपदेच्या दिवशी सर्वच ठिकाणी देवीची स्थापना करतात. नऊ दिवसापर्यंत नवरात्र असते. अनेक कुटुंबांतही दुर्गा देवीची पूजा होत असते. दुर्गा देवी ही असंख्य कुटुंबांची कुलदेवता आहे.

पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकर मुख्य देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व त्यांच्या अनेक परिवार देवता यांची स्थापना करतात. घटाच्या बाजूलाच नवे धान्य रुजत घालतात. नंतर ते रुजवण उत्सवसमाप्तीनंतर भगिनी केसात माळतात.

घटस्थापनेच्या वेळी लावलेला नंदादीप, अखंडदीप विसर्जनापर्यंत पेटत ठेवतात.


या नऊ दिवसात श्रीदेवी माहात्म्य - प्राकृत सप्तशती, श्री दुर्गा माहात्म्य, नवरात्र माहात्म्य (देवी गौरव गाथा ), श्री दुर्गा कवच इत्यादी ग्रंथांचे, पोथ्यांचे वाचन करतात. काही ठिकाणी नऊ दिवस उपवास करतात. तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात.

नवरात्रात कुमारिकांना, सुवासिनींना घरी जेवायला आमंत्रित करतात. एका दिवशी एका सुवासिनीची खणानारळाने ओटी भरतात. मंदिरात जाऊन देवीची खणानारळाने ओटी भरतात.

नवरात्रात नऊ दिवस देवीच्या घटावर सुगंधी फुलांची माळ सोडतात.

नवरात्रात काही विशिष्ट व्रते करावयाची असतात. आश्विन शुध्द पंचमीला उपांगललिता देवीचे व्रत असते. ललिता पंचमीस घटावर सायंकाळी पापडया, करंज्या, गोड वडे वगैरे फुलोरा टांगतात. त्या समारंभात ललिता देवीची पूजा प्रार्थना करुन महाप्रसादासाठी लोकांना बोलवतात. हा कुळधर्म आहे.

कुंकवाच्या करंडयाचे झाकण घेऊन त्याची ललितादेवी म्हणून प्रतीकात्मक पूजा करतात. गंधपुष्प आणि अठ्ठेचाळीस दूर्वा ललिता देवीला वाहण्याची परंपरागत रुढी आहे.

नमो दैव्यै महादैव्ये शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियता; प्रणताः स्म ताम्॥

ललितादेवीचा हा ध्यानमंत्र आहे.

पंचमीला कुंकुमार्चन म्हणजे कुमारिका आणि सुवासिनींकडून देवीला कुंकू वाहतात. कुंकूवाबरोबर दूर्वा, फुले वाहून देवीची आरती म्हणतात. घरात मंगल वातावरण सदैव राहावे यासाठी, शिवाय सौभाग्यरक्षणासाठी सुवासिनी देवीला कुंकू वाहतात.

आश्विन शुध्द अष्टमीला श्रीमहालक्ष्मी व्रतांग पूजा करतात. महाराष्ट्रात चित्त्पावन ब्राम्हण समाजात हे व्रत प्रचलित आहे. लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे श्रीमहालक्ष्मीची पूजा सुवासिनी मोठया उत्साहाने भक्तिभावे करतात. या दिवशी सकाळी देवीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवून पूजा करतात. आरती करतात. रात्रौ तांदुळाच्या पिठाची श्रीमहालक्ष्मीची मूर्ती करुन तिची पूजा करतात. ज्यांच्या घरी ही पूजा असते, त्यांच्या घरी सुवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जातात.

सोळा पदरी रेशमाचा दोरा घेऊन त्याला गाठी मारतात. पहिले वर्षे असेल तर एक गाठ, पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी असा तातू तयार करतात. हा दोरा पूजिकेने आपल्या हातात बांधावयाचा असतो. दुस-या दिवशी सकाळी मूर्तिविसर्जनाच्या वेळी देवीपुढे ठेवायचा असतो.

रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचू लागतात. दुस-या दिवशी सूर्योदयापूर्वी पंचोपचार पूजा करुन आरत्या, प्रार्थना करुन विसर्जन करतात. 'उदयोऽस्तु' ही या देवीची घोषणा आहे.नवरात्रात महालक्ष्मीची पूजा हा कुलाचार आहे. कुलधर्म आहे.

आश्विन शुध्द प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रात बोडण भरण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे. विशेषतः कोकणस्थ व देशस्थ ब्राम्हणांमधील हा एक कुलाचार आहे. बोडण विधी आश्विन शुध्द प्रतिपदेलाच करण्याची वहिवाट काही कुटुंबांत आहे.

बोडण म्हणजे कालवणे. एका मोठया पात्रात घरातील देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा करायची आणि सभोवती पाच सुवासिनींनी बसून त्या पात्रात दूध, दही, तूप, साखर, मध ही पाच द्रव्ये एकत्र घालून सर्वांनी मिळून कालवायची असा हा विधी आहे. तर काही ठिकाणी पाच सुवासिनी व एक कुमारिका एकत्र बसून देवीची पूजा करतात व पुरणावरणाचा स्वयंपाक देवीला अर्पण करतात. नंतर तो स्वयंपाक पाच सुवासिनी मिळून एकत्र कालवतात आणि त्या कुमारिकेला देवी मानून तिची पूजा करतात. ती जेव्हा 'खूप झाले' असे म्हणते तेव्हा ते कालवलेले अन्न गायीला नेऊन देतात.

आश्विन शुध्द नवमीला खड्गानवमी किंवा खांडेनवमी असे म्हणतात. या दिवशी शस्त्रपूजा करण्याची चाल अनेक कुटुंबात आहे.

विजयादशमीला श्रीसरस्वती पूजन करण्यात येते. लहान मुलांना प्रथमच पाटीवर 'श्रीगणेशा' ही अक्षरे गिरवायला लावतात. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त आहे. या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय हा मुहूर्त असतो. या वेळी इच्छा केलेली आणि कार्यारंभ केलेली सर्व कार्ये सिध्दीस जातात. म्हणूनच कोणत्याही शुभकार्याला लोक या दिवशी प्रारंभ करतात. हा पराक्रमाचा, विजयाचा दिवस आहे. या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करतात. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची चाल पौराणिक काळापासून प्रचारात आहे.

दस-याला 'अपराजिता' दशमी असेही म्हणतात. ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्या ठिकाणी अष्टदल कमल काढून त्यावर दुर्गेची मूर्ती ठेवून श्रध्देने पूजा करतात. जीवनाची सर्वोच्च साधना म्हणजे शक्ती प्राप्त करुन घेणे. शक्तीचे मुख्य लक्षण कधीही पराभूत न होणे हेच आहे. तिचे अंतिम फळ विजयप्राप्ती करणे हेच आहे. दस-याच्या दिवशी

'रुप देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि'

अशी दुर्गेची प्रार्थना करतात.

नवरात्र पूजेत घटावर मंडपी बांधून त्याखाली लोंबणार्या विविध फुलांच्या माला बांधतात हा एक महत्वाचा विधी आहे. कित्येक कुटुंबांत ही माला चढती असते. म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसर्या दिवशी दोन, तिसर्या दिवशी तीन याप्रमाणे नवव्या दिवशी नऊ माला बांधतात.


संत सज्जनांचा छळ करणा-या असुरशक्तीचे निर्मूलन देवी भगवतीने निरनिराळे अवतार घेऊन केले आणि देव व मानवांचे रक्षण केले तेव्हा देवीची स्मृती जागविण्यासाठी नवरात्र उत्सव मोठया उत्साहाने साजरा करतात. या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. देवी सर्वांची इच्छा पूर्ण करते. देवीच्या कृपाप्रसादाने मनुष्य सर्व बाधेतून मुक्त होतो. सुखी होतो. त्याच्या घरी श्रीमंती येते. देवीचे माहात्म्य सर्व पुराणातून वर्णन केलेले आहे.

No comments:

Post a Comment