Wednesday, 21 November 2018

त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामी दर्शन

आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा आहे या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असं म्हणतात.याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

तसेच  "कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र" या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. 

श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक" ही मानले गेले आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा मागची आख्यायिका 

पूर्वी तारकासुर नावाचा एक राक्षस होऊन गेला. प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वर्षे तारकासुराने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला.

त्याने देवांच्या स्थापतीकडून म्हणजेच विश्‍वकर्म्याकडून अंतराळात तीन नगरे बांधून घेतली होती. लोखंड, तांबे आणि चांदीची ही नगरे सुंदर दिसत होती. ती त्याने आपल्या तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशा तीन पुत्रांना दिली. हे तिघे राक्षसपुत्र प्रजेचा आणि संपूर्ण विश्‍वाचा छळ करणारे होते. उत्पात माजवणे आणि त्रास देण्यात ते आपल्या बापापेक्षा पुढे होते. त्यामुळे गांजलेल्या लोकांनी महादेवाला साद घातली. शंकर धाऊन आले. त्यांनी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या राक्षसांवर हल्ला केला. त्यांची तिन्ही पुरे भगवंतांनी उद्‌ध्वस्त केली आणि सर्व राक्षसांचा नायनाट केला. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते. घरोघरी, शिवमंदिरातून आणि इतर देवालयांमधून दीपोत्सव साजरा करतात.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असेही म्हण्तात.

जीवनात तेजोमय प्रकाशाची, भक्तीची, शांतीची प्रेरणा देणारी , मनाला आनंद देणारी, उत्साह देणारी, त्रिपुरारी आपणा सर्वांना फलदायी ठरो हीच त्या भगवान शिव-शंकरापाशी मागणी.

No comments:

Post a Comment