Wednesday, 22 January 2020

आता वाहनधारक व्यवसाय करदात्यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा सक्तीचे

कोल्हापूर : ज्ञानराज पाटील 

वाहनधारक व्यवसाय करदात्यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरच्या परिक्षेत्रातील व्यवसाय करदात्यांनी www.mahagst.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून शासन नियमानुसार ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी. अल्वारिस यांनी दिली.
ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय कर भरणा करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे यापूर्वी कार्यालयामध्ये व्यवसाय कर रोखपाल यांच्याकडे भरण्याच्या पध्दतीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत असून सर्व संबंधितांनी सुधारित कामकाज पध्दतीचा अवलंब करायचा आहे.
ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय कर भरणा करणाऱ्या करदात्याने सर्वप्रथम प्रादेशिक कार्यालयाच्या परिवहन शाखा व्यवसाय कर विभागातील व्यवसाय कर लिपीक यांच्याकडून त्यांच्या नावे प्रलंबित व्यवसाय कर व चालू व्यवसाय कराचे मूल्यांकन करून घ्यावे. व्यवसाय कर लिपीक यांनी सदर मूल्यांकन त्यांचे सही व शिक्क्यानिशी प्रमाणित करावे. वाहनधारक व्यवसाय करदात्याने या कार्यालयाने मूल्यांकित करून दिलेला व्यवसाय कर ऑनलाईन पध्दतीने भरल्याची रिसीट कार्यालयात सादर केल्यानंतर सादर पावती ही व्यवसाय कर लिपीकाने करून दिलेल्या मूल्यांकन रक्कमेएवढी आहे किंवा कसे हे तपासावे. व्यवसाय कर लिपीक यांनी सादर ऑनलाईन पावती GST विभागाने कार्यालयास चलन पडताळणीसाठी दिलेल्या लॉगीन चा वापर करून सादर पावती क्रमांक, व्यवसाय कर दात्याचे नाव, रक्कम इ. बाबी पडताळून पहाव्यात व सादर केलेल्या पावतीची सत्यता तपासावी. 
सदर ऑनलाईन रिसीट असल्याचे खात्री झाल्यानंतर व्यवसाय कर लिपीकाने कर दात्याने सादर केलेल्या कागदपत्रांवर  Verified and Found Correct  असा शिक्का मारून स्वाक्षरीव्दारे प्रमाणित करावे. प्रमाणित केलेली व्यवसाय कराची एक पावती संबंधित कार्यालयाने अभिलेखनात जतन करावी आणि दुसरी प्रत वाहनधारकास परत करावी. 
प्रमाणित केलेली ऑनलाईन व्यवसाय कर रिसीट वाहन धारकाने संबंधित वाहनाच्या परमिट/ फिटनेस/बोजा नोंद व कमी करणे/ हस्तांतरण इ. सेवांकरीता आवश्यक कागद पत्रांसह जोडावी व प्रकरण कार्यालयात सादर करावे. परमिट / हस्तांतरण इ. सेवांशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी सदर प्रकरणांमध्ये वाहन व्यवसाय कर दात्याने जोडलेली व्यवसाय कर ऑनलाईन रिसीटची छायांकित प्रत व्यवसाय कर लिपीक यांचेकडून सत्यतेकरिता पडताळून घ्यावी. पडताळून न घेता काणत्याही प्रकारची सेवा वाहनधारकास दिल्यास संभाव्य होणाऱ्या महसूल हानीस संबंधित अधिकारी/कर्मचारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.  व्यवसाय कर लिपीकाने त्यांच्याकडे अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडून आलेली व्यवसाय कर ऑनलाईन रिसीट छायाप्रत त्यांच्या अभिलेखातील प्रमाणीत पावतीशी पडताळून पहावी आणि त्यावर Verified and Found Correct  असा शेरा मारून प्रमाणित करावी. अशा प्रकारे व्यवसाय कर यांनी Verified and Found Correct असा शेरा मारलेली ऑनलाईन रिसीट खरी मानून त्या प्रित्यर्थ सेवा पुरवावी. व्यवसाय करदात्याने सादर केलेली ऑनलाईन रिसीट खोटी आढळून आल्यास संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांनी खोट्या पावतीच्या विरोधास योग्य ती कार्यवाही करावी.

No comments:

Post a Comment