▼
Wednesday, 22 April 2020
लॉकडाऊन संपला ? की प्रशासन कंटाळले लोकांना ?
कोल्हापूर शहरात कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करुन कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्यांमध्ये मात्र आज काही विशिष्ट भाग वगळता बेजबाबदारपणाचेच दर्शन पहायला मिळाले. मंगळवारी सकाळपासून जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर सुरु झालेली वर्दळ दुपारनंतरही कायम होती. अनेक ठिकाणी बॅरिकेटस असलेत तरी कोणीही हटकत नाही . एकंदरीत शहरात जमावबंदी, संचारबंदी आणि `लॉकडाऊन' संपला का ? असाच प्रश्न अनेक सुजाण नागरिकांनी बोलून दाखविला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दुचाकीवर एक आणि चारचाकीने दोन प्रवासी या आदेशाला तर हरताळच फासला आहे. अनेक महाभागांच्या चार चाकी वाहनांवर पांढर्या कागदावर अत्यावश्यक सेवा, डॉक्टर, महाराष्ट्र शासन... असे अनेक कागदही लावलेले दिसले. मात्र, यातले खरोखरीच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे किती लोक असतील ? औषधांची जुनी फाईल घेेऊन विनाकारण फिरणार्यांची संंख्या कमी नाही. अनेक महाभाग तर केवळ वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून रस्त्यावर मोकाटपणे फिरताहेत. बँक, रेशन दुकानापुढे लागलेल्या रांगा एकवेळ समजू शकतो मात्र, यातीलही खरोखरीच गरजू किती आहेत ? हे तपासण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या `लॉकडाऊन'चे आपणच उल्लंघन करीत आहोत असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. आपल्या स्वैराचारपणे जगण्याचा धोका इतरांच्या जीवावर उठल्यास कोण जबाबदार असणार आहे ? अर्थातच आपल्यासाठी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस झटणारी आरोग्य यंत्रणा, पोलिस, प्रसार माध्यमे की, आपले आपणच जबाबदार राहणार आहोत.
No comments:
Post a Comment