Friday, 15 May 2020

कोरोना योद्ध्यांसाठी रु. 25 लक्ष सानुग्रह अनुदान

        

जिल्हा परिषदेमार्फत स्वनिधीतून केली मनोबल वाढविण्यासाठी तरतूद
*नंदुरबार  (प्रतिनिधी वैभव करवंदकर )*           :- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत जिल्हाभरात कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असून, राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांचा अवलंब करून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनापासून बचावा बरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे, गावागावात स्वच्छता ठेऊन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध कामांचा समावेश आहे.  कोरोना (Covid-19) आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केली असून,  या संकटावर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या संपूर्ण् यंत्रणेला ``कोरोना (कोविड-19) योद्धा`` असे संबोधून या योध्यांसाठी सानुग्रह अनुदान म्हणून  25 लक्ष रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. कु. सीमा पद्माकर वळवी यांनी पत्रकार परिषदेत केली.

   जिल्हा परिषद अध्यक्षा वळवी यांनी सांगितले कि,  कोरोना (covid-19)  आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषीत केले असून, या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व हे कर्मचारी बाधीत रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी  ``कोरोना (कोविड-19) योद्धा`` सानुग्रह अनुदान ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यांत येत असून, कोरोना (covid-19) मुळे मयत होणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य्‍य उपलब्ध करुन देण्यांत येणार आहे. साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत साथरोग आटोक्यात येईपर्यंत किंवा 30 जुलै 2020 पर्यंत मृत्यू पावणाऱ्या व कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment