Thursday, 14 May 2020

ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय विठ्ठलसिंग राजपूत यांचा कन्या सौ.इंदिरा राजपूत यांचा कोरोना विषाणू संदर्भात संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित


नंदुरबार (प्रतिनिधी वैभव करवंदकर )  ---     
   नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार  तसेच दैनिक नंददर्शनचे संस्थापक संपादक, केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य स्व.विठ्ठलसिंगआप्पा राजपूत यांच्या कन्या  सौ.इंदिरा जितेंद्रसिंग राजपूत यांचा    कोरोना अर्थात कोविड-१९ आजारावरील शोध प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाला असून भारतातच उपलब्ध असणाऱ्या मान्यताप्राप्त औषधांनी कोरोना आटोक्यात येवू शकतो असा दावा प्रबंधात करण्यात आला आहे. 
__ कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचा कार्याला आज सर्वच देश अग्रक्रम देत आहेत. आणि लस उपलब्ध नसल्याने या विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उपलब्ध असणाऱ्या उपचार पध्दतीचा सौ.इंदिरा राजपूत यांनी अभ्यास सुरु केला. या अभ्यासात त्यांना आपली उपचार पध्दतीला कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मर्यादा येत असल्याचे जाणवले आणि याबद्दल त्यांनी संशोधन करीत यासंबंधी आपला प्रबंध इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविला.
लॉकडाऊनमुळे १२ मे रोजी ऑनलाईन प्रसिध्द झालेल्या जर्नलच्या ताज्या आवृत्तीत सौ.इंदिरा  राजपूत यांचा शोधप्रबंध प्रकाशित झाला असून सदर जर्नलला ६.३ इतके मानांकन प्राप्त आहे. सदर प्रबंध रसायनशास्त्राच्या धातू धनभारीत (मेटॅलीक आयन) पध्दतीवर प्रकाश टाकणारा आहे. रसायनशास्त्राच्या अंगाने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झालेला एकमेव प्रबंध आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी फक्त प्रतिविषाणू औषध(अँटीव्हायरल) द्वारे कोरोना आजारावर उपचार करण्यात येतात. सदर उपचारामुळे कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मर्यादा येतांना दिसत आहेत. प्रबंधात कोरोना विषाणूच्या मेदाच्या कवचावर काही विशिष्ठ औषधांची अभिक्रिया करुन मेदाचे कवच तोडता येवू शकत असल्याचा अभ्यास प्रबंधातून सादर करण्यात आला असून कवच भेदल्यानंतर प्रथिने शिल्लक राहतात. या प्रथिनांवर अँटीव्हायरल औषधे परिणामकारक ठरु शकतील. कोरोनाच्या मेदाचे कवच भेदण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत त्यासोबत प्रतिविषाणू औषधे (अॅन्टीव्हायरल ड्रग) वापरली गेली तर कोविड-१९ वर फायदेशीर ठरु शकत असल्याचा अभ्यास प्रबंधातून सादर करण्यात आला आहे. यासाठी __ प्रबंधातून तीन प्रकारच्या उपचार पध्दती सुचविण्यात आल्या आहेत. या उपचार पध्दतीत सुचविण्यात आलेली सर्व औषधे भारतात आधीच उपलब्ध असून मान्यताप्राप्त आणि सुरक्षीत व त्यासोबत सहज उपलब्ध असणारे आहेत. या उपचार पध्दतीत कोणत्याही नवीन औषधांचा पर्याय सुचविण्यात आलेला नाही. तर प्रतिजैविक सोबत द्यावयाची औषधांचा संयोग कसा असावा यावर भर देण्यात आला आहे. ___ 
जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या संशोधनात नंदुरबार सारख्या अतिदुर्गम आदिवासी परिसरातील सुकन्येचे योगदान मोलाची भर घालणार असल्याचे मनोगत रसायनशास्त्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

सौ.इंदिरा राजपूत यांनी अल्पकाळाच्या अभ्यासातून जाणकारांच्या भुवया उंचावणारे संशोधन सादर केले आहे. साधारणतः अश्या  संशोधनासाठी दिड ते अडीच वर्षाचा काळ लागतो मात्र कोविड-१९ ची भयावहता आणि जगाला घातलेला विळखा या पार्श्वभूमीवर सौ.इंदिरा राजपूत यांनी महिनाभराच्या अभ्यासातून विस्तृत प्रबंध सादर केला आहे.
सौ.इंदिरा जितेंद्रसिंग (पिंटू) राजपूत यांचे शिक्षण एम.एस्सी (ऑरगॅनिक केमिस्ट्री/डीएमएलटी) झाले असून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रसिंग (पिंटू) राजपूत यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. सौ.इंदिरा राजपूत या जिल्हा परिषद अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ढेकवद प्रा.आ.केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

No comments:

Post a Comment