कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये परगावाहून येणाऱ्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे. याचाच प्रत्यय आज कसबा बावडा येथे जाणवला. काल रात्री कसबा बावडा डबरा कॉलनी परिसरात परजिल्हयातून एक कुटुंब आले. संबंधित कुटुंब हे शेजारच्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या जिल्ह्यातून रात्री उशिरा आल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही प्रमाणात सोशल मिडियावर मेसेज फिरले तर काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे माहिती दिली. यावर महानगरपालिका आरोग्य विभागाने दखल घेत संपूर्ण माहिती घेतली असता सदर कुटुंबांने आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेऊन रीतसर परवानगीने आल्याचे समजले. आरोग्य विभागाने ही सविस्तर माहिती घेतल्याने या परिसरातील तणाव निवळला. पण या निमित्ताने लोकांच्या मनात कोरोना आणि लॉकडाऊन याबद्दल भीतीचे वातावरण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
ज्या पद्धतीने मराठा काॅलनी आणि कनान नगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले नंतर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले व परिसरातील नागरिकांना विनाकारण शिक्षा भोगावी लागली. होम क्वारंटाईन व्हावे लागले. सलग पंधरा दिवस घरात अडकले. यामुळे आपल्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आला तर काय होईल याची काळजी आहे. म्हणून नागरिक बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत फारच सजग आहेत.
यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेऊन आणि रीतसर शासकीय परवानगी घेऊनच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करावा तसेच चेक पॉइंट्स वर सुद्धा नोंद करावी जेणेकरून स्थानिक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही असे कसबा बावडा समन्वय अधिकारी अरुणकुमार गवळी यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment