Sunday, 31 May 2020

वाशिम लॉकडाऊन’ ची सुधारित नियमावली १ जूनपासून लागू

*‘*
·        केशकर्तनालय, ब्युटीपार्लर राहणार बंद

·        रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू

·        मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन बंधनकारक


प्रतिनिधि - आरिफ़ पोपटे

वाशिम, दि. ३१ : 

जिल्ह्यात ३० जून २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ जून २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी प्रमाणेच सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी म्हटले आहे.

नवीन नियमावलीनुसार केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू राहणार असून याकालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर  कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई राहील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्री, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्या काळात सुरू ठेवण्यास मुभा राहील. तसेच बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहील. नगरपरिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहतील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील.

जिल्ह्यात सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आतिथ्य सेवा, सिनेमागृह, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थियटर, बार आणि ऑडिटोरीयम, असेम्ब्ली हॉल सारखी ठिकाणे बंद राहतील. विशेष परवानगीशिवाय रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक बंद राहील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, अॅकॅडमीक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. दारूची दुकाने सुरु ठेवण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क शाखेमार्फत ५ मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही कायम राहतील.

क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदाने नागरिकांना व्यायामासाठी खुली राहतील. मात्र, याठिकाणी सामुहिक खेळ खेळण्यास बंदी राहील. व्यायामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक राहील. इनडोअर क्रीडा संकुल बंद राहतील. सर्व प्रकारची मालवाहतूक सुरु राहील. मात्र, राज्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक संनियंत्रित राहील. अशा प्रवासासाठी यापूर्वीप्रमाणे ई-पास सुविधा सुरू राहील.

एका व्यक्तीसह दुचाकीकरिता तसेच चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीला परवानगी राहील. आंतरजिल्हा वाहतूक तूर्तास बंद राहील, सदर वाहतूक सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक राहील. तसेच दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील.

विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीने करता येईल. मात्र, विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.

सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी.

ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुरु राहील. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच करण्याची मुभा राहील.

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाच्या महामंडळांचे कार्यालयीन कामकाज नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत सुरु करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. सर्व शासकीय कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावे. तसेच सर्व नागरिकांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment