Thursday, 28 May 2020

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज देण्याच्या सूचना

*विभागीय जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक*

• *उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे आवश्यक*




वाशिम, प्रतिनिधि (m आरिफ़ पोपटे ) : दि 27

     आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अथवा या खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. विभागीय जिल्हा खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, २७ मे रोजी आयोजित बैठकीत अकोला येथून ते बोलत होते.


वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह प्रगतशील शेतकरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.


वाशिम जिल्ह्याचा आढावा घेताना कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा, विशेषतः युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कृषि विभाग यंदा ५० हजार मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासणार नाही. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी त्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कृषि विभाग राबवीत असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हंगाम काळात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होवू नये, तसेच लिंकिंगचे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


आगामी खरीप हंगामात कृषि उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती बियाणांची उगवण क्षमता तपासणे सुद्धा आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी कापूस लागवड न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


*शेतमाल खरेदीची गती वाढवा*


वाशिम जिल्ह्यात कापूस पणन महासंघ व ‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी करण्यात येत आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता कापूस खरेदी प्रक्रिया गतिमान करून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच ‘नाफेड’मार्फत सुरु असलेल्या तूर व हरभरा खरेदीची सुद्धा गती वाढवावी. जिल्ह्यात हळद खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कृषि विभागाने समन्वय साधून प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


*प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज द्या*


महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम लवकरच बँकेकडे वर्ग केली जाणार आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना सुद्धा बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.


*जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले*, वाशिम येथे स्वतंत्र जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालय सुरु करावे. तसेच जिल्ह्यात सध्या एकच उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय असून एक नवीन उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालये सुरु करण्याची विनंती केली. सदर मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेले नियोजन, उपलब्ध बियाणे, खते याविषयी माहिती दिली

No comments:

Post a Comment