तब्बल दोन तासाच्या व्हीसीमध्ये सरपंच ते राज्यमंत्री यांच्याशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद
जिल्ह्यात येणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण करा; कोरोनामुक्तीसाठी दक्ष राहू
-पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर, दि. 3 : तब्बल दोन तास चाललेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवक, आमदार, खासदार आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यांच्याशी संवाद साधला. आजपर्यंत जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी उत्तम जबाबदारी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील 15 दिवसात अजिबात शिथिलता न आणता अधिक दक्षतेने प्रत्येकाने काळजी घ्यावी. बाहेरहून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अलगीकरण करुन कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी दक्ष राहू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके आदी उपस्थित होते.
यामध्ये सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, महापौर निलोफर आजरेकर,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष स्वाती कोरी, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, कोल्हापूरचे नगरसेवक अजित ठाणेकर, सूरमंजिरी लाटकर, राहूल चव्हाण, सत्यजीत कदम, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, खेडेच्या सरपंच रुपाली आर्दाळकर, संभाजीपूरच्या सरपंच अनुराधा कोळी आदींसह सुमारे 800 सरपंचांनी सहभाग घेतला होता.
सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीमुळे वाहक चालक यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे. माल वाहतूक होणाऱ्या वाहनातून छुप्या पध्दतीने लोकांना आणता कामा नये. याबाबत समित्यांनी दक्ष रहावे. चालक वाहकांची अतिशय गंभिरतेने दखल घ्यावी. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित आणि पर्यायाने आपले गाव सुरक्षित या भावनेतून सर्वांनीच काळजी घ्यावी. ग्राम समिती, प्रभाग समितीने अशा लोकांचे प्रबोधन करुन काही दिवस गावच्या भल्यासाठी त्यांना स्वतंत्ररित्या राहण्यास सांगावे.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, 20 ठिकाणी प्रवेश नाक्यांवर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकांची यादी संबंधित गावांना दिली जाईल. त्यामुळे गावांना त्याबाबत नियोजन करता येईल. घरी योग्य सुविधा असेल आणि सर्व नियम तंतोतंत पाळले जात असतील तरच अशा व्यक्तींना घरी अलगीकरणात ठेवावे. गावाची सुरक्षितता महत्वाची असल्याने जास्ती जास्त लोकांना संस्थात्मक अलगीकरण करावं. याबाबत गावांनी निर्णय घ्यायचा आहे. लक्षणे दिसली तर ताबडतोब ती कळली पाहिजे आणि त्याला उपचारासाठी दाखल केले पाहिजे. याची जबाबदारी आता गावांवर आहे. गावामध्ये येणाऱ्या प्रत्येकावर योग्य लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शंका घेवून वाद विवाद होणार नाहीत याची दक्षताही घ्यावी लागणार आहे. पुढील 15 दिवस सर्वांनी दक्ष राहून कोव्हिड-19 पासून जिल्हा मुक्त करुया. त्यासाठी 24 तास प्रशासनाबरोबर आम्ही उपलब्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये सुमारे 50 हजारहून अधिक बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेले लोक येणार आहेत. या सर्वांवर यापुढेही ग्राम समिती, प्रभाग समिती, प्रशासन यांनी प्रभावीपणे दक्ष राहून लक्ष ठेवावे. कोव्हिड-19 विरुध्द 100 टक्के लढा आपण यशस्वी कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माझे गाव सुरक्षित ठेवणारच...
आजपर्यंत ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमचे गाव कुटुंबाप्रमाणे सुरक्षित ठेवले आहे. येथून पुढेही गावाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहील. कोणत्याही परिस्थितीत गाव सुरक्षित ठेवले जाईल. असा निर्धार यावेळी सरपंचांनी बोलून दाखवला.