परप्रांतीय कामगारांचा उद्रेक - हजारो कामगार गावाकडे जाण्यासाठी कोल्हापूर स्टेशनकडे
कोल्हापूर प्रतिनिधी -
गेले जवळपास दोन महिने लॉकडाऊन मुळे कोल्हापूर एमआयडीसीतील काम बंद आहे. हाती असलेले पैसेही संपलेत. काही लोकांना रेल्वे मिळाल्याने गावी गेले मग आमचा नंबर अजून का येत नाही ?
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या प्रशासनाकडे अॉनलाईन फॉर्म भरून कित्येक दिवस झाले तरीही आमची दखल कोणी घेत नाही. असे एक ना अनेक सवाल करत आज उत्तरप्रदेशला जाण्यासाठी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. काल प्रयागराजला एक ट्रेन गेली होती आजसुद्धा एक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरली . या अफवेने हे कामगार शिरोली एमआयडीसी परिसरातून कोल्हापूरच्या दिशेने पायी चालत आले.
तावडे हॉटेल परिसरात हजारो कामगार एकत्र आल्याने, पोलीस आणि प्रशासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला . यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कामगारांची समजूत काढून त्यांना लवकरात लवकर उत्तर प्रदेशला रेल्वेने पाठवले जाईल असे सांगितले.
कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे परप्रांतीय कामगारांचा जमाव ऐन लॉकडाऊनमध्ये एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे कामगार नाईलाजाने आणि अधिरतेने आपल्या राहत्या खोल्या खाली करुन सगळे सामान घेऊन काहीही करुन गावी जाणारच या निर्धाराने आज कोल्हापूर स्टेशन कडे जाण्यास सकाळपासूनच बाहेर पडले होते.
दरम्यान शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक किरण भोसले यांना याबाबत विचारले असता कामगारांना अशा प्रकारच्या कोणतीही अधिकृत माहिती नसताना केवळ ट्रेन सुटणार आहे अशी अफवा पसरल्याने ही परिस्थिती उद्भवली. कामगारांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, प्रत्येकाला गावी पाठविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.