हेरले (प्रतिनिधी )
मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील विद्या मंदिर मौजे वडगांव या शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका सायली चव्हाण यांनी केले. अध्यापिका सविता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
पुणे लॉ फर्म च्या वकील दिपाली पाटील आणि मलकापूर वनक्षेत्राच्या वनरक्षक आफ्रिन देवळेकर या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वकील दिपाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सांगत आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कसे वागले पाहिजे ,याबाबत मार्गदर्शन केले. वनरक्षक आफ्रीन देवळेकर यांनी आपल्या वनरक्षक पदापर्यंतचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर उलघडला.
यावेळी मौजे वडगावच्या सरपंच सौ कस्तुरी पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्रमुख पाहुण्यांना गौरवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमर तराळ यांच्या सहकार्याने दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार यावर्षी सई नलवडे या विद्यार्थिनीला देण्यात आला. अमर तराळ यांच्या वतीने विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांचा आणि उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सावित्रीचा वारसा हे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे होते.
अतिग्रे रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू थोरवत यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी थोरवत आणि सावली कांबरे या विद्यार्थिनींनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुतार वहिनी आणि तराळ वहिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.